बांगलादेशमध्ये मागील काही महिन्यांपासून राजकीय अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेख हसिना यांचे सरकार गेले. त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता. त्यानंतर अंतरिम सरकारची जबाबदारी मोहम्मद युनूस यांच्याकडे आली. मात्र, पुन्हा एकदा देशात हिंसाचार उफाळला आहे. शेख हसीना यांची राजवट समाप्त होऊन अद्याप वर्षही लोटले नाही. त्याचवेळी बांगलादेशच्या विद्यमान सरकारच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थी आंदोलनाचा फटाका तत्कालीन पंतप्रधान हसीना यांना बसला होता. शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात विद्यार्थी नेते नाहिद इस्लाम यांनी विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केले होते. या चळवळीमुळे शेख हसीनाचे सरकार कोसळले. आता विद्यार्थी पुन्हा एकदा युनूस यांच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार सुरू आहे. या सरकारमध्ये नाहिद इस्लाम यांना सल्लागार पद देण्यात आले होते; परंतु आता त्यांनी सल्लागार पद सोडण्याची घोषणा केली आहे. शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात भेदभावविरोधी चळवळी आणि हिंसक विद्यार्थी चळवळी झाल्या. हसिना सरकारच्या पडझडीचे ते एक मुख्य कारण होते. त्या विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी नेते नाहिद इस्लाम यांनी केले. सध्याच्या काळजीवाहू सरकारमधील पद सोडण्याच्या नाहिद इस्लाम यांच्या निर्णयामुळे बांगलादेशातील युनूस सरकारच्या स्थिरतेबद्दल शंका निर्माण झाली आहे आणि युनूस सरकार कधीही कोसळेल अशी अटकळ बांधली जात आहे.
“सरकारमध्ये असण्यापेक्षा क्षेत्रात काम करणे आता माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे,” असे नाहिद यांनी बांगलादेशी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. नाहिदने असेही सूचित केले आहे की, तो एकटा जाणार नाही, तर सरकारी पदांवर असलेल्या इतर विद्यार्थ्यांना पक्षाच्या कामात परतण्याचे आवाहन करणार आहे. त्याचबरोबर नाहिदच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात आले की, तो नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नादिद हा त्याच्या राजकीय पक्षांकडून निवडणूक लढणार आहे. त्यासाठी त्याने बांगलादेशात स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बांगलादेशच्या अलीकडच्या घटनांवर प्रकाशझोत टाकला तर, विद्यार्थी युनूस सरकारच्या काही निर्णयावर नाराज आहेत. ३१ डिसेबरच्या सायंकाळी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विद्यमान सरकारच्या विरोधात हजारो विद्यार्थ्यांनी ढाकामधील सेट्रल शहीर मिनारजवळ एकत्र येऊन घोषणाबाजी केली होती. बांगलादेश निर्मितीच्या वेळी १९७२ साली लागू करण्यात आलेले संविधान रद्द करावे अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. विद्यार्थ्यांच्या या संघटनेने त्याचे वर्णन मुजीबिस्ट संविधान असे केले आहे. हे संविधान भारताच्या बाजूला झुकलेले आहे, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. बांगलादेशात राजकीय अस्थिरतेमुळे एकेकाळी मैत्रीपूर्ण संबंध असलेले भारत-बांगलादेश आज तणावाच्या वळणावर येऊन ठेपले आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या अंतरिम सरकारने चीनसोबत जवळीक साधल्याने भारत-बांगलादेश संबंध बिघडल्याचे दिसत आहे. १९७१ मध्ये भारताने स्वतंत्र बांगलादेशला मान्यता दिली होती. भारत आणि बांगलादेश हे दोन्ही दक्षिण आशियाई शेजारी-राष्ट्र आहेत. ६ डिसेबर रोजी, बांगलादेश आणि भारत दोन्ही देशांमधील सतत मैत्रीचे स्मरण म्हणून फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. शेख हसीना यांच्या सत्ताकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध घट्ट होते; परंतु त्यांच्या पदच्युतीनंतर परिस्थिती बदलली. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना भारतात आल्या. मोहम्मद युनूस यांच्या धोरणांमुळे भारताबरोबरचे संबंध अधिक ताणले गेले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना मोहम्मद युनूस यांनी चीनची प्रशंसा केली होती. बांगलादेशला संकटाच्या काळात चीनने साथ दिल्याचा आवर्जून उल्लेख केला.
मोहम्मद युनूस यांनी भारताशी ताणलेल्या संबंधांवर मोहम्मद युनूस यांनी खेद व्यक्त करत, “बांगलादेश-भारत संबंध शक्य तितके मजबूत असले पाहिजेत,” अशी भावना व्यक्त केली होती. भारत आणि बांगलादेशाचा नकाशा परस्परावलंबी असल्याचे उदाहरण देत दोन्ही देशांतील संबंधांची आवश्यकता अधोरेखित केली असली तरी, संबंध टिकविण्याची जबाबदारी जणू भारताची आहे, असे तर युनूस यांना वाटू लागले नाही ना? दुसऱ्या बाजूला, बांगलादेशात तेथील नागरिकांना उच्च महागाईचा सामना करावा लागत आहे. अन्नधान्य महागाईचा दर १३ टक्क्यांवर पोहोचला असून, सरकारने व्हॅटमध्ये वाढ केली आहे. या वाढीमुळे १२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याचा दावा सरकार करत असले तरी नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे. बांगलादेश हा भारताचा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे आणि भारत हा बांगलादेशचा आशियातला दुसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. त्यामुळे बांगलादेशचे भारतासोबतचे संबंध आणखी बिघडले तर त्याच्या निर्यातीवर परिणाम होईल. याचा परिणाम बांगलादेशाच्या जीडीपीवर होईल आणि मग महागाईसोबत बेरोजगारीही वाढली तर आश्चर्य वाटायला नको. भारतासोबतच्या बिघडलेल्या संबंधांची किंमत चुकवणे बांगलादेशला सोपे जाणार नाही. त्या जोडीला बांगलादेशातील मेटाकुटीला आलेली जनता पुन्हा रस्त्यावर आली, तर अस्थिरतेच्या चक्रातून युनूस यांना बाहेर पडणे कठीण जाईल.