Saturday, October 18, 2025
Happy Diwali

म्हाडा आता वृद्धांसाठी बांधणार वृद्धाश्रम

म्हाडा आता वृद्धांसाठी बांधणार वृद्धाश्रम

पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाण्यापासून सुरुवात

मुंबई : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता वृद्धांसाठी अद्ययावत सुविधा असणारे वृद्धाश्रम बांधणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे गरजू आणि निराधार वृद्धांना हक्काचा आधार मिळणार आहे.

म्हाडाने एमएमआर ग्रोथ हब या प्रकल्पांतर्गत मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून म्हाडाचे मुंबई मंडळ आणि कोकण मंडळ वृद्धाश्रम उभारण्याची तयारी करीत आहे. मुंबईत अंधेरीतील आराम नगर येथे तर ठाण्यात माजीवाड्यातील विवेकानंद नगर अद्ययावत वृद्धाश्रम उभारण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय भविष्यात पुणे, नागपूर, नाशिक मंडळातर्फे देखील वृद्धाश्रम उभारण्यात येणार आहे. याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून वृद्धाश्रमात काय सोयीसुविधा असाव्यात या सर्व बाबींचा विचार करून याची रुपरेखा निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे

वृद्धाश्रमासह नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी वसतिगृहे उभारण्याचे देखील म्हाडाचे नियोजन आहे. मुंबई उपनगरात १० वसतिगृहे उभारण्यात येणार असून जागेचा शोध सुरू आहे, तर ठाण्यातील माजीवाडा येथे महिलांसाठी एक वसतिगृह उभारण्याचे प्रस्तावित असून या वसतिगृहात एकाच वेळी २०० महिलांच्या निवासाची व्यवस्था होणार आहे

Comments
Add Comment