धारावी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकांदरम्यान चाचण्यांना सुरुवात
मुंबई (प्रतिनिधी): मुंबईतील पहिला भुयारी मेट्रो मार्ग असलेल्या मेट्रो ‘अॅक्वा लाइन-३’ चा पुढील टप्पा लवकरच सुरु होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) माध्यमातून काम सुरु असलेल्या कुलाबा- वांद्रे- सीप्झ मार्गावरील मेट्रोचा एक टप्पा ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करुन सुरु करण्यात आला.
बीकेसी मेट्रो स्थानक ते आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकादरम्यानचा टप्पा सुरु झाल्यानंतर आता पुढील टप्प्यातील सहा स्थानकांची यशस्वीपणे चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे या चाचणीमध्ये मिठी नदीखालील टप्प्यातही मेट्रोने सुरक्षित प्रवास केला आहे. या चाचणीचा म्हणजेच मिठी नदी खालून मेट्रो धावत असल्याचा व्हिडीओ मेट्रोच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे. धारावी ते आचार्य अत्रे चौक या मेट्रो स्थानकादरम्यान (वरळी) मेट्रो गाडीची चाचणी करण्यात आली.
मेट्रो ‘अॅक्वा लाइन ३ ‘वरील मिठी नदीच्या खालून जाणाऱ्या मार्गावर चाचणी पूर्ण करण्यात आल्याचा व्हिडीओ मुंबई मेट्रो ३ च्या हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा टप्पा धारावी ते आचार्य अत्रे चौक या स्थानकांदरम्यान असून या टप्प्याचे एकूण अंतर ९.७७ किलोमीटर इतके आहे. या अंतरामध्ये एकूण सहा स्थानकांवर चाचणी घेण्यात आली आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणी आणि सुरक्षा प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर मार्च २०२५ पर्यंत हा मार्ग सर्व सामान्यांसाठी खुला होणार आहे.बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या सहा स्थानकांमध्ये धारावी, सीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिका लोकार्पणानंतर प्रवाशांच्या सेवेत अंशत: दाखल झाली. भुयारी मेट्रो मार्गिकेवरील १२.५ किमीचा पहिला टप्पा सप्टेंबरपासूनच सेवेत दाखल झाला आहे. या मार्गावर १० स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी ९ स्थानके भूमिगत आहेत. याच मार्गावरील आरे येथे ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहे. याच मार्गावरील पुढल्या टप्प्यातील चाचणीचा व्हिडीओ मेट्रोने शेअर केला आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी दर साडेसहा मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येत आहेत. या प्रत्येक फेरीमध्ये अडीच हजार प्रवासी एका वेळेला प्रवास करतील, अशी अपेक्षा एमएमआरडीएने व्यक्त केलेली. मात्र या मेट्रोला म्हणावा तसा प्रतिसाद मिळलेला नाही. आता दुसऱ्या टप्प्यात वरळीसारख्या महत्त्वाच्या भागात सेवा सुरु असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद या सेवेला मिळेल आणि खऱ्या अर्थाने लोकल ट्रेनला पर्याय उपलब्ध होईल असे मानले जात आहे.