माझे कोकण :संतोष वायंगणकर
मराठी, हिंदी साहित्य संमेलन कोणतंही असो. ते काही ना काही कारणांनी वाजत-गाजतच असतं. कधी एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकांच्या वक्तव्याने, कधी एखाद्या राजकीय नेत्याच्या बोलण्याने किंवा आणखी कशामुळेही साहित्य संमेलन हे चर्चेत येतच असतात. आजवर कधीही आणि कोणतंही साहित्य संमेलन काही तरी कारणानी चर्चेत येतंच. यावेळी मागील आठवड्यात दिल्लीत मराठी साहित्य संमेलन पार पडलं. देशाच्या राजधानीत होणाऱ्या या मराठी साहित्य संमेलनात काय घडणार, कोण उपस्थित राहणार, कोण कोणाशी बोलणार, व्यासपीठीय भाषणात कोण कोणावर काय भाष्य करणार खरं तर यात सामान्य माणसांना फारसं स्वारस्य नसतं. तरीही या सर्वांमध्ये माध्यमांना कमालीचं स्वारस्य राहतं. तसं ते दिल्लीतल्या साहित्य संमेलनातही होतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीतील या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार या दोघांची व्यासपीठावरील उपस्थिती, दोघांमधील संवाद, त्यांचं पाणी पिणं या सगळ्याच लहान-सहान गोष्टींकडे माध्यमांच बारकाईने लक्ष होतं. त्या संवादाच्या बातम्याही दिवसभर आणि रात्रौ उशिरापर्यंत सुरू होत्या. त्या व्यासपिठीय भेटीचा त्यांच्यातील संवादाचे बरेच अर्थ, अन्वयार्थ शोधून चर्चेच गुऱ्हाळ सुरूच होतं. सर्वसामान्य माणसांना चांगलंच माहिती असतं. वरिष्ठ पातळीवर राजकीय नेत्यांची नाती फार छान असतात. पक्षीय राजकारणापलीकडे ती जपलेली असतात. त्याचं दर्शनही अनेकदा सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक व्यासपीठावरून होत असतं. त्यामुळे या अशा संवादाचे सामान्यांना फारसं वेगळं काही वाटत नाही.
महाराष्ट्रापुरत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील राजकारण्यांचा सुसंवाद हा सर्वश्रुत आहे. याच दिल्लीतील साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ यामध्ये मुलाखतीवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मुलाखत झाली. यामध्ये बोलताना नीलम गोऱ्हे यांनी उबाठा गटामध्ये पूर्वीपासून कोणतेही पद देताना काहींना काही द्यावं लागत होतं. एवढचं कशाला मर्सिडिझ गाडी दिल्याशिवाय कोणतेही पदच दिलं जात नसल्याचं वक्तव्य उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्या मुलाखतीत केले आणि नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर शिवसेनेत खळबळ उडाली नसती तरच नवल. साहजिकच महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू झाली. आमदारकीची तिकिटं देतांना कोणते आणि कसे निकष लावून उमेदवारी जाहीर होते याच्याही खुमासदार चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाल्या.
१९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून अनेकांचा संधी मिळाली. अनेक निष्ठावंत शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरसेवक, आमदार, खासदारकीचा टिळा लावला आणि अनेक सामान्य शिवसैनिकांच्या विविध पदांवर आरूढ होण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. अनेक नव्या चेहऱ्यांना फार मोठी संधी यातून प्राप्त झाली. १९९५ मध्ये कोकणात तर तत्कालिन शिवसेना नेते विद्यमान खा. नारायण राणे यांच्यामुळे सुभाष बने, कै. आप्पा साळवी, शंकर कांबळी अशा अनेकांना त्याकाळी शिवसेनेत संधी मिळाली. माजी आमदार शंकर कांबळी यांच्याऐवजी भास्कर मयेकर यांना उमेदवारी दिली जाणार होती; परंतु नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शब्द टाकला आणि वेंगुर्लेचे तालुकाप्रमुख असलेले शंकर कांबळी आमदार झाले. त्याकाळी एखाद्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या उमेदवाराला पाठबळ देण्याची पद्धत होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उमेदवारी देताना काय हवे नको विचारीत आणि तशी व्यवस्थाही करत. तेव्हा अनेकांना शिवसेनेत हे पाठबळ खा. नारायण राणे यांनी पुरविले होते. त्या नंतरच्या काळात आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पाठबळाची जबाबदारी घेतली. अर्थात त्यावेळचे शिवसेनेतील निकष वेगळे होते. निष्ठेला महत्त्व होतं. याच शिवसेनेत माजी खा. सुरेश प्रभू यांना निवडून आणण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न तनमनधनाने खा. नारायण राणे यांनीच केले होते. गेल्या काही वर्षांत शिवसेनेचे राजकारण पार बदलून गेले. दरबारी नेत्यांनी उमेदवारी, संघटनात्मक पद या सर्वच बाबतीतील निकष पूर्णता: बदललेले आहेत. त्याची चर्चाही होताना दिसते. ठाकरेंच्या शिवसेनेत पदांसाठी होणाऱ्या घोडेबाजारावर नीलम गोऱ्हे यांनी थेट वक्तव्य करून अनेक गोष्टींना तोंड फोडले आहे. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत त्याचे पडसाद उमटले. मग नीलम गोऱ्हे यांना चार वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली. या अशा विषयावर चर्चा सुरू झाली. मात्र, एक-दोन मर्सिडिझ देण्याचा विषय देखील वेगळ्या पद्धतीने चर्चिला जात आहे. अर्थात काहीही असले तरीही पदांसाठीच्या मर्सिडिझ गाड्यांचा हा आरोप इतक्या स्पष्टतेने उपसभापती नीलम गोऱ्हे तरी कशाला करतील, त्यामुळे यातले सत्य शिवसेनेत सुरुवातीच्या काळापासून असणाऱ्या नेत्यांना निश्चितच माहिती असणारच आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेतील काही आमदारांनी कोणाकोणाला, काय-काय देऊन पद दिली जातात यासंबंधीचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्याचीच री ओढली आहे असेही म्हटले जात आहे. दिल्लीतील या अखिल भारतीय साहित्य संमेलनात मर्सिडीजची चर्चा मात्र सर्वाधिक गाजली वाजली एवढं मात्र खरं.