Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यातील सर्व एसटी बसस्थानके सीसीटीव्हीच्या निगराणीत

राज्यातील सर्व एसटी बसस्थानके सीसीटीव्हीच्या निगराणीत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणार

मुंबई : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्वच बसस्थानके आणि आगारांच्या सुरक्षेच्या मुदद्यांकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण देतानाच, राज्यभरात सर्वच एसटी बसस्थानके व आगारांमध्ये एसटी बसस्थानके ची एआय तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत यंत्रणा उभारण्यात यावी. महिला सुरक्षा रक्षक नेमावेत, असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी गुरूवारी दिले.

बसस्थानकांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षा विषयक आढावा बैठक अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या दालनात घेण्यात  आली. बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी, परिवहन आयुक्त व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय (प्रभारी) विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या. राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात यावे. तसेच बसस्थानक व आगारांमध्ये उभ्या ठेवण्यात येत असलेल्या निर्लेखन बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी परिवहन मंत्री म्हणाले, नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे. बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांची गस्त बसस्थानकावर वाढवण्यात यावी, आगार व्यवस्थापक हे त्या आगाराचे पालक असल्यामुळे त्यांनी तेथील निवासस्थानामध्येच वास्तव्य करावे! जेणेकरून २४ तास त्यांच्या निरीक्षणाखाली आगाराचे व्यवस्थापन चालेल. याबरोबरच बसस्थानकावर काम करणाऱ्या प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला त्याचे ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशांना कोणी लुबाडणार नाही. तसेच बसस्थानक अथवा आगारांमध्ये आलेल्या प्रत्येक बसची नोंदणी सुरक्षा रक्षकाकडे होणे अत्यंत आवश्यक आहे.

आरोपींची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस

  • स्वारगेट येथील राज्य परिवहन बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
  • दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुणे पोलिसांनी आरोपीला पकडण्यात मदत करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. तसेच, या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
  • गाडेबद्दल माहिती ०२०-२४४४२७६९ किंवा ९८८१६७०६५९ या क्रमांकावर देता येईल. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
  • दरम्यान, संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एकूण १३ पथके तैनात करण्यात आली आहेत, ज्यामध्ये गुन्हे शाखेच्या आठ पथके आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या पाच पथके काम करत आहेत. शोध अधिक तीव्र करण्यासाठी पोलीस पथके जिल्ह्याबाहेरही पाठवण्यात आली आहेत.

आरोपी गाडे लिफ्ट देऊन महिलांना लुटायचा

  • स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर राज्यभरात पडसाद उमटत आहेत. या घटनेतील संशयित आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीही वेगवेगळ्या पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. तो शिरूर तालुक्यातल्या गुनाट या गावचा आहे.
  • दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे हा गुनाट गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात लपून बसल्याची शंका पोलिसांना आल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला. पोलिसांकडून ड्रोन आणि डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेतला. पण आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना उशिरापर्यत यश आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -