Tuesday, April 22, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातील कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

पुण्यातील कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

गेल्या २८ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न सुटणार; रस्तारुंदीचे काम सुरू होणार

पुणे: कात्रज चौकातील गेल्या २८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ४० गुंठे जागेचे भूसंपादन करण्यास महापालिकेला यश आले आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. या जागेसाठी महापालिकेला २१ कोटी ५७ लाख ६० हजार रुपये द्यावे लागले आहेत. कात्रजकडून कोंढवा रस्त्याकडे जाणाऱ्या मुख्य चौकात ही जागा आहे. संजय गुगळे यांच्या मालकीची ही जागा आहे. शहराच्या १९८७ च्या विकास आराखड्यानुसार (डीपी) ३० मीटर डीपी रस्ता, आणि उद्यानासाठी ६ हजार २०० चौरस मीटर जागा बाधित होती. त्यानंतर २०१७ च्या विकास आराखड्यात (डीपी) हा रस्ता ३० मीटर ऐवजी ६० मीटरचा करण्यात आला. कात्रज-कोंढवा रस्ता आणि पुणे-सातारा रस्ता या दोन्हीमध्ये ही जागा बाधित होत आहे.

या जागेसाठी रोख मोबदला देण्यात यावा, यासाठी जागा मालक संजय गुगळे हे उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले होते. या जागेचे भूसंपादन २०१३च्या नवीन कायद्यानुसार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरूच होती. विशेष भूमी संपादन अधिकारी हर्षद घुले आणि अजिक्य पाटील यांनी महापालिकेच्या भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे जागेच्या ताब्याची कागदपत्रे दिली. या वेळी पालिकेचे उपअभियंता दिगंबर बिगर, शाखा अभियंता रुपाली ढगे, आरेखक संतोष शिंदे उपस्थित होते.

Pratap Sarnaik : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा- प्रताप सरनाईक

कात्रज चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. यापूर्वी महापालिकेचे आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणारे माजी आयुक्त विक्रम कुमार, माजी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही जागा ताब्यात मिळावी, यासाठी प्रयत्न केले. ही जागा ताब्यात आल्याने रस्ता रुंदीकरण होऊन नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार.

कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गुगळे यांच्या मालकीची ४० गुंठे जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका गेले अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होती. पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, कात्रज चौकातील जागा संबंधित जागामालकाने महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. ही जागा मिळावी, यासाठी गेले अनेक वर्षे पाठपुरावा केला जात होता. त्याला यश आले आहे. या जागेमुळे येथे रस्तारुंदीचे काम होऊन हा चौक मोठा होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -