परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण
मुंबई (प्रतिनिधी) : एसटी बससेवा तोट्यात असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी बस प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींना टाळे लागणार असल्याच्या चर्चांना गती आली असतानाच खुद्द राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच अशा योजना बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना या स्पष्टीकरणामुळे दिलासा मिळणार असला तरी तोटा कसा भरुन निघणार, याबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
महायुती सरकारमधील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात असल्याचे मोठे विधान केले होते. त्यामुळे एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद होणार का? याबाबत चर्चा रंगल्या होत्या. महिलांना एसटी प्रवासात मिळणारी सवलत बंद होणार नाही. तसेच जेष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत देखील बंद होणार नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
एसटी महामंडळाच्याबाबतीत आणि राज्याच्या हिताच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत. त्या निर्णयात कोणताही बदल करण्यात येणार नाही. तसेच ज्या योजना एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या आहेत त्या योजनेत देखील कोणताही बदल होणार नाही. तसेच एसटीच्या प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय देखील त्यांच्या कार्यकाळात झाला होता. तसेच ७५ वर्षांच्या पुढील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा निर्णय झाला होता. आता या निर्णयात कुठेही बदल होणार नाही, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.