कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील ६५ इमारतींचा रेरा प्रश्न आणि अनधिकृत बांधकाम प्रश्न ऐरणीवर आला असल्याने मनपाचे पुरते वाभाडे निघाले असल्याचे चित्र दिसत असताना, केडीएमसीच्या आय प्रभागात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी अधिक्षक यांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये ४ जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफिया, चाळ माफियांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसत आहे.
Thane News : ठाणे महापालिकेकडून ८१ अनधिकृत शाळांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी
केडीएमसी आय प्रभागाचे अधिक्षक शंकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आय प्रभागात बांधकामधारक बाळकृष्ण फुलोरे, मंगेश फुलोरे, सुनील राणे, सचिन म्हात्रे यांचे श्रीमलंगरोड, पुंडलिक म्हात्रे शाळेच्या मागे मौजे वसार डावलपाडा येथे बेकायदेशीर चाळींचे बांधकाम करत असल्याबाबत कागदपत्रे सादर करण्याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम,१९४९चे कलम २६० व २६७ (१) अन्वये जा.क्र.कडोंमपा/ ९ आयप्रक्षे/अबांनि/५३६, दिनांक २७/१२/२०२४ रोजी नोटीस देण्यात आली होती; परंतु बाळकृष्ण फुलोरे, मंगेश फुलोरे, सुनील राणे, सचिन म्हात्रे यांनी बांधकाम अधिकृततेबाबत कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत.
त्यानंतर तसेच त्यांनी बांधकाम काढून टाकले नसल्याचे १८फेब्रुवारी २०२५ रोजी संदर्भीत बांधकाम ठिकाणी अधिक्षक जाधव आणि सहकारी गेले असता श्रीमलंगरोड, पुंडलिक म्हात्रे शाळेच्या मागे मौजे वसार डावलपाडा येथे जाऊन समक्ष पाहणी केली असता, त्याठिकाणी अनधिकृत बांधलेल्या चाळीचे बांधकाम काढून टाकलेले नसल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे बाळकृष्ण फुलोरे, मंगेश फुलोरे, सुनील राणे, सचिन म्हात्रे या बांधकाम धारकांवर विनापरवाना अनधिकृतपणे चाळीचे बांधकाम केल्याने एमआरटीपी अंतर्गत हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.