प्रयागराज : प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याची अखेर दीड महिन्यानंतर सांगता झाली आहे. या काळात तब्बल ६५ कोटी भाविकांनी इथे पवित्र स्नान केले. महाशिवरात्रीच्या अंतिम स्नानाच्या पर्वासाठी सकाळी ८ वाजेपर्यंत लाखो लोकांनी पवित्र स्नान करत हा महारेकॉर्ड कायम राखला. हा महाकुंभ भाविकांच्या संख्येच्या हिशोबाने ऐतिहासिक ठरला आहे. केवळ कुंभ मेळाच नव्हे तर जगातील कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनात आजवर इतक्या मोठ्या संख्येने लोक एकत्र आलेले नाहीत. जितके लोक ४५ दिवसांमध्ये प्रयागराजमध्ये तयार करण्यात आलेल्या एका अस्थायी शहराशी जोडले गेले होते.
ही संख्या खरेतर अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा देखील अधिक आहे. यामध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दु्प्पट ही संख्या आहे. पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षा अडीज पट जास्त आहे. तसंच रशियाच्या लोकसंख्येपेक्षा चारपट जास्त लोक आत्तापर्यंत कुंभमेळ्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर जपानच्या लोकसंख्येपेक्षा पाच पट जास्त, युकेच्या लोकसंख्येपेक्षा १० पट जास्त आणि फ्रान्सच्या लोकसंख्येपेक्षा १५ पट जास्त इथल्या भाविकांची संख्या होती. ११ फेब्रुवारी रोजी ४५ कोटी भाविकांनी इथे पवित्र स्नान केले होते. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी ही संख्या ६० कोटींवर पोहोचली. त्यानंतर महाशिवरात्रीला या एकूण संख्येने ६५ कोटींचा आकडा पार करत नवा इतिहास रचला.
प्रयागराज इथे आयोजित महाकुंभ मेळ्यातील भाविकांची संख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्मी संख्या होती. जगभरातील हिंदू धर्माला मानणाऱ्या लोकांनी या पवित्र स्नानाचा लाभ घेतला.
महाकुंभमेळ्यात महाशिवरात्रीला स्नान करण्यासाठी बुधवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत लाखो पावले पवित्र संगमाच्या दिशेने वाटचाल करत होते. महाकुंभात गंगा, यमुना आणि सरस्वती (गुप्त) या नद्यांच्या पचित्र संगमात स्नान करून पुण्यसंचय करण्याचा दृढनिश्चय या भाविकांनी केला होता. महाशिवरात्रीच्या स्नानाची दुर्मिळ संधी गाठण्यासाठी संगम घाटावर भाविकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे आलेल्या लाखो भाविकांना नजिकच्या अन्य घाटांवर स्नान करूनही पुण्यसंचय जमविण्याचा भाविकांनी प्रयत्न केला आहे. प्रत्येक अमृतस्नानात (शाही स्नान) जवळपास अडीच कोटी भाविक सहभागी झाले. महाशिवरात्रीच्या शेवटच्या स्नानोत्सवात स्नान करण्यासाठी मोठी गर्दी आहे. आज संगमावर पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या ६६ कोटींचा आकडा ओलांडेल, असा अंदाज आहे.
७३ देशांच्या राजकीय नेत्यांचा सहभाग
या कुंभमेळ्यात ७३ देशांच्या राजकीय नेत्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भुतानचे नरेश नामग्याल वांगचूक यांच्यासह इतर देशांचे अनेक राजकीय पुढाऱ्यांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. नेपाळमधून ५० लाखांहून अधिक लोकांनी आजवर त्रिवेणी संगमावर हजेरी लावली. याशिवाय इटली, फ्रान्स, युके, पोर्तुगाल, अमेरिका, इस्राईल, ईरान, मॉरिशस या देशांमधून श्रद्धाळू कुंभमेळ्यात स्नानासाठी आले होते.
२०२७ साली नाशिकमध्ये होणार कुंभमेळा
पुढील पूर्ण कुंभमेळा २०२७ मध्ये महाराष्ट्रात नाशिक येथे होणार आहे. खोल आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्वासाठी ओळखले जाणारे नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या त्र्यंबकेश्वर भागात ‘सिंहस्थ कुंभमेळा’ भरणार आहे. नाशिकमधील कुंभमेळा किमान १७ व्या शतकापासून होत असल्याचे मानले जाते आणि त्याच्या भव्यतेसाठी ओळखले जाते. या कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. महाराष्ट्र सरकारने कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात केली आहे.