पालकमंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा
देवगड : जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा पालकमंत्री म्हणून माझा प्रयत्न राहणार आहे. पुढील आर्थिक वर्षामध्ये ३०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. पुढील आर्थिक वर्षात १०० कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण ४०० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत दिली. देवगड येथील शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटनानंतर झालेल्या पत्रकार परीषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आ.अजित गोगटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.
दरम्यान, पालकमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नरेंद्र महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. ते म्हणाले की, नरेंद्र महाराज जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त धर्मगुरू आहेत नरेंद्र महाराज यांच्या परिवाराने केलेले सामाजिक काम काँग्रेस करू शकत नाही. साधुसंतांवर बोलणाऱ्या या काँग्रेस नेत्यांबद्दल उद्धव ठाकरे पक्षाचे काय मत आहे हे त्यांनी एकदा जाहीर करावे अशीही अपेक्षा नितेश राणे यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्गच्या विकासासाठी मजबूत पाऊल
पालकमंत्र्यांनी असेही स्पष्ट केले की, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास गतिमान केला जाईल. त्यांनी जिल्ह्यातील शासन निर्णय प्रक्रियेत अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळेत निर्णय घ्यावेत, अन्यथा कठोर पावले उचलली जातील, असा स्पष्ट इशारा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध विकास योजनांसाठी निधीचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध आहे, त्याचे नियोजन अन्य माध्यमांतून केले जात आहे.
जिल्हा वार्षिक आराखड्यातील काही महत्वाच्या तरतुदी
मत्स्यव्यवसाय विकास: ५ कोटींवरून ६ कोटी,ग्रामपंचायत विकास निधी: ३.५ कोटींवरून ४ कोटी,पर्यटन विकास: ८ कोटींवरून १० कोटी,नगरविकास निधी: ३७ कोटींवरून ३८ कोटी
साकव विकासासाठी ९ कोटीवरून १२ कोटी,ग्रामीण रस्ते १३ कोटीवरून १८ कोटी, मागासवर्गीय निधी २ कोटी वरून ३ कोटी,महिला व बालविकास: ३.६ कोटींवरून ४.३५ कोटी
नाविन्यपूर्ण योजना: जिल्ह्यात नवीन उपक्रमांना चालना देण्यासाठी निधी वाढवला आहे.तो११ वरून १२ कोटी करण्यात आला.
यावर्षी ‘कोकण सन्मान’ पुरस्कार सोहळा देवगड येथे आयोजित करण्यात आला आहे. कोकणातील विविध सामाजिक माध्यम क्रिएटर्स यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील विकासकामांमध्ये शिस्त आणि गती आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे. निधी योग्य रीतीने आणि वेळेत खर्च करण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्याचे काही अधिकारी अनावश्यक रजा व वेळ काढू पणाचे धोरण घेतात पालकमंत्री म्हणून मी त्यांना शिस्त लावणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्र्यांनी सांगितले की, २०२९ पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास राज्यातील अव्वल जिल्ह्यांमध्ये करण्याचा संकल्प आहे. यासाठी पाच वर्षात एक हजार कोटी रुपये निधी आणण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.या उद्देशाने निधी आणण्यासाठी सर्व प्रकारचे राजकीय प्रयत्न आणि संसाधने वापरण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.