मुंबई : मनोरंजनाच्या कार्यक्रमांसाठी सुगीचा काळ असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पश्चिम उपनगरांतील प्रेक्षकांना नाट्यदुर्भीक्षाला तोंड द्यावे लागणार आहे. परिसरातील एकमेव मोठे नाट्यगृह बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिर (Prabodhankar Keshav Sitaram Thackeray Natya Mandir) डागडुजीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विशेषतः कांदिवली आणि बोरिवली परिसरात इतर नाट्यगृह नसल्यामुळे येथील रसिकप्रेक्षकांना दीड ते दोन तासांचा प्रवास करून शहरातील नाट्यगृहात यावे लागणार आहे. मात्र ऐन उन्हाळाच्या सुट्टीत मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून मुंबई उपनगरातील रसिकप्रेक्षकांची गैरसोय होणार आहे.
मालवणमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा करणाऱ्या भंगारव्यवसायिकावर पालिकेचा हातोडा!
ऐन सुट्टीच्या हंगामातच प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिराच्या मुख्य नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रसिकप्रेक्षक व निर्मात्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी लघु नाट्यगृहाच्या डागडुजीचे काम पूर्ण झाले असून सुट्टीच्या काळातही लघु नाट्यगृह व तालीम दालने सुरु राहणार आहेत. डागडुजीच्या कामाअंतर्गत मुख्य नाट्यगृहातील छत गळतीमुक्त करणे, नवीन बैठकव्यवस्था, फरशा बदलणे, रंगमंचाला नवा साज, कलाकार व तंत्रज्ञांच्या कक्षाची दुरुस्ती, रंगकाम, प्रकाशयोजना, विद्युत यंत्रणेत बदल यांसह नाट्यगृहाच्या परिसराची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पश्चिम उपनगरातील प्रेक्षकांना, नाट्यरसिकांना विलेपार्ले येथील मुंबई महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह गाठावे लागणार आहे किंवा जवळपास दीड ते दोन तासांचा प्रवास करून शहर आणि पूर्व उपनगरांतील नाट्यगृहांतील प्रयोग पहावे लागणार आहेत.
उन्हाळी सुट्टीच्या काळात म्हणजेच एप्रिल ते मे महिन्यांत नाट्यप्रयोगांना उत्तम प्रतिसाद असतो. मात्र पावसाळ्यात नाट्यगृहाच्या छताचे काम करता येणार नाही, त्यामुळे डागडुजीचे काम उन्हाळ्याच्या सुट्टीत होणार असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे’, असे ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले.