Saturday, October 18, 2025
Happy Diwali

महाकुंभ : महाशिवरात्रीसाठी भाविकांसाठी ३५० हून अधिक रेल्वे गाड्या

महाकुंभ : महाशिवरात्रीसाठी भाविकांसाठी ३५० हून अधिक रेल्वे गाड्या

नवी दिल्ली : महाकुंभात उद्या, बुधवारी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शेवटचे अमृतस्नान होणार आहे. यानिमित्ताने देशाच्या विविध भागातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांसाठी ३५० हून अधिक रेल्वे गाड्या सोडल्या डाणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज, मंगळवारी ही माहिती दिली. या गाड्यांमध्ये अतिरिक्त रेक जोडून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असून रेल्वेमंत्री स्वतः या कामावर लक्ष ठेवणार आहेत.

यासंदर्भात अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वेने २०२५ च्या महाकुंभाच्या शेवटच्या अमृत स्नानासाठी मोठी तयारी केली आहे. सर्व रेल्वे झोनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि सेवेच्या भावनेने भाविकांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांसाठी अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एकूणच, प्रयागराज येथून ३५० हून अधिक गाड्या चालवण्याची योजना आहे.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, प्रयागराज आणि जवळच्या स्थानकांवर ३ हजार रेल्वे संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त १५०० व्यावसायिक विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, रेल्वे सुरक्षा दलाच्या 29 तुकड्या, महिला सुरक्षा दलाच्या २ तुकड्या, २२ श्वान पथके आणि २ बॉम्ब निकामी करणारे पथके देखील तैनात करण्यात आली आहेत, ज्यामुळे यात्रेदरम्यान यात्रेकरू सुरक्षित राहतील. प्रयागराजच्या सर्व स्थानकांवर भाविकांसाठी रेल्वेने अंतर्गत हालचालींचा आराखडा तयार केला आहे. रेल्वेने माहिती दिली की, महाकुंभादरम्यान रेल्वेने डिजिटल सेवांना देखील प्रोत्साहन दिले आहे. रविवारी रेल्वेने ३३५ गाड्या सोडल्या असून १६  लाखांहून अधिक प्रवाशांना त्यांच्या मूळस्थानकांवर पोहोचवले आहे. रेल्वेने सुरुवातीला महाकुंभमेळ्यादरम्यान सुमारे १३ हजार ५०० गाड्या चालवण्याची योजना आखली होती. महाकुंभाच्या ४२व्या दिवसापर्यंत, १५ हजारांहून अधिक गाड्या धावल्या आहेत, ज्यामध्ये मोठ्या संख्येने विशेष गाड्यांचाही समावेश आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >