नवी दिल्ली : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhaava) सिनेमानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडतो आहे. ‘छावा’ची क्रेझ इतकी आहे सगळीकडे हाऊसफुल्ल शो सुरू आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, पराक्रम, त्यांचं बुद्धीचातुर्य पाहून प्रत्येकाचं मन गर्वानं फुलून जातंय. आता हा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रातील सर्व आमदारांना चित्रपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच ‘छावा’ चित्रपट पाहिला आहे. यानंतर आता राज्यातील सर्व आमदारांना हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल माहिती दिली.
दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होत आहे. त्यानंतर ४ आणि ५ मार्च रोजी सर्व आमदारांना मंत्रालयासमोर असलेल्या चित्रपटगृहात ‘छावा’ चित्रपट दाखवण्यात येणार आहे”. आमदारांना चित्रपट दाखवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं.
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनींही ‘छावा’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे. तसेच हा चित्रपट गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आलाय.या चित्रपटाला देशातूनच नाहीतर परदेशातूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विक्की कौशलचं प्रेक्षक भरभरून कौतूक करताना दिसत आहेत. सिनेमात रश्मिका मदांनाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तर अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका केली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत ३२६.७२ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.