Sunday, June 22, 2025

'मढी'च्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी

'मढी'च्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी

अहिल्यानगर : अहिल्यानगरमधील 'मढी' गावाच्या कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी करण्यात आली आहे. याबाबतचा ठराव 'मढी' गावच्या ग्राम पंचायतीने ग्रामसभेत मंजूर केला असल्याची माहिती 'मढी' गावाचे सरपंच संजय मरकड यांनी दिली. या ठरावानंतर मढी गावाची राज्यभरात चर्चा होत आहे.


अहिल्यानगरमधील 'मढी' गावात कानिफनाथ महाराजांची यात्रा भरते. होळी पासून गुढी पाडव्यापर्यंत ही यात्रा सुरु असते. हा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुखवट्याचा असतो. या काळात ग्रामस्थ तेलकट पदार्थ तळणे, लग्न कार्य, शेतीकामे, प्रवास अशा प्रकारची कामे पूर्णपणे बंद करतात. त्याच बरोबर घरातील पलंग, खाटेवर बसणे टाळतात. परंतु, यात्रेला येणारे मुस्लीम व्यापारी या प्रथा पाळत नाहीत असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे यात्रेदरम्यान येणाऱ्या मुस्लीम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



याबात गावात पार पडलेल्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे सरपंच संजय मरकड यांनी सांगितले.


दरम्यान, 'मढी' गावाने घेतलेल्या निर्णयावर भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यातील 'मढी' च्या यात्रेत मुस्लिम दुकानदारांना बंदी घालण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हा अत्यंत धाडसी आणि आवश्यक निर्णय घेतल्याबद्दल देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, सरपंच व ग्रामस्थ यांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्रातील अन्य देवस्थाने व गावांनी सुद्धा हा निर्णय लागू करावा आणि आपल्या सनातन परंपरांना दूषित होण्यापासून वाचवावे, असे आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment