मराठवाडा वार्तापत्र : अभयकुमार दांडगे
भाजपा आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना कृषी विभागात तीनशे कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप धस यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी येथे केला. शेतकऱ्यांना थेट अनुदान योजनेची रक्कम खरेदीसाठी वळती करण्यात आली. खरेदीच्या निविदा निवड समितीच्या तज्ज्ञ अध्यक्षमार्फत करण्यात आली. विशेष म्हणजे तज्ज्ञ अध्यक्ष म्हणून वाल्मीक कराड हा त्यामध्ये होता. याबाबतची कागदपत्रे धस यांनी पत्रकारांनाही दाखविली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या प्रकरणावरून राज्याचे मंत्री तथा मराठवाड्यातील ओबीसी नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे प्रकरण अजूनही ताजे असतानाच मराठवाड्यातील माजी मंत्री व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मागच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी स्वतःच्या संस्थेसाठी जास्त निधी ओढून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे. राजकारणात कोणता दिवस कोणासाठी कसा उजाडेल याचा काही नेम नाही; परंतु मराठवाड्याला मात्र राजकीय ग्रहण लागले असल्याचे अलीकडच्या घटनांवरून दिसून येत आहे.
मराठवाड्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वातावरण गरम होत असताना राजकीय वातावरणात देखील गर्मी दिसून येत आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणावरून मराठवाड्याची चांगलीच बदनामी संपूर्ण राज्यात होत आहे. राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी करा, अशी मागणी मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपानंतर मराठवाड्यात पुन्हा एकदा राजकारण वेगळ्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सरपंच हत्या प्रकरणात काय निकाल लागेल हे आज जरी सांगता येत नसेल तरी मंत्री धनंजय मुंडे यांना मात्र हे प्रकरण चांगलेच अंगलट येऊ शकते. मागच्या मंत्रिमंडळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्री असलेले मराठवाड्यातील अब्दुल सत्तार यांच्यावर कोट्यवधी रुपये चुकीच्या मार्गाने संस्थेसाठी लाटण्याचा आरोप जोर धरत आहे. या प्रकरणाची सरकारकडून गांभीर्याने नोंद घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास होणार असल्याने अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अगोदरच ते सध्याच्या सरकारवर मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आहेत. आपली ही शेवटची निवडणूक ठरेल असे वाक्य त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमात उच्चारले होते. आता त्यांची या संस्थेच्या निधी प्रकरणात चौकशी होऊन त्यात ते दोषी आढळल्यास मराठवाड्याला आणखी एक डाग लागतो की काय, अशी राजकीय चर्चा रंगत आहे. मराठवाडा तशी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते; परंतु सध्या या राजकीय मंडळींनी नको ते प्रकरण घडवून मराठवाड्याची बदनामी चालविली आहे.
भाजपा हा शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राजकारणातील हेडमास्तर म्हणून ओळखले जातात. त्यांना चुकीचे काम आवडत नाही, अशी त्यांची एक वेगळी प्रतिमा मराठवाड्यात आहे. असे असताना मराठवाड्यातील नेत्यांवर होत असलेल्या आरोपांवरून सत्य असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी व मराठवाड्यावर लागलेल्या या ग्रहणातून सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील आ. अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणात चौकशी करून त्यांच्याबाबत सोक्षमोक्ष करावा व मराठवाड्याची होत असलेली नाचक्की थांबवावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतूनच पुढे येत आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस हे विजयी झाले असले तरी त्यांच्याविरुद्ध शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेहबूब शेख यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शेख यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली. धस यांनी धार्मिक मुद्द्यांवर मत मागितले, मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हीडिओ व्हायरल केले, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले असे शेख यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी करूनही फॉर्म ‘सतरा सी’ ची प्रत मिळाली नाही आणि निवडणूक प्रक्रियेत चित्रीकरण तसेच सीसीटीव्ही फुटेज दिले नाही, यावरून निवडणूक अधिकारी विजय उमेदवाराला झुकते माप देत होते, असे शेख यांनी म्हटले आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना काढली नाही. आणि ईव्हीएमद्वारे निवडणूक घेतली त्यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्याचे कलम ५९ आणि ६१ यांचे उल्लंघन झाले. कलम ५९ मध्ये निवडणुकीत मतदान करण्याची पद्धती ही मतपत्रिकेद्वारे मतदान केले जाईल, याबाबतची आहे असेही त्यामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील आमदार सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका पुढे काय रूप घेईल याकडेही मराठवाड्यातील राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.