डॉ. सर्वेश सुहास सोमण
गेल्या अनेक महिन्यांत शेअर बाजारात फार मोठी घसरण झालेली आहे. आजपर्यंत शेअर बाजारातील मोठ्या घसरणींचा अभ्यास केला, तर प्रत्येकवेळी शेअर बाजारातील मोठी मंदी ही शेअर्स अर्थात इक्वीटी मार्केटमध्ये लाँग टर्म खरेदीची सुवर्ण संधी असते हेच सिद्ध झालेले आहे. यावेळी देखील निर्देशांकात झालेली मोठी घसरण आणि त्यासोबत शेअर्समध्ये झालेले मोठे करेक्शन ही एक चांगली संधी आहे.
गेल्या ४ ते ५ महिन्यांचा अभ्यास केला तर आज अनेक कंपन्यांचे शेअर्स उच्चांकापासून मोठ्या प्रमाणात खाली आलेले आहेत. काही शेअर्स आपापल्या उच्चांकापासून जवळपास ५० ते ६० टक्क्यांहून अधिक प्रमाणात घसरले आहेत. त्यामुळे मूलभूत अर्थात फंडामेंटल बाबतीत उत्तम पण सध्या आकर्षक किमतीला असणाऱ्या शेअर्सचां विचार करता येईल.
‘कॅम्स’ या कंपनीच्या किमतींची आत्तापर्यंत झालेली हलचाली बघता हा शेअर ५३६७ या उच्चांकापासून खाली आलेला असून आज ३४२७ रुपये किमतीपर्यंत खाली आलेला आहे. टक्केवारीत बघायचे झाल्यास आत्तापर्यंत ३६ ते ३८ टक्क्यांनी हा शेअर घसरला आहे.
‘कॅम्स’ च्या दीर्घमुदतीच्या चार्टचा विचार करता या शेअर्सच्या दीर्घ मुदतीच्या चार्टमध्ये ‘राऊंडींग बॉटम फॉर्मेशन’ ही रचना पूर्वीच तयार झालेली असून जोपर्यंत हा शेअर ३०५० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत हा शेअर पुन्हा तेजी दाखविणे अपेक्षित आहे. त्यामुळे ३४०० ते ३१०० या रेंजमध्ये टप्प्याटप्प्याने खरेदीचे धोरण ठेवल्यास दीर्घमुदतीत चांगला फायदा होऊ शकेल. ज्यामध्ये हा शेअर मोठी वाढ दाखविणे अपेक्षित आहे.
मागील आठवड्यात देखील मंदी कायम राहिली. पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची २२९६५ ही अत्यंत महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत निफ्टी या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत निर्देशांकात असलेली मंदी कायम राहील. निफ्टीची दिशा आणि गती दोन्ही मंदीची असून पुढील आठवड्यात निफ्टीने जर २२७२० ही पातळी तोडली, तर निफ्टीत आणखी १५० ते २०० अंकांची घसरण होऊ शकेल ज्यामध्ये निफ्टी २२५५० पर्यंत येऊ शकते.
(सुचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)