नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर भरलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी सारस्वतांचा विराट मेळावा असे म्हणावे लागेल. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटनाच्या वेळी केलेल्या भाषणात मराठीचे जितके करता येईल तितके कौतुक केले. त्यांचे भाषण अप्रतिम झाले यात काही शंका नाही. दिल्लीतील या आधी साहित्य संमेलन झाले ते होते १९५४ मध्ये आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. दिल्लीतील साहित्य संमेलनाला ७२ वर्षांनी यमुनेचा तीर पुन्हा मराठी सारस्वतांच्या गजबजाटाने गजबजला होता. ९८ वे मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि त्याच्या अध्यक्ष आहेत मराठी साहित्यिका तारा भवाळकर. पण शुक्रवारी झालेल्या उद्घाटनाच्या भाषणात मोदी यांनी मराठीचे कौतुक केले आणि ज्या प्रकारे त्यांनी मराठी साहित्यिकांना शाबासकीची थाप दिली त्यामुळे १२ कोटी महाराष्ट्रीय माणसांची मान ताठ झाली असेल.
पंतप्रधान मोदी यांनी मराठी साहित्यिकांचे कौतुक करताना अनेक दिग्गज मराठी साहित्यिकांची नावे आवर्जून घेतली. त्यात कुसुमाग्रज, वीर सावरकर आणि शिवराम परांजपे यांची नावे होती. त्यांची नावे घेताच मराठी जनांची मने अभिमानाने उचंबळून आली असतील. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असल्याने त्याला तसेही महत्त्व होते. त्यात तारा भवाळकर अध्यक्ष आणि मोदी उद्घाटक. त्यामुळे हा समसमा संयोग जुळून आला यात काही शंका नाही. केवळ राजकीय मंडळींनी साहित्यिकांचा केला गेलेला कौतुक सोहळा होता असा जो गैरसमज पसरला आहे तो अवाजवी आहे. कारण साहित्याला केलेला हा मानाचा मुजरा होता. राजकारण आणि साहित्य यांत नेहमीच वाद झाले आहेत. पण तेव्हाच्या साहित्यातील वादांनाही एक धार असायची. तेव्हा यशवंतराव चव्हाण आणि दुर्गा भागवत यांच्यात असाच वाद रंगला होता आणि तो झाला होता कराडच्या साहित्य संमेलनात. पण आणीबाणीच्या काळात झालेले ते संमेलन नंतर कित्येक वर्षे त्याचे कवित्व सुरू होते. असे अपवाद सोडले, तर मराठी साहित्य संमेलने ही साहित्यिक चर्चांची आणि परिसंवादांची मेजवानी राहिली आहेत. संमेलनाच्या उद्घाटनाच्या भाषणात मोदी यांनी जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे तसेच बाबासाहेब आंबेडकर या समाजसुधारकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले, तर लोकमान्य टिळक, वीर सावरकर यांच्या नावांचा उल्लेख केला. ज्यामुळे १२ कोटी मराठी लोकांची मान गर्वाने ताठ झाली असणार. मोदी यांनी सर्वंकष मराठी साहित्याचा विचार केला आहे असे त्यांच्या भाषणातून दिसले. मराठीत विज्ञान कथाही निर्माण झाल्या याकडे त्यांनी लक्ष वेधले. पण मराठी साहित्याच्या कौतुकाचा हा सोहळा पुरेसा आहे का? हा प्रश्न आहे. मराठी भाषा टिकायची असेल, तर सर्वांना म्हणजे अगदी प्रत्येकाला प्रयत्न करावे लागतील. पण आपल्याकडे मराठी शाळा टिकत नाहीत अशी स्थिती आहे. जो उठतो तो आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालतो आहे आणि त्यामुळे मराठी भाषा टिकणार कशी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे मराठी शाळा टिकवण्याचे आव्हान, तर दुसरीकडे मराठी माध्यमातील मुले टिकवण्याचे आव्हान अशा दुहेरी कात्रीत सारी मराठी भाषा सापडली आहे. भाषा संवादाचे माध्यम आहे हेच लोक विसरून गेले आहेत. इंग्रजीने अतिक्रमण केले आहे आणि त्याचा फटका मराठी भाषेला बसला आहे. यावर साहित्य संमेलने काय करणार हा प्रश्न आहे. केवळ दोन दिवसांचा हा उत्सव नाही, तर मराठी भाषा टिकवण्याची ती अखंड चालणारी चळवळ आहे हे लोकांना पटवून देण्याची गरज आहे. पण त्यावर सरकार आणि मराठी भाषक काही करत आहेत असे म्हणवत नाही. शालेय शिक्षणाची तर दुरवस्था झाली आहे आणि पाचवीतील मुलांना साधे मराठी प्रश्नही वाचता येत नाहीत असे असरचा अहवाल सांगतो. त्यावरून असे उत्सव भरवून काही उपयोग नाही, तर मराठी भाषा संवर्धनासाठी काही तरी ठोस उपाय करण्याची गरज आहे.
१८७८ साली पहिले मराठी साहित्य संमेलन भरले होते आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यानंतर आता अनेक मराठी सारस्वतांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे आणि त्यात आचार्य अत्रे, ना. सी. फडके तसेच पु. ल. देशपांडे या दिग्गजांचा समावेश होता. ही मंडळी होती तेव्हा मराठी साहित्याचा एक लौकिक होता आणि त्यांना वलय होते. आज त्यापैकी काहीही उरले नाही. कित्येक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची नावेही माहीत नाहीत. त्यामुळे साहित्य संमेलनाची लोकप्रियता कमी झाली असे नाही पण त्यांतील लोकांची उपस्थिती रोडावली. साहित्य संमेलन हे महाराष्ट्राची शान आहे आणि त्यांचे यथोचित स्वागत व्हायला हवे. पण आजकाल त्याची आवड फारशी कुणालाच नाही. वाचण्याची आवड नाही. त्यामुळे साहित्यिक आणि साहित्य यांना कोण विचारतो अशी स्थिती आहे. साहित्य संमेलन ही एक मराठी माणसाची गरज आहे. त्यामुळे ती हवीतच. पण त्यासाठी सकस साहित्य निर्माण व्हायला हवे आणि त्यावर तितकीच साधकबाधक चर्चा व्हायला हवी. पण तसे ते हल्ली कोणीही करत नाही. पंतप्रधान मोदी यांच्या मराठीतील भाषणाने अनेकांना गहिवरून आले यात काही आश्चर्य नाही. पण त्यातील विचार आणि मोदी यांची तळमळ सखोल सर्वांपर्यंत गेली पाहिजे तरच या साहित्याच्या सोहळ्यांना काही अर्थ आहे. देशाच्या राजधानीत भरलेल्या साहित्य संमेलनाला गर्दी तर अफाट आहे पण त्याचा उपयोग मराठी पुस्तके खरेदी आणि वाचनाची आवड निर्माण व्हायला हवा.