डॉ. संजय भिडे, संस्थापक, प्रवर्तक व सचिव
२४ फेब्रुवारी १९९४ या दिवशी, मी स्थापन केलेल्या इंडो-मंगोलियन फ्रेंडशिप सोसायटी आणि इंडो-मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री या दोन्ही संस्थांचे उद्घाटन जरी, मंगोलियाचे तत्कालीन राष्ट्रपती माननीय पुनसालमागिन ओचिर्बात यांच्या हस्ते झाले असले तरी, या संस्थांचे प्रारंभीचे यश मर्यादित स्वरुपाचे होते.
साम्यवादी रशियाचा मंगोलिया हा मांडलिक देश होता. १९९१मध्ये साम्यवादी रशियाचे विघटन झाल्यावर मंगोलिया आर्थिक बिकट परिस्थितीत अडकला होता. मंगोलिया बौद्ध देश असल्याने, त्या काळात मंगोलियाला धार्मिक जवळीकीमुळे हिंदुस्तानाने मंगोलियात भरघोस गुंतवणूक करावीशी वाटत होते. मी स्वतः मंगोलियन सरकारच्या आमंत्रणावरून एकटा मंगोलियाला जाऊन आलो होतो. तसेच, मी मंगोलियाला २ शिष्टमंडळे पण घेऊन गेलो होतो. वसंत साठे, नकुल पाटील, रमाकांत खलप, सुरेश प्रभु, अण्णा जोशी, पी.डी.पाटील आदि वजनदार मंडळींचा या दोन्ही शिष्टमंडळांमध्ये समावेश होता.
पण, तत्कालीन हिंदुस्थानाच्या काँग्रेस सरकारने पोसलेल्या भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव होता. वस्तुतः मंगोलियाकडे दुर्मीळ व उच्च किमतींच्या खनिजांचा विपुल साठा असला, तरी तत्कालीन काँग्रेस सरकारने मंगोलियाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले! आज मंगोलियातील सर्व महत्त्वाचे मोठे खनिज प्रकल्प अमेरिका, पाश्चिमात्य देश, रशिया, चीन, जपान, दक्षिण कोरिया आदि देश करत आहेत.आणि हिंदुस्तान कुठे आहे ?
मंगोलियाशी संबंधित उपरोक्त संस्था स्थापन करताना माझ्यामागे भक्कमपणे आधारस्तंभ असणारे नकुल पाटील, बाळ गुणाजी, दादासाहेब रुपवते, प्रकाश धारप, मोहन गोरे, ए. एन्. कोल्हटकर, अनील भिसे, लॅरी डिसौझा, गोपाळ अग्रवाल आदि बऱ्याच हितचिंतकांनी इंडो-मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री बरखास्त करून नवीन सर्वसमावेशक संस्था स्थापन करण्याचा सल्ला दिला. या हितचिंतकांच्या सल्ल्यानुसार,पण इंडो-मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ही मूळ संस्था बरखास्त न करता,त्याच कार्यकारिणीच्या मदतीने मी ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची स्थापना देखील २४ फेब्रुवारी याच दिवशी, पण १९९९ मध्ये झाली. उद्योगपती अतुल भगवतींच्या हस्ते ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री या संस्थेची स्थापना झाली. माझ्या सुदैवाने रिलायन्स इंडस्ट्रीजचे निवृत्त ग्रुप प्रेसिडेंट पी. एन्. देवराजन् यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून धुरा आपल्या खांद्यावर घेण्यास मान्यता दिली.
जगातील श्रीमंत विकसित देश आणि अविकसित गरीब देश यांच्यातील आर्थिक विषमता, आर्थिक बळावर श्रीमंत देशांकडून गरीब देशांची होणारी आर्थिक पिळवणूक यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सशक्त सक्रिय यंत्रणेचा असणारा अभाव, हे सूत्र मी देवराजन् यांच्यासमोर मांडले. तसेच हिंदुस्थानातील उद्योजकांना व आयात-निर्यातदारांना नवनवीन बाजारपेठा उपलब्ध करून देणे, जागतिक व्यापारात पारदर्शकता, पर्यावरण, आरोग्य, जागतिक पर्यटनास चालना, आंतरराष्ट्रीय व्यापारात नैतिकता आणि उचित कर्मसंस्कृतीस प्रोत्साहन आदि मुद्दे मी त्यांच्यासमोर मांडले होते. इंडो-मंगोलियन चेंबरचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या ज्या सभागृहात झाले, त्याच सभागृहात आम्ही ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे २४ फेब्रुवारी १९९९ ला उद्घाटन झाले. ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उद्घाटनासाठी अतुल भगवती या प्रमुख पाव्हण्यांच्या बरोबर संस्थापक अध्यक्ष पी एन्.देवराजन, संस्थापक उपाध्यक्ष नकुल पाटील, लॅरी डिसोझा, तसेच नेदरलॅण्ड्स, चीन, इस्रायल व व्हिएतनाम या देशांचे कॉन्सुल जनरल्स व मंगोलियाच्या मानद कॉन्सुलेटचा प्रतिनिधी उपस्थित होते. नवीन सभासद आणणे, प्रसंगी कार्यक्रमांचा खर्च उचलणे, मदतनिसांच्या पगाराची व्यवस्था बघणे, अशा विविध बाबींमध्ये माझ्या हितचिंतकांनी मला भरभक्कम मदत केली. प्रारंभीच्या काळात सुमारे २० वर्षे दोन्ही चेंबरचे कार्यालय माझ्या घरातच होते.
मला प्रारंभी मदत करणाऱ्यांमध्ये मुकुंद परदेशी, पद्माकर देसाई, प्रवीण लुंकड, जयकिशोर चतुर्वेदी, उदय नाईक, सतवंत सिंग भट्टी, अंजली काळे, किरण शांताराम, रामदास आठवले, नीलम गोऱ्हे, डॉ. मोहम्मद अली पाटणकर, जमशेद मिस्त्री आदिंनी मदत केली. चेंबरच्या वाटचालीमध्ये सुरुवातीस सन्निधा भिडे व हल्ली वैशाली भिडे या दोघींचाही विशेष उल्लेख मी करणे आवश्यक आहे. ट्रान्स एशियन चेंबरचे विधिवत उद्घाटन झाल्यावर मी परदेशी वकिलांशी संपर्क निर्माण करण्यास प्रारंभ केला. चेंबरच्या व्यासपीठावर मी विविध देशांच्या राजदूतांना व वाणिज्य प्रतिनिधींना भाषण देण्यासाठी बोलावण्यास प्रारंभ केला. आज सव्वीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे एक हजारापेक्षा जास्त सभासद आहेत. चेंबरने सत्तर देशांशी संबंध प्रस्थापित केले आहेत.
आजवर चेंबरने एकंदर पंधरा देशांतील अठरा चेंबर्सबरोबर सामंजस्य करार केले आहेत. आणि इस्रायल, यु. के.,अमेरिका, बांगलादेश, नेपाळ, पोलंड, मॉरिशस आदि सात देशांमध्ये संपर्क प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. तसेच चेंबरने आजवर इजिप्त, इस्रायल, इराण, मंगोलिया, चीन, दक्षिण कोरिया, नेपाळ, बांगलादेश, नामिबिया आदि देशांना शिष्टमंडळे नेली आहेत. गेल्या वर्षी आपल्या ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली. चेंबरचा रौप्य महोत्सव दहा देशांचे राजनैतिक प्रतिनिधींसह थाटामाटात साजरा केला गेला. अशा आपल्या ट्रान्स एशियन चेंबरची आणखी दोन वैशिष्ट्यपूर्ण ठळक कार्ये म्हणजे चेंबरच्या वार्षिक वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी’ हा पुरस्कार समाजातील विविध घटकांमध्ये समाजाच्या उत्थानासाठी सातत्यपूर्ण कार्य करणाऱ्या अप्रसिद्ध व्यक्तींना शोधून काढून देणे आणि दरवर्षी इंडो-मंगोलियन चेंबर व ट्रान्स एशियन चेंबरच्या वार्षिक कार्याचा आढावा घेणारे प्रकाशन ‘मैत्री’ या शीर्षकाखाली छापणे.
आता आपल्या ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे नेतृत्व प्रमुख पुण्याचे उद्योगपति प्रविण लुंकड हे करत असून उदय नाईक कार्यकारी अध्यक्ष आहेत. तर इंग्लंडमधील चित्रकार व व्यावसायिक ग्रॅहॅम लंडन सोमवार, २४ फेब्रुवारी दिवशी साजऱ्या होणाऱ्या २६ व्या वर्धापन दिनी चेंबरचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. सोमवार, २४ फेब्रुवारी या दिवशी आपले इंडो-मंगोलियन चेंबर ३१ वर्षे पूर्ण करत आहे, तर ट्रान्स एशियन चेंबर २६ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण करत आहे. समाजाच्या उत्थानाचे, कार्य सातत्याने आम्ही करणारच आहोत. तेव्हां लोभ असावा.