Sunday, April 20, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनतरुणाई नि भाषेचा जीवनरस

तरुणाई नि भाषेचा जीवनरस

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर

माझ्या आसपास वावरणारी महाविद्यालयीन वयातली तरुण मुले पाहताना अलीकडे प्रकर्षाने जाणवते की, ही मुले मराठीपासून दूर जात आहेत. याचे कारण त्यांचे पालक आहेत. एकतर असंख्य मुलांना मराठीत शिकण्यापासून त्यांच्या आई-बाबांनी वंचित ठेवले. आपली भाषा किती मौल्यवान आहे हे मुलांना सांगण्यात आई-बाबाच तर कमी पडले.

पण तरी कधीकधी असे काही जाणवते की, ही मुलेही आपल्या भाषेवर प्रेम करतात. शब्दांना गुंफून कविताही रचतात. छोटी-छोटी नाटुकली बसवतात. त्यांना ही मुले ‘स्किट’ असे म्हणतात. महाविद्यालयातल्या ‘ट्रॅडिशनल डे’ला नऊवारी साडी आणि नथीसह सजतात. लेझीमचा ताल कधीतरी त्यांना हवाहवासा वाटतो. विनोदी काहीतरी करण्याच्या नादात ही मुले बाष्कळ बडबड करतात. कुठेतरी ऐकले, पाहिलेले विनोद बेधडक सादर करतात. खूपदा वाटते या मुलांना मराठीतले अस्सल नाटक, इथले संगीत, वैविध्यपूर्ण कविता यांची गोडी कशी कळेल?

या तरुणाईपर्यंत आपल्या भाषेची बलस्थाने कशी पोहोचवायची, हा प्रश्न मनाला अस्वस्थ करतो. ‘तरुण पिढीची मराठी’ हा विषय अलीकडे चांगलाच चर्चेत असतो. या पिढीची भाषा नव्या पद्धतीने घडते आहे. इंग्रजी, हिंदी, शब्दांचे वेगळेच रसायन त्यांच्या मराठीत तयार होते आहे. व्हाॅट्सअॅप, मेसेज, फेसबुक आणि इमोजीस अशा सर्वांतून त्यांची भाषा घडते आहे. तरुण पिढीला या सर्वांसकटच समजून घ्यावे लागणार आहे.

आपल्या भाषेशी जुळलेले बंध आपले व्यक्तिमत्त्व घडवतात. इतरांसमोर स्वतःला सादर करताना आत्मविश्वास देतात. बोलण्याचे कौशल्य विकसित करतात. एखादा विषय समजून घेताना, त्याचे वेगवेगळे पैलू कसे समजून घ्यायचे, हे मातृभाषेवरच्या प्रभुत्वाने अधिक शक्य होते.मराठीमुळे काय शक्य नाही असे सांगणारे अनेक दिसतील. मराठीमुळे काय शक्य होऊ शकते हे केवळ सांगण्याचीच नाही तर सिद्ध करण्याचीही वेळ आहे.नुकताच जागतिक मातृभाषा दिन साजरा झाला. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विविध देशांनी मातृभाषेशिवाय विकास शक्य नाही हे स्वीकारले. त्यांना याची मधुर फळेच प्राप्त झाली. आपल्या भाषेविषयी कोणताही कमीपणा वाटायची गरजच नाही. भाषा दुबळी नसते, तिला तिचे भाषकच सक्षम करतात.

मराठी संवर्धनाच्या प्रवासात आता नव्या पिढीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ज्ञानाच्या विविध क्षेत्राशी निगडित शब्द, विविध संकल्पनांचे अर्थ मराठीत आणायचा प्रयत्न आता त्यांनी करायला हवा. माझ्या मित्राची मुलगी पशुवैद्यक विद्याशाखेचे शिक्षण घेते आहे. आदिवासी भागात तिचे शिबीर आहे. गुरांच्या रोगांची नावे या मुलांना इंग्रजीत माहीत आहेत. पण स्थानिक आदिवासींकडून मुले त्यांना माहीत असलेली नावे समजून घेत आहेत. बोलींशी जोडले जाण्याचा हा किती छान मार्ग आहे. आपल्याकडे दर बारा कोसांवर भाषा बदलते असे म्हणतात. हे मराठीचे वैभव आहे. आपल्या मातीच्या या बोली
जीवनरस पुरवतात. तो पुढल्या कित्येक पिढ्यांचे भरणपोषण करेल, हा विश्वास महत्त्वाचा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -