Tuesday, March 18, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनआपण ऐकत आहात… रेडिओ बेगम

आपण ऐकत आहात… रेडिओ बेगम

दी लेडी बॉस :अर्चना सोंडे

जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी आणि ओस्लोच्या पीस रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारे दी वुमन, पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स प्रकाशित केला जातो. समाजातील स्त्रियांचे स्थान, न्याय व्यवस्थेतील प्रतिनिधित्व आणि त्यांची सुरक्षिततेविषयी भावना, घरात, समुदायात महिलांच्या हक्कांचे मोजमाप या अहवालात केले जाते. या अहवालाने महिलांना राहण्यासाठी सर्वांत १० वाईट देश निवडले होते. त्यात पाकिस्तान १० व्या क्रमांकावर तर अफगाणिस्तान देश पहिल्या क्रमांकावर होता. महिलांचे अस्तित्वच नाकारणाऱ्या अफगाणिस्तानात ती खंबीरपणे उभी राहिली. इतकंच नव्हे तर महिलांसाठी ती रेडियो चॅनेल देखील चालवते. ही धाडसी महिला म्हणजे हमीदा अमन.

काबूलमध्ये जन्मलेली, हमीदा अमन सोव्हिएत ताब्यापासून तिच्या पालकांसह पळून गेली आणि वयाच्या ८ व्या वर्षी १९८१ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये आली. सप्टेंबर २००१ मध्ये ट्विन टॉवर्सच्या दुर्दैवी घटनेनंतर, एल हेबदोसाठी स्वतंत्र पत्रकार म्हणून, तिने अफगाणिस्तानमधील संपादकीय कर्मचाऱ्यांसह काम केले. मायदेशात परतल्यामुळे आणि विशेषतः स्त्रियांच्या परिस्थितीमुळे अस्वस्थ होऊन २०२१ मध्ये, तिने अफगाण महिलांना मदत आणि समर्थन देण्यासाठी बेगम ऑर्गनायझेशन फॉर वुमन या एनजीओची स्थापना केली. ८ मार्च २०२१ रोजी रेडिओ बेगम सुरू झाला.या रेडियोची खासियत म्हणजे येथे सर्व कर्मचारी महिला आहेत. अफगाणिस्तानच्या महिलांमध्ये पुन्हा आशा पल्लवित करणे हे त्यांचे ध्येय आहे. प्राचीन अफगाणिस्तानात, “बेगम” ही एक खानदानी पदवी होती ज्याचा उपयोग शाही दरबारात राण्यांसाठी केला जात असे, महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी आणि त्यांना राणींप्रमाणे वागणूक मिळण्यास पात्र आहे हे सांगण्यासाठी अमनने हे नाव संस्थेसाठी आणि रेडिओसाठी निवडले.रेडिओ बेगम १९ अफगाण प्रांतांमध्ये, विशेषतः बदख्शान, घोर आणि निमरुझ सारख्या दुर्गम भागात १६ प्रसारण अँटेनाच्या मदतीने कार्यरत आहे. हे कव्हरेज महत्त्वपूर्ण आहे, कारण मीडिया आउटलेट्सना या प्रांतांमध्ये अनेकदा प्रवेश मिळत नाही आणि तालिबानने अफगाण महिलांना अलग ठेवण्याच्या प्रयत्नात निर्बंध लादले आहेत. येथे पोहोचण्यासाठी रेडियो बेगम हा एकमेव मार्ग आहे.

रेडिओ बेगममध्ये सुमारे ३० महिला कर्मचारी कार्यरत आहेत. महिलांना संवाद साधण्यासाठी आणि परस्पर संवादात गुंतण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध आहे. कमालीचे निर्बंध असलेल्या तालिबानी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या संभाव्य परिणामांपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात रेडिओ बेगम अफगाण महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल शक्य तितक्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतात. रेडिओचे मुख्य ध्येय स्त्री शिक्षण आहे. सातवी ते बारावीच्या इयत्तेतील महिला विद्यार्थिनींना पर्शियन आणि पश्तो भाषेत शिक्षण देण्यासाठी दिवसाचे सहा तास दिले जातात. रेडिओच्या इतर विषयामध्ये आरोग्य, पोषण, पालकत्व आणि महिला सल्ला समाविष्ट आहे. रेडिओ बेगम महिला डॉक्टरांना थेट कार्यक्रमांमध्ये सहभागी करतात. त्यामुळे महिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.

महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या आवाजाला बळकटी देण्यासारखे विविध कार्यक्रम डिझाइन केलेले आहे. अफगाण महिलांना त्यांच्या कथाकथन करण्याची संधी येथे आहे. स्त्रियांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमासोबतच, त्यांचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम सादर केले जातात. इतर कार्यक्रम मुलींना शिक्षित करतात, त्यांना कौशल्ये विकसित करण्यास मदत करतात.अफगाणिस्तानात महिलांसाठी अत्यंत कडक कायदे आहेत. महिला आणि पुरुष यांच्यात कोणताही संवाद नसावा, महिलांना सरकारी पत्रकार परिषदेत सहभागी होण्यास मनाई आहे, महिलांना एकट्याने प्रवास करण्यास मनाई असणे यासारखे अनेक कठोर निर्बंध आहेत. या पार्श्वभूमीवर रेडिओ बेगम ज्या पद्धतीने कार्यरत आहे ते कौतुकास्पद आहे. याचे महत्त्वाचे श्रेय हमीदा अमनचे आहे.अफगाणिस्तानमधील वेगवान घडामोडींनी रेडिओ बेगमचे रूपांतर महिलांसाठी सर्वाधिक मागणी असलेल्या माध्यमामध्ये केले आहे. रेडिओ बेगमने सुरुवातीला केवळ महिलांच्या विशिष्ट मनोरंजनात्मक, शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या, पण अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर तो “अफगाण महिलांचा आवाज” बनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही पत्रकारांनी रेडिओ बेगम स्टुडिओला भेट दिली पण सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी अनेक मुलाखती घेण्याचे टाळले.

अफगाणिस्तानमध्ये, जेथे तालिबानने महिलांना एकाकी पाडले आहे, अशा ठिकाणी रेडिओ स्टेशनचे कार्यरत असणे हा एक संवेदनशील प्रयत्न आहे. अमन आणि त्यांच्या टीमला दररोज आव्हानांचा सामना करावा लागतो. सोशल मीडियाप्रमाणेच त्यांच्या कार्यक्रमांवर देखील नजर ठेवली जाते. रेडिओवरील मजकूर स्पष्ट करण्यासाठी तालिबानही त्यांना समन्स बजावतात. असे असले तरी वहिदा मान्य करतात की, तालिबान कधीकधी कठोरपणे वागतात. तर कधी कधी संय़माने वागतात. अमनला आशा आहे की, तालिबानच्या आव्हानांना तोंड देत रेडिओ बेगम सेवा देण्यास सक्षम असेल. अशा वातावरणात काम करणे अत्यंत जिकिरीचे असून देखील आपली टीम जीव धोक्यात घालून काम करते याचा हमीदा यांना अभिमान वाटतो.ज्या काळात मुलींचे शिक्षण सहाव्या इयत्तेपलीकडे निषिद्ध मानले गेले आहे. महिलांच्या नोकरीवर, त्यांच्या मुक्तपणे कपडे घालण्याच्या अधिकारावर, त्यांच्या एकत्र येण्याच्या अधिकारावर आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांच्या सहभागावर बंदी आहे, अशा स्वातंत्र्याची गळचेपी होणाऱ्या काळात रेडिओ बेगम अफगाण महिलांचा आवाज बनला आहे. या आवाजाची खऱ्या अर्थाने सक्षम अशी लेडी बॉस हमीदा अमन आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -