प्रा. देवबा पाटील
त्या दिवशी मात्र वातावरणात थोडेसे धुके पडलेले होते. धुक्याचा त्रास होऊ नये म्हणून आनंदरावांनी त्याला मफलर नाकातोंडावरून येईल अशी नीट बांधून दिली व स्वत:च्याही नाकातोंडावर आपली मफलर बांधली. असेच त्या दिवशीसुद्धा चालतांना नेहमीप्रमाणे स्वरूपची जणूकाही पोपटपंची सुरू झाली. समोर अगदी विरळ दिसणारे धुके बघून स्वरूपने आजोबंाना “धुके हिवाळ्याच्या दिवसांतच व सकाळीच कसे काय पडते हो आजोबा?” असा प्रश्न केला. आजोबा सांगू लागले, “हिवाळ्यात सकाळी सगळीकडे धुक्याचा धूसर पडदा पसरलेला दिसतो. हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा सूर्याच्या दुपारच्या उष्णतेने हवा तापते व वातावरणात बाष्प असतेच. मध्यरात्रीनंतर सकाळी सकाळी थंडीमुळे वातावरणांचं तापमान बरच कमी होऊन हवेत असलेलं बाष्प गोठतं व त्याचे छोटे-छोटे अतिशय सूक्ष्म बाष्पकण बनतात. हे कण हवेतच थंड स्वरूपात साचून राहतात. हेच कण जमिनीलगतच्या तरंगणाऱ्या धूलिकणांवर जमा होऊन त्याला पांढरसं दृश्यरूप प्राप्त होते. त्याने वातावरण भरून जाते. तेच धुके असते. धुके म्हणजेच हवेतील बाष्पाच्या गोठलेल्या सूक्ष्म कणांचा थर होय. त्यामुळे त्यातून सूर्यही उगवल्यानंतर सुंदरसा, पांढुरका चंदेरी असा दिसतो. सूर्य जरा वर आला की, हळूहळू धुके नाहीसे होते.” “पण मग दिवसा धुके का नाही पडत?” स्वरूपने प्रश्न केला. “सूर्योदयानंतर हळूहळू जसजशी जमीन तापू लागते व वातावरणात उष्णता वाढू लागते तसतसे धुक्यातील सुक्ष्म बर्फकणांची व जलबिंदूंची वाफ होऊ लागते व धुकेही तसतसे विरळ होत जाते नि थोड्याच वेळात नाहीसे होऊन हवा पुन्हा पूर्वीसारखी स्वच्छ होते. जेव्हा हवेत धुळीचे, धुराचे कण तरंगत नसतात तेव्हा गोठलेल्या वाफेतील सूक्ष्म जलबिंदूंना चिकटायला काहीच न मिळाल्याने धुके तयार होत नाही.” आनंदरावांनी सांगितले. “धुक्यातून आपणास समोरचे का दिसत नाही आजोबा?” स्वरूपने विचारले.
“दाट धुके पडले असता थोड्या अंतरावरील पदार्थही आपणास दिसत नाहीत कारण त्यातील घनदाट गोठीव जलबिंदू व घनगर्द धूळकणांनी प्रकाशाचे किरण अडतात व ते आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. धुके जसजसे विरळ होत जाते तसतसे प्रकाशकिरण आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचू लागतात व आपणास ते पदार्थ दिसू लागतात.” आजोबा म्हणाले.
“आजोबा, मी असे ऐकले आहे की, सकाळी तलावावरही धुके तयार होते. ते खरे आहे का?” स्वरूप बोलला. “हो, खरे आहे ते.” आनंदराव म्हणाले, “ पाण्याची वाफ सर्व ऋतूंत सतत होतच असते; परंतु ही वाफ सामावून घेण्याची हवेची क्षमता ही वातावरणाच्या तापमानावर अवलंबून असते आणि जास्त तापलेल्या हवेत जास्तीत जास्त वाफ सामावून घेतली जाते; परंतु हिवाळ्यात पहाटेच्या थंडाव्यामुळे हवेचे तापमान खूपच कमी होते आणि हवेची बाष्प सामावून घेण्याची क्षमता सुद्धा कमी होते म्हणून हिवाळ्यात सकाळी तलाव व नदीवर ही ज्यादा प्रमाणातील वाफ आपणांस बाहेर पडताना दिसते. याच वाफा थंडीने थोड्याशा गोठल्यास जलाशयांवर धुके तयार होते.” “आजोबा. बघा हे सूर्यफुलांच शेत कसं सोन्यासारखं पिवळ धम्मक दिसतं.” स्वरूप एकदम आनंदाने उद्गारला व पुढे म्हणाला, “बाबा म्हणतात की, सूर्यफूल हे नेहमी सूर्याकडेच वळते. हे कसे काय घडते हो आजोबा?” “सूर्यफुलावर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा सूर्यफुलाची सावली त्याच्याच दांडीवर पडते. दांड्याच्या ज्या ठिकाणी छाया पडते त्या ठिकाणी दांड्याच्या कोशांमध्ये म्हणजे पेशींमध्ये थोडेसे पाणी जमा होते. या पाण्याच्या दाबामुळे ते फूल सूर्याकडे झुकते. सूर्याच्या फिरण्याने हळूहळू ही प्रक्रिया सतत सुरू राहते व सूर्य जिकडे असतो तिकडे ते फूलही आपोआप झुकतं नि वळत जाते. त्यामुळे सकाळी सूर्य उगवल्यापासून तो संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत सूर्यफूल सूर्याच्या दिशेने किंचितसे झुकलेले आपणांस दिसते.” आनंदरावांनी सांगितले. अशी सहजगत्या ज्ञानप्राप्ती करीत स्वरूप आनंदात आपल्या आजोबांसोबत घराकडे परतला.