अॅड. रिया करंजकर
समाजात गुन्हेगारी वेगवेगळ्या प्रकारची असते, पण सध्या गुन्हेगारी कमी आणि कौटुंबिक वाद जास्त दिसू लागले आहेत. हे कौटुंबिक वाद नव्या पिढीतच नाही, तर जुन्या पिढीतही होती. तर कुठेतरी हे वाद घरच्या घरी मिटवले जात होते. कल्पना आणि सदाशिव यांचं लग्न घरच्यांनीच लाऊन दिलं होतं. सदाशिव हा रेल्वेमध्ये चांगल्या पोस्टवर कामाला होता. संसार आनंदाने सुरू होता. या दोघांना अनिल नावाचा एक मुलगाही झाला. दोघांमध्ये वाद होत नव्हते पण कल्पनाची वहिनी सदाशिवला काहीतरी सांगायची आणि त्यावरून त्या दोघांमध्ये वाद होत होते. शेवटी या वादाला कंटाळून कल्पना आणि सदाशिव वेगळे राहू लागले. कल्पनाचे वडील चांगल्या ठिकाणी नोकरीला होते. त्याच्यामुळे कल्पनाची जबाबदारी तिच्या वडिलांनी जरी घेतली तरी ती आपल्या आई-वडिलांसोबत न राहता एकटीच राहत होती. इकडे सदाशिवने कल्पनाबरोबर घटस्फोट न घेता सरितासोबत दुसरे लग्न केलं. आई-वडिलांच्या भांडणांमध्ये अनिलचे शिक्षण अपूर्णच राहिले. चौथी शाळा शिकल्यानंतर त्याला पुढील शिक्षण मिळाले नाही. त्याचवेळी कल्पनाचे वडीलही गेले आणि त्यामुळे कल्पना, तिची बहीण व तिचा भाऊ यांच्यामध्ये बाहेरच्या मालमत्तेवरून वाद सुरू झाले. तो वाद न्यायालयात सुरू असल्याने कल्पना आणि तिच्या बहिणीला न्यायालयात जावं लागायचं. कल्पनेच्या वहिणीला असं वाटलं होतं की नवरा-बायकोमध्ये भांडण लावून दिले तर ती माहेरच्या मालमत्तेकडे लक्ष देणार नाही पण झालं मात्र उलटं.
आपल्याला जगण्यासाठी काहीतरी आधार हवा म्हणून कल्पनाने तिच्या बहिणीने भावाच्या विरुद्ध न्यायालयात ताक मागायची होती. कल्पना मालमत्तेसाठी कचेऱ्या फिरत होती आणि बिचाऱ्या अनिलकडे मात्र लक्ष कमी देत होती. त्यामुळे त्याचे शिक्षण अर्धवट राहिले. अनिलही आईसोबत न्यायालयात फिरत होता. त्याच्यामुळे कुठे कसं काय असतं या गोष्टी त्याला समजू लागल्या. त्यातच त्याचे वडील म्हणजे सदाशिव यांचे निधन झालं. त्यावेळी आपली आई प्रथम बायको आहे आणि त्यांच्यात घटस्फोट झाला नव्हता. त्याच्यामुळे वडिलांची जी पेन्शन आहे ती कल्पनालाच मिळाली पाहिजे यासाठी न्यायालयात त्यांनी न्याय मागितला आणि कल्पना प्रथम पत्नी असल्यामुळे आणि मुलगा असल्यामुळे सदाशिवची पेन्शन कल्पनाला मिळू लागली. सदाशिवच्या दुसऱ्या पत्नीने मात्र दोघांना त्यांचे असलेले दोन रूम होते ते मात्र कल्पनाला देण्यास नकार दिला. कारण पेन्शन तू घेतलीस रूम मला असू दे असं ती कल्पनाला सांगू लागली. इकडे अनिलच्या मामाने गावची सगळी जमीन आजोबांचे फ्लॅट या सगळ्या गोष्टींवर आपला कब्जा केला होता. यासाठी आईसोबत न्यायालयात जाता जाता अनिलही न्यायालयात कामकाजासाठी जात होता. मालमत्तेमध्ये सहभागी म्हणून हिला भांडणात गुंतवून ठेवायचं हा अनिलच्या मामीचा प्लॅन मात्र अनिलवर भारी पडला होता. कारण त्याचे आई-वडील विभक्त झाल्यामुळे अनिलच शिक्षण अपूर्ण राहिले होते. आपल्या हक्कासाठी लढत होती आणि ती आपल्या मुलाला घेऊन वेगवेगळ्या कार्यालयात जात होती. अनिलचे शिक्षण अपूर्ण राहिल्यामुळे त्याला नोकरी नव्हती आणि तो आता ड्रायव्हरचं काम करत होता. आजोबा चांगल्या नोकरीला, वडील चांगल्या नोकरीला असतानाही अनिल मात्र अशिक्षितच राहिला. यात चूक अनिलची काहीच नव्हती पण शिक्षा मात्र त्याला भोगावी लागत होती आणि ती म्हणजे शिक्षण न घेतल्याने मालमत्तेच्या वादामध्ये अनिलचं मात्र खूप मोठं नुकसान झालेलं होतं. (सत्यघटनेवर आधारित)