डाॅ. स्वाती गानू
जशा मोठ्या माणसांना भावना असतात तशाच या छोट्या माणसांनाही असतात. तेही निराश होतात, उत्साही होतात, नाराज होतात, दुःखी होतात, त्यांनाही मत्सर वाटतो, भीती, चिंता वाटते, राग येतो, लाज वाटते. लहान मुलं आपल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. ते चेहऱ्यावरच्या हावभावातून, देहबोलीतून, तर कधी कधी ते अयोग्य किंवा प्राॅब्लेमॅटिक पद्धतीनेही व्यक्त होतात. जन्माला आल्यापासूनच मुलं भावना ओळखणे, व्यक्त करणे, मॅनेज करणे ही भावनिक कौशल्यं शिकत असतात. पालक, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींशी नाती जोडणे हेही शिकत असतात. या सगळ्यात मुलांना आपल्या भावना सकारात्मक आणि विधायक पद्धतीने कशा व्यक्त कराव्या हे शिकवण्यात पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते.
मुलं जर लहानपणीच आपल्या भावना मॅनेज करायला शिकली, तर मोठेपणी ते सकारात्मक दृष्टिकोन आणि वर्तन ठेवून जगतात. या मुलांना इतरांबाबत सपोर्टिव्ह आणि सहानुभूती दाखविणे मग चांगलं जमतं. ते शाळेत आणि करिअरमध्ये छान प्रगती करतात. सकारात्मक आणि स्थिर नाती जोडतात. त्यांचं मानसिक आरोग्य उत्तम असतं. वर्तन समस्याही कमी असतात. जुळवून घेण्याचे कौशल्य ते आत्मसात करतात. आपण स्पर्धा करण्याइतपत सक्षम आहोत हा आत्मविश्वास त्यांना यामुळेच असतो.
सर्वसाधारणपणे ज्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या जातात तोपर्यंत ठीक असतं, पण जी मुलं अतिसंवेदनशील असतात अशा मुलांना सांभाळणं हे पालकांसाठी एक आव्हानच असते. अशी मुलं जी खूप जास्त भावनाशील असतात ती त्या-त्या प्रसंगात ज्या पद्धतीने वागतात ते इतर मुलांपेक्षा निश्चितच लक्ष वेधून घेणारं असतं. ही मुलं तीव्र प्रतिक्रिया देतात. जर आई-वडील त्यांच्या अपेक्षांनुसार वागले नाहीत, तर ते खूप जास्त हट्टी होतात.त्यातूनच ते टोकाचं वागतात आणि कोणत्याही प्रकारच्या संवादाला तयार होत नाहीत.
या अतिभावनाशील मुलांची लक्षणं बहुतेक वेळा त्यांच्या वागण्यातून दिसतात.
लक्षणं :
●१) अशी मुलं एकदा का रडायला लागली की खूप वेळ रडू शकतात.
ती कधी जोरजोराने रडतात, तर कधी दिवसभर त्रासिक आवाजात कुरकुर करत, भुणभूण करत रडत राहतात.
●२) त्यांना परिस्थिती असमाधानकारक म्हणजेच त्यांच्या मतानुसार नाही असं कळलं की, ते अस्वस्थ होतात, चुळबुळ करतात, ताणामुळे, कंटाळा आल्यामुळे कधी नुसतेच हात हलवत बसतात किंवा पायाची हालचाल करत राहतात.
३) ●जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर ते सरळ देना प्लीज, प्लीज अशी याचना करतात. अगदी केविलवाणेपणे मागत राहतात. खरं तर एक प्रकारे ते नाटकी वागणंच असतं त्यांचं, असं म्हणायला हरकत नाही.
●४) तुमच्या त्यांच्याशी होणाऱ्या कोणत्याही बोलण्याचा शेवट इरिटेटिंग, त्रासदायक प्रतिसादानेच होत असतो किंवा वरवर पाहता जे दिसतं तसं खरं असेलच असं नाही अशी वाटणारी उत्तरं त्यांच्याकडून येत असतात. अगदी छोटीशी गोष्टही त्यांना अपसेट करू शकते.
●४) ही मुलं जणू डिस्कनेक्ट होतात. मुलं तुमच्याशी संवादाचे दरवाजे अगदी पूर्ण बंद करून टाकतात.
आता हे ठरवायचं कसं की आपलं मूल हे अतिशय भावनाशील आहे तर… यासाठी काही निश्चित टेक्निक्स आहेत, ज्यावरून मूल भावनिकदृष्ट्या किती सेन्सेटिव्ह आहे ते ठरवता येईल. चला तर तपासून पाहू या. ‘हो’ किंवा ‘नाही’ शब्दात स्वतःला उत्तरं द्या.
१) पहिल्यांदा मुलाची स्वतः बद्दलची
भावनिक संवेदनशीलता :
* तुमचं मूल त्याला काय भावना वाटताहेत हे स्पष्ट शब्दात सांगू शकतंय का?
* जर तुमचा मुलगा/ मुलगी एखादा दुःखी करणारा किंवा भीतीदायक चित्रपट पाहत असेल किंवा पुस्तक वाचत असेल, तर ते करत असताना त्याची प्रतिक्रिया नको इतकी, अति ड्रॅमॅटिक असते का?
* जर तुमच्या मुलाच्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत, तर तो गरजेपेक्षा जास्त रडतो आणि त्याला शांत करणं खूप कठीण होऊन बसतं का?
* जर तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या कोणी व्यक्तीने मुलाला त्याच्या वागण्याबद्दल काही सांगितलं किंवा क्रिटिसाईज
केलं तर तो अपसेट होऊन सगळ्यांपासून स्वतःला डिस्कनेक्ट करुन घेतो का?
अशा मुलांशी वागावं तरी कसं?
‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्यूअर’ असं म्हणतात तसं हे काळजी घेणं एक उत्तम औषध आहे. आपल्या मुलाला त्याच्या भावनांवर योग्य नियंत्रण करता येत नाही अशी लक्षणं दिसून आली तर मुलांना तो अशावेळेस कसा वागतो हे शांत झाल्यावर समजावून सांगा. कोणते वागणं योग्य आणि कोणते अयोग्य याबद्दलही जरूर बोला.
●१) मुलं त्यांच्या भावनिक वागण्यातून, ॲन्क्झायटी फेजमधून लगेच बाहेर पडू शकत नाहीत. त्यांना थोडा वेळ द्या. ते नौटंकी करतात, कधी भावनांचा उद्रेक होतो. अशावेळेस त्यांना योग्य जागा आणि वेळ द्या. हळूहळू ते असं वागून वागून थकतात. वास्तवात येतात. गोष्टींचा अर्थ समजून घ्यायला मनाने तयार होतात.
२) इमोशनली सेन्सेटिव्ह मुलं कोणत्या ठराविक गोष्टी घडल्या की, चिडतात त्यांचा काही विशिष्ट पॅटर्न आहे का? ते ट्रिगर पाॅईंटस, सिनॅरिओज शोधून काढले पाहिजेत. त्यांच्या पूर्ण दिनक्रमाचा नीट विचार करा की, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याबद्दल ते कम्फर्टेबल नाहीत आणि तुम्हाला सांगू शकत नाहीत.
●३) तुमच्या मुलांना कोणत्या गोष्टींचा त्रास होतो. ते इमोशनली डिस्टर्ब होतात ते समजावून सांगणं ही एक बाब पण त्याला या गोष्टींना तोंड कसं द्यावं ते मार्ग शोधायला मदत करणं आणि त्यांच्या मेंदूला शांतता मिळणं हा अधिक चांगला दृष्टिकोन आहे. मुलांना स्केचिंग, पेंटिंग करायला सांगणं, करू देणं ज्यायोगे त्यांना आपल्या भावना व्यक्त करता येतील. वाटल्यास त्यांना तुम्हाला गोष्ट सांगू दे, मिठी मारु दे, पोटभर रडू दे, थोडं क्रिएटिव्हली ही गोष्ट हाताळता येऊ शकेल.
४) ●अतिसंवेदनशील मुलांना लहानपणापासून डायरी लिहिण्याची सवय पालकांनी लावली तर त्यांना व्यक्त होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळेल.
●५) त्यांना आपल्या भावना कृतीत व्यक्त करण्यापेक्षा, नाव द्यायला किंवा शब्दात व्यक्त करायला
●मुलांचं लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे वळवलं की ते विसरून जातात आणि ताणतणाव एकट्याने झेलणं मुलांना सोपं जातं.
६) ●जेव्हा अतिसंवेदनशील मुलं डिस्टर्ब होतात, आऊटबर्स्ट होतात तेव्हा त्यांना जवळ घ्या, विश्वास द्या की ते एकटे नाहीत, तुमचा त्यांना सपोर्ट आहे. ते सुरक्षित आहेत. तुम्ही त्यांच्याबरोबर आहात. त्यांना जे वाटतंय ते चूक नाही पण नाॅर्मल पेक्षा जास्त होतंय. आपल्या भावना स्वतःला किंवा इतरांना इजा न करता कशा हाताळायच्या असा सल्ला तर आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. तसंच ते खूप रिॲक्ट होतील तेव्हा दीर्घ श्वास घ्यायला शिकवा म्हणजे भावना शांत व्हायला मदत होईल.
७) ●मुलांना खूप ऑप्शन्स दिले तर ते गोंधळून जातील. हे हवंय ते हवंय किंवा सगळेच हवंय असा हट्ट मुलं करु शकतात म्हणून मोजकेच पर्याय द्यावे. आईस्क्रीम हवे की चॉकलेट. काहीही गोड घे असं म्हणण्यापेक्षा मोजकेच पर्याय देणं चांगलं असतं.
८) ●अतिसंवेदनशील मुलांना हॅन्डल करताना स्ट्रॅटेजी ठरवली तर चमत्कार घडू शकतात. तुम्हाला जर हे ठाऊक असेल की ते कोणत्या गोष्टींनी टॅन्ट्रम दाखवतात तर ती गोष्ट सगळ्यात शेवटी ठेवायची. जेणेकरून त्याला रिॲक्ट व्हायला फार कमी वेळ मिळेल आणि तुम्हाला जे हवंय ते करता येईल.
९) ●मुलं त्यांच्या अतिसंवेदनशील स्वभावानुसार जर रडत असतील, रागावले असतील, ओरडत असतील आणि स्वतःला काही इजा करत नसतील तर काही वेळ त्यांना तसे वागू देत. जर ते शांत झाले की, त्यांना जवळ घ्या, मिठीत घ्या. त्यांना हे जाणवू देत की त्यांना काय वाटतंय हे तुम्हाला समजतंय.
१०) तुम्ही तुमच्या मुलांच्या भावनांचे कोच असता. मुलांना त्यांच्या भावनांबद्दल बोलतं करणं, भावना ओळखून त्यांना नाव देता येण्यात तुम्ही मुलांना मदत करायची असते. मुलांना हे जाणवू देत की तुम्ही खरंच त्यांचं म्हणणं ऐकताय आणि मदत करण्यास उत्सुक आहात तर त्यांना विश्वास वाटेल.
असं करता येईल का पाहा : काय चेहरा करून बसला आहेस याऐवजी मला आश्चर्य वाटतंय की तू इतका निराश का झाला आहेस? रागावण्याचं काहीच कारण नाही याऐवजी तुला राग आला आहे ते ठीक आहे. पाऊटिंग करून तुला हवं तिथे जायला मिळेल असं नाही. जा तुझ्या जागेवर जाऊन बस आधी. जोपर्यंत तू रडणं थांबवत नाहीस तोपर्यंत. याऐवजी तुला काय हवे आहे? काय पाहिजे आहे? असा बदल तर करून पहा. नक्कीच फरक पडेल.