श्रीनिवास बेलसरे
मंगेश पाडगावकर यांना मराठीतले सर्वात रोमँटिक कवी म्हटले तर कुणालाच वावगे वाटणार नाही. मात्र या बहुआयामी कवीच्या व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ वर्णन तेवढे एक विशेषण करू शकेल असे नाही. पाडगावकरांची चित्रमय शैली इतर कुणापेक्षाही जास्त प्रभावी होती. ‘श्रावणात घन निळा बरसला’ हे त्यांचे लतादीदींनी गायलेले गाणे ऐन मे महिन्यात जरी ऐकले तरी श्रोत्याला श्रावणधारात चिंब भिजल्याचा आनंद घेता येतो. डोळ्यांसमोर चलत-चित्रपटाप्रमाणे एकापाठोपाठ एक सुंदर भासचित्रे तरळत जातात. गावाबाहेरचे विस्तीर्ण मैदान, त्यावर उगवलेली हलकीशी हिरवळ, वर आकाशात दाटून आलेले निळेकाळे ढग, त्यामधून हळूच डोकावणारी सूर्याची सोनेरी-पिवळी चमकदार किरणे, निळाभोर पिसारा आवरून उंच झाडावर शांत बसलेला मोर… उन्हात पाचूसारखी चमकणारी हिरवीगार गवताची पाती… सगळे सगळे क्षणात दिसून जाते. वाऱ्याच्या झुळकेबरोबर वरून अंगावर दोन-चार थंडगार थेंब पडल्याचाही भास होतो! इतकी या कवीची चित्रमय आणि संमोहनात नेणारी शैली होती. त्यांचे तब्बल ३३ कवितासंग्रह प्रकाशित झाले. जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियरच्या तीन गाजलेल्या नाटकांचे त्यांनी अनुवाद केले. याशिवाय अमेरिकेचे उपाध्यक्ष ह्युबर्ट हंफ्री यांच्या एका निबंधसंग्रहाचे भाषांतर केले. कविवर्यांनी जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने केलेला तर काही गुजराती कवितांचा ‘अनुभूती’ या नावाने केलेला अनुवाद प्रकाशित झाला. त्यांनी कमला सुब्रह्मण्यम या लेखिकेच्या इंग्रजी महाभारताचा ‘कथारूप महाभारत’ या नावाचा अनुवाद दोन खंडात आणि २०१० मध्ये ‘बायबल’चा मराठी अनुवाद प्रसिद्ध केला.
लेखनात असे एकापेक्षा एक आणि अगदी वेगवेगळे विषय हाताळलेल्या पाडगावकरांची लोकमानसातली प्रतिमा मात्र एक उत्कट भावनाशील रोमँटिक कवी म्हणूनच राहिली! त्यांची अनेक भावगीते रसिकांना अजून पाठ आहेत. त्यातली ‘अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली परी प्रीती’ ‘जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा’, ‘सावर रे सावर रे, उंच उंच झुला’ ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ ही गाणी प्रत्येक मराठी मनाला भावून गेलेली आहेत. अतिशय हळुवारपणे एकेक कल्पना मांडून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कवीला समाजानेही बराच सन्मान दिला. त्यांच्या ‘सलाम’ या कवितासंग्रहाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ (१९८०) मिळाला. राज्य सरकारने २००८ साली ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला, तर २०१३ साली केंद्र सरकारने ‘पद्मभूषण पुरस्कार’ दिला. मुंबईत जुना प्रभादेवी मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग जेथे मिळतात त्या चौकास ‘मंगेश पाडगावकर चौक’ असे नाव देण्यात आले आहे. त्यांचे एक अतिशय लोकप्रिय गीत अरुण दाते आणि एकेकाळच्या प्रसिद्ध रेडिओस्टार सुधा मल्होत्रा यांनी गायले होते. श्रीनिवास खळे यांनी यमनकल्याण रागात बसवलेल्या त्या अजरामर गाण्याचे शब्द होते –
‘शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी,
चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी,
आज तू डोळ्यांत माझ्या,
मिसळुनी डोळे पहा.
तू अशी जवळी राहा…’
प्रेमाची स्वीकृती उभयपक्षी आहे हे निश्चित झाल्यावर प्रेमिकांना सतत सोबत राहावेसे वाटू लागते. कोणत्याही अनुभवाच्या उत्कट क्षणी ‘ती’ किंवा ‘तो’ आपल्याबरोबर असावा आणि हा अनुभव दोघांनी बरोबरच घ्यावा अशी दोघांची स्वाभाविक इच्छा असते. उत्तररात्रीची वेळ आहे, आकाशात शुक्रतारा तेजस्वीपणे चमचमतो आहे. मध्यरात्रीनंतर हमखास सुटतात तशा सुखद वाऱ्याच्या थंड झुळका येत आहेत. जवळून झुळुझुळू वाहणाऱ्या झऱ्यात चांदण्यांचे प्रतिबिंब डोळ्यांपुढे चमचमणारे चित्रविचित्र स्वप्नवत भास निर्माण करते आहे. अशावेळी प्रियकराला वाटते या क्षणाला शब्द नकोतच, तिने फक्त माझ्या डोळ्यांत पाहावे, मला तिच्या डोळ्यांत बघून तिला वाचू द्यावे आणि सतत जवळ असावे! त्याची तिला तेवढीच विनंती आहे.
लाजरी, मुग्ध प्रिया संकोचते. ती म्हणते ‘मी माझ्या भावना तुला शब्दांतून कळवू शकत नाही. माझ्या संकोची स्वभावामुळे आता तूच त्या समजावून घेशील का? माझ्या भावना या फुलातल्या सुंगधासारख्या अदृश्य आहेत.’ कसेबसे हे बोलून ती त्या वाऱ्याच्या झुळुकांनाच विनंती करते – ‘तुम्हीच माझ्या भावनांचा सुवास माझ्या प्रियकरापर्यंत नेऊन पोहोचवाल का?’
‘मी कशी शब्दात सांगू
भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे, लाजणाऱ्या या फुला.
अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा,
तू असा जवळी राहा…’
जणू वारा तिची विनंती ऐकतो आणि तिच्या भावना ‘त्याच्यापर्यंत’ पोहोचवतो! प्रियकरही उत्कट, उत्तेजित मनोवस्थेत आहे. तो म्हणतो, ‘प्रिये, तूच तर माझे लाजरेबुजरे फूल आहेस. पण तुझ्या भावनांचा सुगंध माझ्या हृदयाला बिलगतोच आहे. त्यामुळे मनाची धडधड इतकी वाढली आहे की, माझ्या आजूबाजूची हवा सुद्धा थरथरू लागली आहे. आपले आवाज जणू प्रेमाच्या मंत्राने भरले गेलेत. प्रिये, हे असेच जन्मभर राहू दे, तू अशीच सतत माझ्याजवळ राहा आणि माझे जीवन भारून टाक.
‘लाजऱ्या माझ्या फुला रे,
गंध हा बिलगे जिवा,
अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा.
भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा.
तू अशी जवळी राहा…’
प्रियेला त्यांचा हा असा एकांत, उत्तररात्री असे सोबत असणे खरेच वाटत नाही! रोज जे दिवास्वप्नात पाहत होते ते प्रत्यक्षात अवतरल्याने झालेला आनंद तिच्या मनात मावत नाही. म्हणून ती म्हणते, जे स्वप्नात पाहिले होते ते आज माझ्या हातात आले आहे. माझे मन आनंदाने फुलून गेले आहे. जणू माझे अवघे अस्तित्व एक सुंदर कळ्या लगडलेली वेल झाली आहे. अंगावर एकेक करून उमलणाऱ्या त्या सुंदर फुलांच्या ओझ्याने जीवाची एकेक फांदी वाकू लागली आहे. आता मला सावरत नाही. प्रियकरा, तू सतत जवळ राहा. नाहीतर हे सुख मला सहन होणार नाही.
‘शोधिले स्वप्नात मी, ते ये करी जागेपणी,
दाटुनी आलास तू रे, आज माझ्या लोचनी.
वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा,
तू असा जवळी राहा…’
आकाशात ढग दाटून येतात, दु:खात कंठ दाटून येतो तसे ती म्हणते, ‘तू माझ्या डोळ्यांत आनंदाश्रूसारखा दाटून आला आहेस.’ केवढ्या रोमँटिक कल्पना या! कसले हे शब्द आणि कसला स्वप्नवत उत्कट अनुभव देऊन जाणारे हे कवी! तेही फक्त चार कडव्यात! खरेच पाडगावकर ‘सलाम, कविवर्य सलाम!’ तुमच्या प्रतिभेला!