Categories: कोलाज

विसरायच्या गोष्टी

Share

गुरुनाथ तेंडुलकर

एक झेन कथा वाचली. एके दिवशी संध्याकाळी दोन बौद्ध भिक्षू गावातून आपल्या मठात परतत होते. मठात परतण्यासाठी वाटेत असलेली एक नदी ओलांडून जाणं आवश्यक होतं. दोघे भिक्षू नदीकिनारी होडीची वाट पाहात थांबले. पण सूर्य अस्ताला गेला तरी होडीचा पत्ताच नव्हता. अखेरीस दोघांनी पोहून पलीकडे जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी पाण्यात उडी मारायची तयारी केली, तेवढ्यातच एक तरुण स्त्री धावत धावत त्यांच्याजवळ आली आणि विनवणीच्या सुरात म्हणाली,’ मला पलीकडे जायचंय. माझं सासर पलीकडच्या गावात आहे. आज दुपारी मी माझ्या आजारी आईला भेटायला या गावात आले होते. पण मला परतायला उशीर झाला. घरी माझा लहान मुलगा माझ्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल. कृपा करा आणि मला पलीकडे पोचवा.’ दोघांपैकी एक भिक्षू म्हणाला,‘ठीक आहे. तू माझ्या पाठीला मिठी मारून बस. मी पोहत पोहत पलीकडे जाणार आहे. तुला पलीकडच्या किनाऱ्यावर सोडतो.’ तरुणीनं त्या भिक्षूच्या गळ्याभोवती हात घालून त्याच्या पाठीला मिठी मारली. त्या तरुणीला पाठीवर घेऊन भिक्षूने पाण्यात उडी मारली आणि पोहत पोहत पलीकडच्या किनाऱ्याला आला. पाठोपाठ दुसरा भिक्षूदेखील होता. ती तरुणी त्या भिक्षूचे आभार मानून आपल्या वाटेनं निघून गेली. दोघे भिक्षू मठात गेले.मध्यरात्री त्या भिक्षूला जाग आली. कुणीतरी हलवून त्याला जागं करीत होतं. झोपेतून जागा झालेल्या भिक्षूनं डोळे उघडले. पाहिलं तर दुसरा भिक्षू त्याला हलवून जागा करीत होता.

‘काय रे? काय झालं?’ झोपेतून जागा झालेल्या भिक्षूनं विचारलं. ‘काय झालं म्हणून मलाच उलट विचारतोस?’ दुसऱ्या भिक्षूनं रागानं विचारलं. क्षणभर थांबून पुढे म्हणाला, ‘आज संध्याकाळी तू जे वागलास ते अत्यंत निंदनीय कृत्य होतं. तुला तुझ्या पापाबद्दल प्रायश्चित्त घ्यावं लागेल.’ ‘कोणतं कृत्य ? कसलं पाप ?’ ‘मलाच विचारतोस? अरे आपण ब्रह्मचारी भिक्षू. स्त्रीची सावली देखील आपल्या अंगावर पडू द्यायची नाही हा आपला नियम मोडून तू खुशाल त्या तरुणीला स्पर्श केलास. तिला पाठीवर घेतलंस. अरे ती तुला मिठी मारून अगदी बिलगून बसली होती. तुला लाज शरम कशी वाटली नाही?’ दुसऱ्या भिक्षूनं संतापून विचारलं. ‘कोणती स्त्री ? कुणाबद्दल बोलतोय तू?’ पहिल्या भिक्षूनं जांभई दाबत विचारलं. ‘उगाचच वेड पांघरू नकोस आज संध्याकाळी ज्या तरुणीला तू पाठीवर घेऊन नदी पार केलीस तिच्याबद्दल बोलतोय मी.’ ‘अं… अरे ती होय. मी तर तिला तिथं किनाऱ्यावर सोडून आलो. तू मात्र तिला तुझ्या मनातून इथवर घेऊन आलाहेस.’ पहिला भिक्षू उत्तरला आणि पुन्हा डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपला. या झेन कथेतला दुसरा भिक्षू आपल्याला हरघडी पाहायला मिळतो. अनेकदा आपणही त्या दुसऱ्या भिक्षूसारखेच वागतो. घडून गेलेल्या अनेक घटनांचं ओझं आपल्या मनात बाळगतो. कधी काळी कुणाच्या तरी वागणूकीनं आपण दुखावलेलो असलो तर त्या माणसाचं नेमकं तेवढंच वागणं लक्षात ठेवतो. त्यानंतर अनेक चांगल्या घटना घडून गेल्या तरी त्या माणसावरचा आपल्या मनातला आकस कायम रहातो.

आपण आपल्या नातेसंबंधाच्या बाबतीत नीट विचार केला तर जाणवेल की, एखाद्यानं आपल्यावर केलेले उपकार आपण सहजासहजी विसरतो पण त्या माणसाकडून झालेला अपमान मात्र कायमचा लक्षात ठेवतो. अनेकदा तर आपला अपमान करण्याचं त्या माणसाच्या मनात देखील नसतं. तो सहजतेनं काहीतरी बोललेला असतो. पण त्याचे ते शब्द, त्याची सहजतेनं केलेली कृती आपल्या जिव्हारी लागते. तो माणूस ती घटना विसरूनही जातो पण आपण मात्र आयुष्यभरासाठी ते शब्द – ती घटना ध्यानात ठेवतो आणि मनात अढी धरतो. त्रयस्थ नजरेनं विचार केला तर ती गोष्ट फारसं महत्व देण्याच्या योग्यतेची नसते. तरीही आपण त्या गोष्टीला अवास्तव महत्त्व देतो. अपमानाची आग मनात धुमसत ठेवतो. जर चुकून विसरलो तरी मुद्दाम पुन्हापुन्हा आठवत राहातो. काय साधतं त्यामुळे? ज्याच्यावर आपण चिडतो त्याला अनेकदा त्याची जाणीवच नसते. पण आपण मात्र मनात कुढून स्वतःला सतत त्रास करून घेत असतो. ‘झाली असेल त्या माणसाची चूक. बोलला असेल तो काही लागट. जाऊ देत ना. त्याचं बोलणं त्याच्याकडे’ असं म्हणून आपण त्या घटनेकडे काणाडोळा केला तर… त्या माणसाला उदार मनानं क्षमा केली तर… पण तसं होत नाही. आपण त्या माणसाला क्षमा करीत नाही आणि त्याला क्षमा न केल्यामुळे स्वतःला मात्र शिक्षा करून घेत असतो. एखाद्या क्षुल्लक गोष्टीची अढी धरल्यामुळे अनेक नातेसंबंध कायमचे दुरावतात. भूतकाळातल्या कटू घटना आठवून आठवून आपण आजचा सुंदर वर्तमानकाळ कडू करून टाकतो.
विशेष करून पती-पत्नीच्या नातेसंबंधात हा प्रकार बऱ्याचवेळा घडतो.

दोघांपैकी एकजण कधीकाळी दुसऱ्याच्या मनाजोगा वागलेला नसतो. दोघांत काहीतरी क्षुल्लक मतभेद झालेले असतात. काहीतरी गैरसमज घडलेले असतात. कुणा तरी एकाची चूक असते किंवा नसतेही. दोघंही आपापल्या कृतीचं समर्थन करतात. आपापल्या मतावर ठाम रहातात आणि नंतर कालांतराने कधीतरी ठिणगी पडते. त्यावेळी भांडणात आपल्या जोडीदाराचा दहा-वीस वर्षापूर्वीची चुकीचं वागल्याचा पाढा वाचून दाखवला जातो. चूक करणारा बिचारा विसरूनही गेलेला असतो किंबहूना आपण काहीतरी अक्षम्य अपराध केलाय हे त्याच्या गावीही नसतं. पण समोरची व्यक्ती मात्र मागच्या चुकांचा पाढा पुन्हा पुन्हा वाचून दाखवते. काय साधतं अशा प्रकारे दुसऱ्याच्या चुकीचा पाढा वाचून दाखविल्यानं ? समोरच्याला बेसावधपणे गाठून वार करण्यातला नुसताच एक असूरी आनंद ? की आपण अद्याप विसरलो नाही हे दाखवून देणं ? अशाच प्रकारे एकमेकांशी भांडून उणीदुणी काढणारे एक जोडपं भांडण विकोपाला जाऊन लग्नानंतर पंचवीस वर्षानी घटस्फोटासाठी कोर्टात गेले. कोर्टात निकाल देण्यापूर्वी तिथल्या काउंसिलरने दोघांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. नवराही ऐकेना, बायकोही ऐकेना. दोघंही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत होते. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटना जणू नुकत्याच घडल्याच्या थाटात एकमेकांबरोबर भांडत होते. अखेरीस काउन्सिलर कंटाळून म्हणाला, ‘तुम्हा दोघांचीही स्मरणशक्ती एवढी तीव्र आहे की जर तुम्ही शाळेत-कॉलेजात अभ्यास करताना ती वापरली असती तर तुम्हा दोघांचंही आयुष्य फार वेगळ्या उंचीवर पोहोचलं असतं.’ म्हणूनच मला वाटतं की आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांपैकी कोणत्या लक्षात ठेवायच्या याचबरोबर कोणत्या घटना विचारपूर्वक विसरून जायच्या हेही तितकंच महत्वाचं…! एका तत्ववेत्यानं म्हटलं आहे की, तुम्ही इतरांसाठी केलेल्या चांगल्या गोष्टी आणि इतरांनी तुमच्यासंबंधी केलेल्या वाईट गोष्टी कधीही लक्षात ठेवू नका…!

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

15 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

46 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

1 hour ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

1 hour ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

2 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

2 hours ago