मृणालिनी कुलकर्णी
‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’… या तुकोबांच्या पंक्तींचा खरा अर्थ कळून, आचरणातून सिद्ध करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज! स्वच्छतेच्या माध्यमातून गावाची, हजारो वर्षांपासून जाती धर्मवादाची घाणही खराट्याने साफ करणारे, प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत गाडगे बाबा होय!
ग्रामस्वच्छतेशिवाय त्यांचे वेगळेपण असे, ते स्वतः अशिक्षित, निरक्षर तरीही वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे महान समाजसुधारक होते. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कीर्तनातून मिळालेल्या लोकवर्गणीतून, गाडगेबाबांनी गावोगावी गोरगरीब, भटक्या जमातींसाठी, अनेक शाळा, धर्मशाळा, आश्रम, अन्नक्षत्र, मुलींसाठी वसतिगृह, भोजनासहित निवासी विद्यालय काढणारे गाडगेबाबा पहिले सत्पुरुष ! प्रमुख तीर्थक्षेत्री, नदीवर घाट, पायऱ्या बांधून भक्तांच्या राहण्याची, अन्नाची सोयही केली. बहुजन समाजावर गाडगेबाबांचे थोर उपकार आहेत. “संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ” अशा एका निरीक्षर माणसाचे नांव अमरावतीच्या विद्यापीठाला देणं ही जगातील एकमेव घटना असावी. सत्यवादी प्रबोधनकार ठाकरे काही काळ तर गो. नी. दांडेकर बराच काळ गाडगेबाबांसोबत होते. दोघांनी गाडगेबाबांवर पुस्तक लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब खेर, तुकडोजी महाराज, रयत शिक्षण संस्थेचे भाऊराव पाटील, आचार्य अत्रे असे अनेकजण गाडगेबाबांशी एका धाग्याने बांधलेले होते.
वऱ्हाडात अमरावतीतील शेंडगावी; सखुबाई आणि झिंगराजी जानोरकर या परिटाच्या घरी डेबूजीचा जन्म (२३ फेब्रुवारी १८७६ ) झाला. डेबूची बालपणी परिस्थिती चांगली असूनही धार्मिक कर्मकांड, दारू यांत सगळे पैसे संपले. वडीलही वारले. सहा वर्षांच्या डेबूला घेऊन आई तिच्या आजोळी ‘दापुरा’ येथे आली. त्याकाळी परिटांना शिक्षण दिले जात नसल्याने डेबू मामाकडे सकाळी गाई-म्हशी गोशाळा साफ करणे, दिवसा शेतात, रात्री भजन याबरोबरच रोज सकाळी लवकर उठून आसपासचा आणि नदीपर्यंतचा परिसर साफ करी. आरोग्याचे महत्त्व लोकांच्या लक्षात आल्याने गावकरीही सहभागी झाले. मामाची शेती सावकार हडप करताना झालेल्या संघर्षात, डेबूच्या कमावलेल्या शरीरामुळे सावकार पळून गेला.
डेबूच्या बालपणी अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, गरिबी, सगळीकडे अस्वच्छता, देवाचा कोप होऊ नये म्हणून मुक्या प्राण्यांना बळी देणं याचा डेबूला त्रास होऊ लागला. लहान वयातच डेबूचा जीवनानुभव प्रगल्भ होऊ लागला. डेबूच्या मनांत लोकांमधील अंधविश्वास, कर्मकांडातील रूढी दूर करण्यासाठी त्यांना कसे समजावून सांगावे हे विचार येऊ लागले.
समाजातील असमानता आणि अमान्यता डेबूला मान्य नव्हते. डेबू भजन चांगले म्हणत असल्याने, देवळांतील सात-आठ दिवसांच्या समाप्तीनंतर प्रसादाचे जेवण देताना, ‘एक साथ – एक पंगत’ या मानवतावादी विचाराने गावातील सर्वांना एकाच पंक्तीत बसवून जेवण देण्याची प्रथा डेबूने सुरू केली. डेबू स्वतः खात नसत. गरीब लोकांना उष्टे, शिळे अन्न देण्यालाही डेबूने विरोध केला. डेबूने स्वतःच्या मुलीच्या जन्मानंतर गावाला गोडाचे जेवण देत मांस, दारू देण्याची प्रथा मोडली आणि समाजातील अज्ञानी, अंधश्रद्धा लोकांना मार्ग दाखविला. लोकांना मदत करणे, भुकेल्याला अन्न देत, गाडगेबाबांनी जनकल्याण हाच आपला धर्म मानला. एक दिवस डेबूंना भेटायला एक साधू आला. रात्रीच्या जेवणानंतर सकाळ होताच तो साधू कोठे निघून गेला हे समजले नाही. या प्रसंगाने डेबूच्या मनात साधूचा जन्म झाला. १ फेब्रु. १९०५ रोजी (पत्नी गरोदर असताना) डेबूने स्वतःच्या पारिवारिक जीवनाचा त्याग करून, एक जुने धोतर, एका हातात मडके, दुसऱ्या हातात काठी घेत रात्री घराबाहेर पडले. पाय नेतील तिकडे फिरत असताना भिक्षा मागायची, गाडग्यात जे पडेल ते खायचे नाही तर उपाशी राहावे. आपले घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी जेवले नाहीत. गावच्या गावे झाडत, गटार साफ करत पुढे जाताना, कोणी वेडा म्हणत, कुत्र्यांनी अंगावर भुंकावे, मुलांनी दगड मारावे, लोकांना समजेना हा वेडा की साधू आहे. एकटेच प्रवास करत गाडगेबाबा महाराष्ट्रभर फिरले, एका ठिकाणी कधीही थांबले नाहीत. ते एक भटके समाजशिक्षक होते. पूर्व आयुष्यातील २९ वर्षे पडेल ते काम करीत राबराब राबले.
त्यांचा वेश – चिंधीचा स्वच्छ सदरा, लुंगी, डोक्यावर खापराच्या टोपी, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात गाडगे म्हणून त्यांना गाडगेबाबा म्हणू लागले. पायात तुटकी चप्पल, अनवाणी पाय, एका कानांत कवडी. (माणसाचे आयुष्य कवडीमोल आहे. तुमची जनसेवा तुमचे मूल्य ठरविते.) दुसऱ्या कानात फुटलेल्या बांगडीची काच. माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे याचे प्रतीक. अखेर चालत ऋणमोचन यात्रेत पोहोचले. घरचे कुटुंब भेटले पण बाबांनी मार्ग बदलला. येथून बाबांचे कीर्तनातून लोकशिक्षणाचे कार्य सुरू झाले. पुढच्या ५० वर्षांचा प्रवास अचाट, अफाट होता. परिवर्तनाचे, प्रबोधनाचे ते एक वादळ होते. फक्त वऱ्हाडी भाषा. अत्रे म्हणाले, ‘सिंहाला शिकार करताना जसे पाहावे तसे गाडगेबाबांना कीर्तन करताना पाहावे नव्हे ऐकावे.’ कबिराचे दोहे, तुकोबाचे हजारो अभंग, गाथा मुखोद्गत. गाडगेबाबांना लिहिता-वाचता येत नसूनही साध्या सोप्या भाषेत, समजणारी उदाहरणे देत गावकऱ्यांशी प्रश्न-उत्तरातून सवांद साधत. सत्यनारायची पूजा भाकड आहे. हे सांगत पुजाऱ्याला आव्हान दिले. ‘दुसऱ्या महायुद्धात ज्या नौका बुडाल्या त्या मंत्रोच्चाराने वर काढून दाखवाव्यात. मी एक कोटी रुपये द्यायला तयार आहे.’
समाजातील लोकांचे वागणे त्यांना आवडत नव्हते. सगळी माणसे आपली सगेसोयरे, सगळं विश्व हेच आपले घर असे मानून गाडगेबाबांनी जातीयता तोडायला आणि भाई भाई नाते जोडायला सुरुवात केली. वाटेतले काटे दूर करा, शत्रूलाही मित्र माना. गाडगेबाबा म्हणत, नद्या, झाडे (फळ फूल) गाई- म्हशी दुसऱ्यांच्या उपयोगी पडतात. तसे आपले शरीरही दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यासाठीच आहे. आभाळाच्या मंडपाखाली कोणत्याही वाद्याची साथसंगत नसतांना “देवकीनंदन गोपाळा” या भजनानी कीर्तनाला सुरुवात होई. गर्दी वाढताच मुख्य प्रश्नाकडे वळत सर्व वयोगटातील लोकांना आपल्या कीर्तनात गुंतवून ठेवत. ‘येडं लागलं जगाला, देव म्हणती दगडाला; देव दगडांत नाही, तुम्हांला देवानी निर्माण केलं, मूर्तिकारांनी दगडाला देवाचे शिल्प बनविले.’ देवाकरिता बायका-मुलांचा त्याग करू नका. देव जेवत नाही. तेव्हा देवाच्या नावाखाली मुक्या प्राण्यांना कापू नका. माझ्या लेकरांनो देव आपल्यातच आहे त्यांना जागे करा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक तर्कशुद्धतेने सांगत. प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीच्या बाहेर आहे. कर्ज काढून सणवार साजरे करू नका. बायकोला लुगडं कमी किमतीचे घ्या, घरातील भांडी विका, पडक्या घरांत राहा, खाताना हातात भाकरी घ्या, पण मुलांना शिक्षण द्या. ज्याला शिक्षण नाही तो खऱ्या अर्थाने खटाऱ्याचा बैल आहे’. गाडगेबाबा कधी मंदिरात गेले नाहीत. गाडगेबाबांनी आपल्या भोळाभाबड्या लोकांत जगण्याची हिम्मत जागृत केली.
एकदा एकाने एका दगडाला आंघोळ घालून, पूजा करून हार घातला. इतक्यांत कुत्र्याने त्या दगडावर लघवी केली. रागाने त्या व्यक्तीने कुत्र्याला मारण्यासाठी दगड उचलला. गाडगेबाबा म्हणाले, ‘त्या मुक्या प्राण्याला कुठे माहीत माणसाचा देव दगडांत असतो.’ देव माणसात आहे. देवाला वेगळे समजू नका. तुकोबा म्हणतात, देव पाहावयास गेलो नि देवच होऊन आलो.
“अस्पृश्यता पाळू नका, पोथी पुराणे – मंत्र तंत्र – चमत्कार, यावर विश्वास ठेऊ नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका… माझा कोणी गुरू नाही, अन् माझा कोणी चेला नाही. म्हणून मायबापहो माणसांवर, प्राणिमात्रांवर प्रेम करा. गाडगेबाबांच्या भजन-कीर्तनातून सगळीकडे त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला.’ गाडगेबाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंपेक्षा १५ वर्षांनी मोठे. डॉ. आंबेडकर गेल्यानंतर गाडेबाबांनी अन्न सोडले. त्यांचे शेवटचे कीर्तन मुंबईला झाले. ते आजारी पडले. अमरावतीला जाताना, वलगाव येथील पिडी नदीच्या पुलावर २० डिसेंबरला १९५६ मध्यरात्री त्यांनी जगाचा निरोप घेतला.
ईश्वर केवळ मंदिरात नाही तर सर्वत्र आहे. त्याची भक्ती दीनदुबळ्यांच्या सेवेत आहे. असा लोकशिक्षणातून लोकशिक्षकाकडे झालेला प्रवास म्हणजे डेबू ते आधुनिक संत गाडगेबाबा! समाजातून मिळालेले पैसे समाजालाच परत केले. स्वतः एकदाही त्यांनी बांधलेल्या धर्मशाळेत झोपले नाहीत की अन्न खाल्ले नाही. असा निर्मोही निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत होणे नाही.
आधुनिक भारत निर्माण करणाऱ्या अनेकांच्या योगदानांत गाडगेबाबांचे नाव सन्मानाने वर घ्यावे लागेल. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
[email protected]