Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘स्मशानाधिपती तो शिवशंभू माझा’

‘स्मशानाधिपती तो शिवशंभू माझा’

ऋतुजा केळकर

‘स्मशानाधिपती तो शिवशंभू माझा…
कपाळी भस्म ते गळा रुद्र माला…
मनी रुद्र ज्याच्या तया भीती कैची…
शरण जो जाई त्या महाकालेश्वराला
असे पार्वती त्याचीच आई…’

लिहिता लिहिता मनात कुठे तरी तो रुद्र, तो शिव, तो महाकाल उभा राहिला. त्या काळ्याभोर शिव स्वयंभू लिंगाच्या विविध प्रतिमा डोळ्यांसमोरून झरकन निघून गेल्या आणि हृदयपटावर एक प्रसंग उमटला. घटना तशी साधीच, असतील तीन एक वर्षे झाली. मला आठवतंय पहिला श्रावणी सोमवार होता, रस्त्यात अचानक माझ्यासमोर एक साधूबाबा आले. त्यांनी माझ्याकडे दहा रुपये मागितले. मी माझ्या हाती लागलेली पन्नासची नोट काढून दिली आणि ती पैशाची मूठ बंद करून त्याच मुठीतून अगदी एक इंच उंच असे सानुले निळेशार देखणे शिवलिंग माझ्या हाती ठेवले. जणू त्याकरिताच त्यांची माझी भेट झाली असावी आणि सदैव सोबत ठेव असं सांगून तोंड भरून आशीर्वाद देऊन झपाझप ते नजरेआड झाले. आजही ते शिवलिंग सदैव माझ्यासोबत असते. वाटेल कुणाला की हे सगळे थोतांड आहे पण त्या दिवसापासून माझे दिवस पालटले हे मात्र नक्की. तशी माझ्यासाठी शिवाची आणि माझी ओळख अगदी बाळगुटीसारखी. कारण ‘शंकर’ हे माझे आराध्य आणि आता तर ते सदैव माझ्या सोबतच असतात, त्यामुळेच असेल कदाचित जेव्हा या महादेवांबद्दल लिहिण्याची वेळ आली तेव्हा माझे ऊर भरून आले आणि शब्दातून तेच प्रेम उतरले ते म्हणजे…
‘उगम तोच अंत तोच तोच मृत्यू…
जीवन ही तोच…
तोच असे निळकंठ…
तोची असे देवांचा देव…
महादेव…’

तशी तर महादेवाची पूजाअर्चा ही शिवपिंडीवर थंडपाणी तसेच दुधाचा किंवा उसाच्या रसाचा अभिषेक करून वर पांढरी फुले तसेच बेलपत्र वाहून केली जाते. बेलपत्राची आणखी एक अनोखी गोष्ट आहे ती म्हणजे इतर सर्वच फुले, पाने किंवा तुलसी पत्रे ही एकदा का देवास अर्पित केली की निर्माल्यात परिवर्तीत होतात पण बेलपत्रे ही एकदा शिवास अर्पित केल्यानंतरही पुन्हा पाण्यात धुवून वापरता येतात, अर्थात असे का? याचे उत्तर मात्र आज माझ्याकडे नाही. शिव पिंडीस हळद आणि कुंकू वर्जित असले तरीही पिंडाच्या खाली असलेल्या भागास शिव पिंडीच्या खालील भागास “योनिपाट” किंवा “योनिमुख” म्हणतात. योनिपाट हा भाग शिव पिंडीच्या आधाराचा, गाभ्याचा आणि ऊर्जा स्त्रोताचा प्रतीक असतो. शिव पिंडी म्हणजेच शिवाचे प्रतीक आणि योनिपाट हे त्याचे अवयव म्हणून मानले जाते. योनिपाटाच्या रूपात शिवाचे शक्तीचे प्रतीक असते, जे सृष्टीच्या उत्पत्ती आणि जीवनाच्या चक्राचे दर्शक आहे. फक्त त्यास हळद आणि कुंकू वाहिले जाते. कारण तो भाग हा शक्तीचे म्हणजेच पार्वतीचे स्वरूप आहे आणि वरच्या पिंडास पांढरे गंध हे त्रिनेत्रासारखे लावले जाते. पण शिवास अत्यंत प्रिय आहे ती ‘भस्मारती’. हा तर उज्जैनच्या महाकालेश्वराच्या पूजेतील एक मोठा सोहळा अतिशय देखणा असतो. जेव्हा ते भस्म म्हणजेच स्मशानातून आणलेली राख महाकालेश्वरावर उधळली जाते तो अलौकिक सोहळा हा प्रत्येक शिव भक्ताने एकदा तरी अनुभवलाच पाहिजे.

तसं तर सोमवार हा सांब सदाशिवाचा दिवस असतोच पण संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस हे शिवरात्र म्हटले जातात. त्यातील मुख्य शिवरात्र फाल्गुन महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी ते मार्चमध्ये त्या दिवशी अंबा चंद्राच्या कृष्ण पक्षात असते. म्हणूनच महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे आणि ती मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. दुसरी शिवरात्र म्हणजे चैत्र महिन्यात येणारी शिवरात्र, ही शिवरात्र मार्च-एप्रिलमध्ये शुद्ध चतुर्थीला साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो आणि शिव अर्चनेत संपूर्ण दिवस व्यतीत केला जातो. असेही म्हटले आहे की, या दिवशी मृत्यू आल्यास ती व्यक्ती मोक्षास जाऊन त्या आत्म्यास शिवलोकात स्थान मिळते. अशा ह्या महादेवाच्या जटेतून गंगेची अविरत धारा वाहते. हिंदू संस्कृतीत गंगा ही एक पवित्र नदीच नव्हे तर मोक्षाची एक धारा आहे. पृथ्वीवर तिचे एक भोगोलिक महत्त्व असून कुंभमेळा हा नेहमीच गंगातीरीच आयोजित केला जातो. महादेवाने गंगेला आपल्या जटेत स्थान देऊन जीवनातील शुद्धता आणि पवित्रता दर्शविले आहे. स्वतःच्या जटेत चंद्राला महादेवांनी धारण केले आहे त्या मागे देखील एक वेगळे कारण आहे, असे मला वाटते. माझ्या मते चंद्राप्रमाणे यशाच्या तसेच सौंदर्याच्या मस्तीत जर आपण गर्वाने फुगत गेलो तर त्याला क्षयाचा म्हणजेच ओहोटीचा शाप आहे असे महादेवास जगास सांगायचे आहे, म्हणूनच त्यांना ‘चंद्रकांत’ असे देखील म्हटले जाते.

एकंदरच ‘महादेव’ हे देवांचे देव म्हणून पूजले जातात. पण शिव म्हणजे ब्रह्मांडाची उत्पत्ती, तसेच जर या ब्रह्मांडावर काही संकट आले तर त्याचे तारण करण्याचे सामर्थ देखील त्या शिवात आहे. म्हणूनच तर समुद्रमंथनाच्या वेळी विष प्राशन करून ‘निळकंठ’ नाम धारण करण्याची शक्ती फक्त शिवातच होती की जे महादेवांनी करून ‘निळकंठ’ हे नाम धारण केले, म्हणूनच तर ते ‘देवाधिदेव महादेव’ म्हणून ओळखले जातात. अलौकिक देहधारणेतून जर का अंतरात्म्याचा शोध घ्यायचा असेल तर शिव आराधना यासारखे अलौकिक सुख नाही. सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ऊज्जैनेश्वर, काशी विश्वनाथ, रामेश्वर, नागेश्वर, विष्णू ज्योतिर्लिंग, पुंडलीक ज्योतिर्लिंग, ताम्रेश्वर, अमरेश्वर आणि अखेरीस केदारनाथ या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने भक्तांच्या जीवनात सुख-शांती आणि मोक्षाची प्राप्ती होते हे सर्वश्रुत आहे. या सर्व ज्योतिर्लिंगांची माहिती लिहायची झाली तर शब्दच पुरणार नाहीत. शिवाचे निवास स्थान हे निसर्गाच्या सान्निध्यात अगर स्मशानात असते. निसर्ग म्हणजे उत्पत्ती, आत्मा आणि परमात्मा यांच्या जोडपुलाची सौंदर्य प्रतिमा म्हणजे निसर्ग आणि या निसर्गातील प्रकाश तसेच अंधकार यांना बांधून ठेवणारा संधिप्रकाश म्हणजे ‘शिव’. म्हणजेच जन्म आणि मृत्यू यांच्यातील दुवा म्हणजे माझा ‘शिव’. समग्र आयुष्याच्या अधोरेखित देखाव्याची मूळ संहिता म्हणजे ‘शिव’. आता स्मशान याची व्याख्या करायची झाली तर जिथे जुन्या जीर्ण देहाचे विसर्जन होऊन नवीन इच्छा-आकांक्षाची निर्मिती होऊन जीवनाचा मोक्ष मार्ग सुरू होतो ती जागा म्हणजे ‘स्मशान’. आत्मा हा आश्रित आहे. या देहाचा त्याला स्वतःचे असे जरी अस्तित्व असले तरीही जेव्हा देहाची वासनांबद्दलची आसक्ती संपेल, तेव्हा त्यातून बाहेर पडणे हे विधिलिखित असते. आपले कर्म भोग संपले की आपल्यापासून आपले अस्तित्व देखील क्षणार्धात राखेत परावर्तीत होते असे ते ‘स्मशान’. अशा या स्मशानाचा अधिपती तो हा माझा ‘शिव’. देवाधिदेवच नव्हे तर भूत प्रेत समंध याचाही अधिपती तो माझा ‘शिव’.

या शिवाच्या अर्धनारी नटेश्वराच्या त्या दिव्य रूपाचे वर्णन मी पामर काय करू? अर्धे शरीर हे पुरुषाचे तर अर्धे शरीर हे स्त्रीचे असा हा माझा नटेश्वर म्हणजे फक्त नृत्याचे दैवत नसून स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेचे, एकरूपतेचे प्रतीक आहे. स्त्रीचा दर्जा हा पुरुषांच्या बरोबरीचा आहे, हे अनादी काळापासून असलेले सत्य हे या अर्धनारी नटेश्वराच्या रूपाचे प्रतीक आहे. स्त्री-पुरुषाच्या देहातीत अशा या उत्सवाचे स्वरूप म्हणजे हे अर्धनारी नटेश्वराचे रूप म्हणून त्याकडे बघणे गरजेचे आहे. त्यातच एका बाजूला महादेव विनाशक रूपात देखील ओळखले जातात. जेव्हा पृथ्वीवरील अन्याय वाढतो आणि दुष्ट शक्तींचे वर्चस्व होते, तेव्हा महादेवाचे रूप उग्र होते आणि ते या शक्तींना नष्ट करतात; परंतु हा माझा शंकर तितकाच भोला सांबही आहे बरं, कारण मनापासून जर कुणी त्याला शरण गेले तर त्याला तो जगातील सारी भौतिक सुखे तर प्रदान करतोच; परंतु त्यास शिव भक्तीचे फलित मोक्ष म्हणून ‘शिवलोक’ प्राप्ती होते असे हिंदू संस्कृतीत सांगितलेले आहे. अशा या निळकंठेश्वराचे वर्णन मी इतकेच करेन,

‘हले काचपात्रा समान आयुष्य माझे…
निनादून घंटा सांगे कर्म माझे…
जया सत्कर्म अंगीच नाही…
तया शिवशक्ती कशी ती कळावी…
महेश्वरा तू दुःख देशांतारा पाठवावे…
मम मनी सदैव तुझे नाम राहावे…’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -