Saturday, August 30, 2025

मैत्री आमची भारी

मैत्री आमची भारी

लहान-मोठ्या साऱ्यांच्याच भाषा त्यांना येतात गाणी, गोष्टी नवीन काही बरंच सांगत राहतात

शब्दाशब्दांतून कसे मनःपूर्वक बोलतात अर्थाच्या विविध छटा अलगद उलगडतात

अवघड असेल जे-जे ते सोपे करून देतात सोबतीला राहून राहून आपलेच होऊन जातात

क्षणांना सुंदर करण्यात त्यांचा वाटा मोठा ज्ञान, विज्ञान, रंजनाला मुळीच नाही तोटा

पानापानांतून देतात ते विचारांना आकार मदतीलाही येतात स्वप्न करण्यास साकार

हात त्यांचा हाती घेताच तेही जातात हरखून आनंदाची बाग आपली आपसूक येते बहरून

पंखात भरतात बळ घेण्यास उत्तुंग भरारी पुस्तकांची आणि माझी मैत्री जगात भारी...!

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड

१) विस्तीर्ण चहाचे मळे हिरवे हिरवे डोंगर निसर्गाच्या समृद्धीत शिखरे मात्र खडतर

केरळ राज्यातील हे थंड हवेचे ठिकाण दक्षिण भारताचे काश्मीर कोणास मिळतो हा मान?

२) गढवाल हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले ‘टेकड्यांची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेले

बर्फाच्छादित पर्वतांनी वेढलेल्या रांगा डेहराडूनमधील हे ठिकाण कोणते सांगा?

३) हे ठिकाण राजस्थानच्या मध्यभागी वसलेले ‘थार वाळवंटाचे प्रवेशद्वार’ म्हणून प्रसिद्ध असलेले

राजेशाही किल्ले प्राचीन मंदिरे या पर्यटन स्थळाचे नाव सांगा बरे?

Comments
Add Comment