प्रवीण टाके
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक संस्कृती आहे. तिच्या मातीत असंख्य उपभाषांचे, बोलींचे रोप बहरलेले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत बोलीभाषांचे वैविध्य आढळते. जशी गंगा अनेक उपनद्यांना सामावून घेत समुद्राला जाऊन मिळते, तशीच मराठी भाषा विविध बोलीभाषांना आपल्या प्रवाहात सामावून घेत समृद्ध झाली आहे. या बोली भाषेतील विविधतेमुळे मराठी भाषेची ताकद वाढली असून तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे. बोलीभाषांचे वैविध्य आणि त्यांचे योगदान : महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी, मराठवाडी, झाडीबोली, खानदेशी, नागपुरी याशिवाय गोंडी, बंजारा, कोलामी या बोलीभाषांनी मराठी भाषेला बळ दिले आहे. म्हणतात, “दर बारा कोसांवर भाषा बदलते,” हे महाराष्ट्राच्या भाषिक वैशिष्ट्यांवर अगदी तंतोतंत लागू होते. या बोलीभाषांमधील साहित्य, लोकसंस्कृती, गाणी, नाटकं, प्रवचनं यांनी मराठीला अधिक व्यापक आणि जिवंत बनवले आहे. या बोलीभाषांमधील काही शब्दांना अर्थ आहे. हजारो उखाणे या बोली भाषांमध्ये आहेत. शेकडो वाक्प्रचार या भाषेत आढळतात, विविध शब्दांसाठी एक शब्द म्हणून आशयघनता असणारे अनेक शब्द बोली भाषेत आहे. प्रेम, राग, द्वेष, आनंद व्यक्त करणारे वैशिष्ट्यपूर्ण शब्द या बोलीभाषांचे महत्त्व सांगते.
वऱ्हाडी बोलीभाषेचे वैशिष्ट्य : वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी बाज हा तिचा खास गुणधर्म आहे. वऱ्हाडी बोलीत बोलताना एक वेगळीच गंमत असते. शब्दांच्या उच्चारांतील लयबद्धता आणि लहेजा मराठीला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करतो.
वऱ्हाडी भाषेचे महत्त्व : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देताना वऱ्हाडी भाषेतील लिखाण अलीकडच्या काळात विशेष अधोरेखित झाले आहे. लीळाचरित्र या महानुभव पंथाच्या ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभाव आढळतो. आद्य मराठी कवी मुकुंदराज यांच्या लेखनातही वऱ्हाडीचा वापर दिसतो. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथात वऱ्हाडीचा प्रभावी वापर केला आहे.
वऱ्हाडीतील साहित्यिक योगदान : वऱ्हाडी भाषेत विपुल प्रमाणात साहित्यनिर्मिती झाली आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र, नाटके, सिनेमा अशा विविध माध्यमांद्वारे ही भाषा आपल्या भाषिक परंपरेत एक ठसा उमटवत आहे. प्रा. देविदास सोटे, पुरुषोत्तम बोरकर, उद्धव शेळके, मनोहर तल्हार, बाजीराव पाटील, गो. नी. दांडेकर, महेश दारव्हेकर, पांडुरंग गोरे, विठ्ठल वाघ, डॉ. मिर्झा रफी अहमद बेग, शंकर बडे, मधुकर केचे, ज्ञानेश वाकुडकर, शाम पेठकर, नाना ढाकूलकर, मनोहर कविश्वर, मधुकर वाकोडे, गौतम गुडदे, डॉ. प्रतिमा इंगोले, शरदचंद्र सिन्हा, जगन वंजारी, राजा धर्माधिकारी, बापुराव झटाले, अॅड. अनंत खेळकर, किशोर बळी, रमेश ठाकरे, बापुराव मुसळे, रावसाहेब काळे, सदानंद देशमुख, नरेंद्र लाजेवार, नरेंद्र इंगळे, आदी मान्यवरांसह शेकडो लेखकांनी वऱ्हाडी भाषेतील साहित्य समृद्ध केले आहे.
मराठीची अस्मिता आणि बोलीभाषांचे स्थान : पु. ल. देशपांडे यांना वऱ्हाडी भाषेच्या विनोदी बाजाचे फार आकर्षण होते. सुरेश भट लतादीदी, आशा भोसले आणि मंगेशकर घराण्यातील व्यक्तीशी वऱ्हाडी भाषेतून संवाद साधायचे. त्यांच्या वऱ्हाडी संवादाचे मैफलीमध्ये खास आकर्षण असायचे. खरे तर भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती तिच्या संस्कृतीचा, अस्मितेचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग असते. म्हणूनच बोलीभाषांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यांना जपणे हे मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रात बोलीभाषांनी जो भाषिक गोतावळा तयार केला आहे, त्याने मराठीला अधिक समृद्ध केले आहे. मराठीने आपल्या अंगाखांद्यावर या उपभाषांना वाढवले, संगोपन केले आणि त्यांना भाषिक अस्मिता बहाल केली. आजच्या काळातही बोलीभाषांचे संवर्धन हे मराठीच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण मातृभाषा ही आपल्या संस्कृतीची ओळख असते. मराठी भाषा ही केवळ एक संवादमाध्यम नसून एक संस्कृती आहे. बोलीभाषा ही तिच्या समृद्धीचा गाभा आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी यांसारख्या अनेक उपभाषांनी मराठीच्या प्रवाहाला अधिक खोल आणि विस्तारलेले स्वरूप दिले आहे.
आजही मराठी भाषेच्या जडणघडणीत या बोलीभाषांचा मोलाचा वाटा आहे. बोलीभाषांचे संवर्धन आणि त्यांचे लेखन-साहित्यिक योगदान पुढे नेणे, हे मराठी भाषेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषा ही केवळ बोलीभाषांच्या आधाराने अधिकाधिक समृद्ध होत राहील. मराठी भाषा ही समुद्र आहे तर तिच्यात मिसळणाऱ्या बोलीभाषा या विविध नद्यांप्रमाणे आपले भाषिक सौंदर्य तिच्यामध्ये कायम मिसळत राहते. हा ओघ असाच कायम असणे खूप गरजेचे आहे. शब्दांचे वैशिष्ट्य, शब्दांचा गोडवा, शब्दांचे अर्थ, त्याची आशयघनता, काळाच्या गतीमध्ये लुप्त होऊ नये.