माेरपीस : पूजा काळे
म… महाराष्ट्राचा, म… मराठीचा. महाराष्ट्राच्या मातीतील मराठी भाषेचा अभिमान मला कायम असणार आहे. शब्द शब्द जपून ठेव म्हणत, या मातीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या अंगी असलेल्या भाषा लालित्याचा, स्वाभिमानाचा मोठेपणा आम्हाला
गर्वाने सांगावासा वाटतो.
माझी मायबोली मराठी महान,
गिरवावी अक्षर, होऊ या साक्षरहा धडा मानवाला त्याच्या विकासाकडे घेऊन जाणारा आहे. ज्या मातीत आपूला जन्म ती आपली मातृभाषा. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त दांडगी असेल, तर भाषेला कोणत्याही वयाचं, धर्माचं बंधन आड येत नाही. आपली नित्य बोलण्याची मौखिक भाषा, जी सरावाने आणि अभ्यासाने साधता येते. एका माणसाला दोन-चार किंबहुना त्याहीपेक्षा जास्त भाषा त्याच्या बुद्धी चातुर्याच्या आणि वाक्चातुर्याच्या जोरावर अवगत होऊ शकतात. मराठी भाषेसह प्रत्येक भाषेचं हेचं वैशिष्ट्य आहे, की बोलण्याबरोबर लिहिण्याचा सराव करता, भाषेची सौंदर्य स्थळं, व्याकरण यावरची मेहनत मातृभाषेव्यतिरिक्त जगातल्या कुठल्याही भाषा उत्तम लिहिता, वाचता येऊ शकतात. मानवी विकासाच्या दृष्टीने पुढे नेणारी त्याची मातृभाषाचं असते. जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमधील सर्वश्रेष्ठ कला असल्याने जीवन जगताना भाषेची मुळं खोलवर रुजली जातात. त्यामुळे मानवी हृदयावर अलंकृत लेखणीचा उत्तम संस्कार होतो. यामुळे कलेचा मुख्य कार्यभाग साधला जातो. मुळात अभिजात उपजत भाषाचं आपल्याला प्रगतिपथाकडे नेतात. नेहमीच्या आचरणात येणारी भाषा आपले आचार, विचार, संस्कारावर आधारित असल्याने गाव तसे भाषा आणि बोलीभाषा भारतात विशेषतः महाराष्ट्रात आढळतात.
माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई,
सेवा मानून घे आई, सेवा मानून घे आई |
आई समान प्रिय असलेल्या भाषेविषयी माझ्या भावना या नेहमीच आदरणीय असल्याने, सेवा सन्मानाची, सेवा कार्याची, सेवा साहित्याची, सेवा भाषेची हे माझं ब्रिदवाक्य आहे. शुभप्रसंगी, शुभदिनी भाषेचा करू सन्मान, माझी मायबोली मराठी महान असं म्हणताना तिच्यापुढे नतमस्तक होणं हेचं माझं प्रथम कर्तव्य मानते. मायेचा घुंगुरवाळा नाद प्रसवणारी मायबोली म्हणजे मराठी भाषा, जी अनंत शाखांनी बहरली आहे. तिच्या शब्दातले कोमल भाव गारूड घालतात मनावर. भाषा म्हणजे बोलण्याची क्रिया. अभिव्यक्त होण्याचं माध्यम. मनातील कोमल भाव या हृदयीचे त्या हृदयाला पोहोचवण्याचं सामर्थ्य शब्दाला प्राप्त करून देण्याची शक्ती आपल्या मराठी भाषेत सामावली आहे. शब्द मिळून भाषा बनते. जीवनाला स्थैर्य देणारी, प्राकृत भाषेतून संस्कृत भाषेत आणि त्यानंतर मराठी मनावर राज्य करणारी प्रिय भाषा म्हणजे आपली मराठी भाषा, जिला आज राजभाषेचा दर्जा प्राप्त झालाय.
आकाशगंगा सूर्य, चंद्र, तारा आणि या ताऱ्यात अवघा महाराष्ट्र झळकतोय सारा. सह्याद्रीच्या रांगांनी नटलेला, विरांच्या शौर्यगाथांनी मुरलेला, निसर्गाच्या सौंदर्याने बहरलेला, बुद्धिवंतांच्या चातुर्याने रंगलेला, सुधारणावादी तत्त्वांनी डवरलेला, संत-महंत, क्रांतिकारी, कलाकार यांची कर्मभूमी असलेला हा भगवा महाराष्ट्र नवोन्मेषशाली अाविष्काराचं भूषण आहे. इथं एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते, ती म्हणजे महाराष्ट्र देशाचा उल्लेखनीय वेगळेपणा साऱ्या जगाने मान्य केलाय. एकचं भाषा मातीची, एकचं भाषा मनाची, एकचं भाषा रक्ताची, मराठी आम्हा कौतुकाची, असं अभिमानाने सांगताना इतिहास साक्षीला आहे. संत-महंतांनी दाखविलेल्या पदपथावर इथल्या संस्कृतीचा उदय झाला. पुढच्या काळात छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, साने गुरुजी इ. समाजसुधारकांनी सुधारणावादी व्यक्तींनी स्वातंत्र्याचा मार्ग सुकर केला. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर,
शब्दची आमुच्या जीवनाचे जीवन |
शब्द वाटू धन जन लोका | |
गतीमान होत असलेल्या मराठी भाषा व्युत्पत्तीमुळे जीवनात क्रांतिकारक बदल झाल्याची सोदाहरण इथं देता येतील. अठरापगड जातीच्या पसाऱ्यात मराठी भाषा आणि तिच्या विविध बोलीभाषा या सांस्कृतिक, वैचारिक जडणघडणीचा मुख्य गाभा असल्याने, आपल्या अंगाखांद्यावर मिरविणाऱ्या बोली भाषेचा इतिहास सूर्याप्रमाणे दिप्त आहे. व्यक्तिगणिक बदललेली मायबोली भाषा, तिच्या मालवणी, खान्देशी, बागलानी, वऱ्हाडी या आणि अशा अनेक बोलीभाषा म्हणजे आपला अवघा महाराष्ट्र होय.
मराठी भाषा साहित्यातील गद्य आणि पद्यची अंग वेगळी असल्याने, प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीचा कस इथं लागतो. शब्दाला जसे फुलवालं तसे ते फुलतात, या अर्थाने शब्दाला न्याय देता आला, तर शब्द तुम्हाला श्रीमंती देतील. शब्दाला मिळतील प्रतिशब्द आणि उत्तरादाखल धाटणी, मांडणी, विषय, हाताळणी, सादरीकरण आणि उच्चार यांच्या कसोटीवर चमकत राहील मोरपीस लेखणी. याचा उत्तरार्ध कमालीचा विशेष असेल, कारण त्यातून बहरेल व्यक्तिमत्त्व. व्यक्तिमत्वाला धार येत, त्यातून वाहिल शब्दगंगा. गंगेतून वर येईल परीस. परीसामुळे झळाळून उठेल सोन्यापरीस मनं. मनाला साथ देईल देह. तो देह असेल कवीचा आणि जिथं कवी महत्त्वाचा तिथं सन्मान मराठी राजभाषेचा. मराठी भाषेसाठी याहून सुरेख विण कोणती असू शकेल? आज माझी मायबोली महान म्हणताना माझा स्वर चढा होतो. कारण या मातीने, मराठी मनाने आपल्या भूमीत सर्वप्रकारच्या समुदायाला आपलंस केलंय. इथं नाही कसला तोटा. सण साजरे करताना, परंपरा जोपासताना आत्मीयतेचा झेंडा या इथचं फडकवलाय आम्ही. वर्षानुवर्षे दादर, गिरगाव, गिरणगाव यांसारख्या ठिकाणी भाषेची समृद्धी, तिचं जतन करताना मणभर मास चढल्याचा आनंद देतं आम्हाला. या उपर बाराखडीतल्या वर्णानी, अक्षरांनी, उपमा आणि प्रतिमांनी भाषेला समृद्ध केलंय.
माझ्या मराठीचा तोरा पैठणीला विचारा. भगव्याची शान डोळे भरून पाहा. नऊवारीची शालिनीता, लाल कुंकवाला मणी मंगळसूत्राची साथ, दारावरील तोरणं, सण, उत्सव या संस्कारात दडलयं माझं मराठी मी पण. कौतुकाला शब्द अपुरे पडतील अशी माझी मराठी भाषा आहे. माझ्याचं कवितेच्या रूपाने मला कळलेली भाषा अलंकृत होऊन येते ती अशी…
इथे नांदे राजभाषा माय मराठी बाण्याची,
कौतुकाला डफलीची साथ शाहिरी गाण्याची|
सोबतीस वर्ण जोड अन् सोळा क्षृंगाराची,
कोंदणात यमकाच्या गाठ पडे व्यंजनाची |
काना, मात्रा, उपम्यात कलाकृती लावण्याची,
वेलांटित दडलेली खाण प्रतीकांची |
अ, आ, इ, ई समाविष्ट बाराखडी सरावाची,
भाषेतली मुळाक्षर अभ्यासण्या ताकदिची |
अक्षराचे गणगोत निर्मिती एका ध्यासाची,
करी बहुश्रीमंत कथा शब्दालंकाराची |
अलंकृत विशेषण पेहराव साहित्याचा,
भाषा एक मार्ग आहे अभिव्यक्त करण्याचा |
राजभाषा मान्यतेनंतर मराठी भाषेच्या विकासाची दालनं खऱ्या अर्थाने खुली झाली आहेत. कथा, कवितेतल्या गावातून भाषा अधिक खुलल्याचे चित्र साहित्यिक कार्यक्रमात दिसतयं. सांस्कृतिक कार्यक्रमात भाषेचा विविध अंगाने विचार होतोय. पुस्तकं आवडीने वाचणारी माणसं आपण. आपला भर मनन चिंतनावर, तेव्हा चराचरांत सद्गुरूंच्या संगतीत परमेश्वरी कृपेनं प्राप्त झालेली वाणी आणि त्यातून स्फुरलेले बोल हेचं आपले खरे सोबती होय. शब्द-शब्द जपूनचा हा प्रवास न संपणारा आहे. मनातल्या भावना ओठावर याव्यात, व्यक्त व्हाव्यात यासारखं सुख ते काय असावं? भाषेचं मोल जाणून तिच्या प्रचार आणि प्रसाराचं व्यापक उद्दिष्ट डोळ्यांसमोर हवं. येणारा काळ लक्षात घेता, राजभाषेचा मुकुट शोभून दिसण्यासाठी सोन्याहून पिवळ्या असलेल्या आपल्या भाषेची बोलण्याची, लिहण्याची आणि दैनंदिन व्यवहाराची भाषा देखील मराठीतचं हवी.