पूनम राणे
माणसाकडे कोणती न कोणती कला असावी, कारण ही कला माणसाला पोसते, आयुष्याकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी देते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी एका मंदिरात आजोबांनी लिहून दिलेलं वीर अभिमन्यूवरील भाषण उत्स्फूर्त अभिनयासहित स्टेजवर चालू असताना समोरील सारे प्रेक्षक हसायला लागले, तसे ते चिडून म्हणाले, ‘‘हसताय काय!” मी भाषण करतोय, लढाई नाही ! पण या गडबडीत पुढचं सगळं भाषण ते विसरले आणि म्हणाले, चला आता माझी दूध पिण्याची वेळ झाली आहे. आई वाट बघत असेल असे म्हणून स्टेजवरून उडी मारून त्यांनी थेट घर गाठलं. म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणापासूनच ज्यांच्या विनोदाला गांभीर्याची झालर होती, असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. विनोदानंतर अपेक्षित प्रतिक्रियेसाठी थांबणे. श्रोत्यांकडे मिश्कीलपणे पाहणे, आवाजात योग्य तो चढ-उतार करणे अशाप्रकारे वक्तृत्वाला साजेसा अभिनय करणे, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक खास भाग होता.
त्यांचे मिश्कील आणि मार्मिक बोलणे मनाला भिडते व विचारांना निश्चित दिशा दाखवून जाते. डोळस निरीक्षण, असामान्य कल्पकता, प्रभावी मांडणी आणि त्यांच्या हजरजबाबीपणातून निर्माण झालेला विनोद चैतन्य निर्माण करणारा असे. लोकगीते, भजनी, भारुडे, लावण्या, स्त्रीगीते, तसेच ते संगीताचे जाणकार, उत्तम गायक, हार्मोनियम वादक होते. त्यांचे लिखाण जीवनचिंतन करायला लावणारे होते. चितळे मास्तरांच्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना ते म्हणतात, “मास्तरांच्या बायकोच्या गळ्यात काही मोती पडले नाहीत, पण डोळ्यांत मात्र पडले. या अशा कितीतरी वाक्यातून त्यांच्या लिखाणातून आर्थिक स्थितीचा अंदाज वाचकांना येतो. त्याचप्रमाणे आजही जागोजागी वावरणारा हरकाम्या नारायण या व्यक्तिरेखेतून संवेदनशीलतेने वाचकांना मानवतेची दृष्टी देतो.
एकूणच त्यांच्या लिखाणात मार्मिक सूक्ष्म चोखंदळ आणि प्रसन्न विनोद यांचा उपयोग कौशल्याने केलेला दिसून येतो. त्यांच्या हासू-आसूच्या हृदयगम रसायन भरलेल्या विनोदाला श्रेष्ठ दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये संस्कृती टीके सोबत, संस्कृतीच्या जपणुकीची ओढ आहे. त्यांच्या लेखनाची शैली चतुरस्र आणि बहुरंगी आहे. त्यांच्या प्रयोगातून श्रेष्ठ अभिनयाचा प्रत्येय रसिकांना येतो. त्यांचं रसरशीत रसाळ मनोवेधक, संभाषण आजही रसिकांच्या मनामनांत आहे. “विनोदाला शस्त्र म्हटलं आहे. ते शस्त्र आहे, हे खरंच आहे. कारण त्याला जखम करण्याची ताकद आहे. पण ते शस्त्र एखाद्या गुन्हेगाराच्या हातातलं किंवा एखाद्या गुंडाच्या हातातलं शस्त्र नसून, ते जीवन परत देणाऱ्या एका शल्यकर्म जाणणाऱ्या सर्जनचं शस्त्र आहे,” असं जब्बार पटेल यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये पु. ल. म्हणतात. अनेक संस्थांना त्यांनी आर्थिक मदत केली आहे. पुण्याच्या बालगंधर्व नाट्य मंदिराच्या उभारणीत त्यांचा सहभाग आहे. भारत सरकारने त्यांना १९६६ मध्ये पद्मश्री देऊन गौरव केला. १९६५ मध्ये नांदेड येथे भरलेल्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. उत्तम रसिकच उत्तम साहित्य निर्मिती करू शकतो. याची अनुभूती त्यांचे साहित्य वाचताना येते. साहित्य वाचताना ते जणू आपल्याशी संवाद साधत आहेत, असा भास होतो. अशा प्रकारे उत्तम नाटककार, विनोदकार, दिग्दर्शक, वक्ता, नट, कथाकथनकार, बहुरूपी नकलाकार, अशा पैलूंनी नटलेले बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाची सूक्ष्म निरीक्षण दृष्टी, संयम, साधा पेहराव, साधी राहणी, या सर्वांमधून जीवनाच्या विविध, रांगरंगांची उधळण, आपल्या शब्द सामर्थ्याने, करून वाद्य जीवनापासून, खाद्य जीवनापर्यंत, त्यांच्या साहित्य सागरात, आपल्या प्रतिभेने, अनेक साहित्यकृती, अजरामर झालेल्या आहेत.
अंमलदार, तुका म्हणे आता, तुझे आहे तुझपासी, भाग्यवान, सुंदर मी होणार, ती फुलराणी, ही नाटके त्यांनी लिहिली.
साधे मार्मिक संवाद हे त्यांच्या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य होते. व्यक्ती आणि वल्ली, खोगीर भरती, नसती उठाठेव, गोळा बेरीज, हसवणूक, गणगोत, गोळाबेरीज हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह, मिळवून आपण अवश्य वाचावेत, आणि जीवन चिंतन करावे.