भालचंद्र ठोंबरे
पुराणानूसार हिंदू धर्मात चार युग सांगितली आहेत. कृतयुग, त्रेतायुग द्वापार युग, कलियुग. कलियुगात धर्म एकपाद असल्याने त्यांची गती कमी असेल मात्र अधर्माला चार पाय असतील म्हणून तो जोरात धावेल म्हणजे कलियुगात लोकांची प्रवृत्ती अधर्माकडे जास्त असेल तसेच पुण्यापेक्षा पाप प्रबळ असेल. व्दापारयुग संपून कलियुग येणार या जाणिवेने अस्वस्थ झालेल्या पांडवांनी श्रीकृष्णाला याबाबत विचारणा केली. पाच पांडवांपैकी अर्जुन, भीम, नकुल व सहदेव यांनी कलियुग हे कसे असेल? असा प्रश्न श्रीकृष्णाला केला. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने चारही जणांना चार दिशेने जावयास सांगितले. कोणतीही विचित्र घटना तुम्हाला दिसल्यास ते मला येऊन सांगा असे म्हटले. त्याप्रमाणे चार जण चार दिशांना गेले व परत येऊन त्यांनी प्रत्येकाने आपण पाहिलेली विचित्र गोष्ट भगवान श्रीकृष्णाला कथन केली. अर्जुन म्हणाला त्याला एका ठिकाणी एक विचित्र दृश्य दिसले. एका पक्षाच्या पंखावर वेद लिहिलेले आहेत, मात्र तो पक्षी सशाचे मांस भक्षण करीत असलेला दिसला. तेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितले कलियुगात देवाबद्दल ज्ञान असणारे व देणारे अनेक असतील; परंतु ते साधकाचे शोषण करतील.
भीम म्हणाला वाटेत एके ठिकाणी मला एका विहीरीत भोवती चार विहीरी अशा पाच विहिरी दिसल्या. चार बाजूच्या विहिरीमध्ये भरपूर गोडे पाणी असून मधली विहीर मात्र कोरडी ठण्ण होती. भिमाच्या विहिरीच्या उदाहरणावरून भगवान म्हणाले, कलीयुगात श्रीमंताकडे भरपूर धन असेल चार विहिरीतील पाण्याप्रमाणे मात्र गरीबाला ते त्यातील काहीही देणार नाहीत, तो गरीब, गरीबच राहील मधल्या कोरड्या विहिरीप्रमाणे. नकूलला त्याच्या मार्गात एक गाय आपल्या नवजात शिशूला जिभेने चाटून चाटून साफ करीत असलेली दिसली. पण साफ झाल्यावरही तिचे चाटणे सुरूच होते. मात्र तिच्या चाटण्याने त्या शिशूला जखमा होऊ लागल्या होत्या तरी तिचे चाटणे सुटत नव्हते. गायीच्या चाटण्याबद्दल श्रीकृष्ण म्हणाले, कलीयुगात स्त्रिया आपल्या अपत्यावर इतके प्रेम करतील की, त्या प्रेमापोटी मुले अकार्यक्षम होऊन लाडाने वाया जातील.
शेवटी सहदेव म्हणाला मला एक मोठी शिळा, मोठ्या पहाडावरून पडत असून ती मार्गातील मोठमोठ्या वृक्षांना मुळापासून उखडून टाकीत असलेली दिसली मात्र खाली येत असलेला हा खडक मात्र एका लहान झुडपाजवळ येऊन थांबला. हे बघून मला अतिशय आश्चर्य वाटले. शिळेच्या उदाहरणावरून श्रीकृष्ण म्हणाले, कलीयुगात मनुष्य चारित्र्याबाबत खडकाप्रमाणे घसरत अत्यंत निच पातळीवर जाईल. मात्र भगवंताचे अल्प नामसमरणही (लहान झुडपात सारखे) त्याला अधोगतीपासून वाचवू शकेल रोखू शकेल. कृतयुगात यज्ञकेल्याने जे फळ मिळत होते ते कली युगात केवळ नामस्मरण केल्याने
प्राप्त होईल.
तात्पर्य : कलियुगात दंभाचार, ढोंगीपणा, स्वार्थीपणा, चरित्रहीनता अधर्म वाढीस लागेल. त्यामुळे मनुष्य पापाच्या खोल गर्तेत पडत जाईल. मात्र भगवंताचे अल्प नामस्मरणही त्याला या सर्व अधोगतीपासून थांबवेल व तारून नेईल.