नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री आतिशी यांची निवड करण्यात आली आहे. आज, रविवारी आम आदमी पार्टीच्या पक्ष मुख्यालयात झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीत सर्व आमदारांनी आतिशी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली. त्यांच्या माध्यमातून दिल्ली विधानसभेला पहिल्या विरोधी पक्षनेत्या मिळाल्या आहेत.
आतिशी आता दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावतील. त्या कालका मतदारसंघाच्या आमदार आहेत. आप सरकारमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांच्या कामामुळे पक्षातही त्यांचा लौकिक वाढला आहे.
विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सौरभ भारद्वाज यांसारख्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र आतिशी कालकाची आपली जागा वाचवण्यात यशस्वी झाल्या. पक्षातील एक मजबूत महिला चेहरा असल्याने, बैठकीत आतिशी यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले होते.