प्रा. प्रतिभा सराफ
‘धावत्यापाठी यश’ ही म्हण वाचनात आली आणि संध्याकाळी घराजवळच्या बागेत वॉकिंग ट्रॅकवरून चालताना काही धावणाऱ्या तरुणांकडे पाहून पुन्हा एकदा आठवली. या वॉकिंग ट्रॅकवरून अनेक वर्षे मी चालत आहे. माझ्यासोबत असंख्य माणसे चालताना मी अनुभवली आहेत. काही नुसत्या धावत असतात. धावणाऱ्यांकडे पाहून मला वाटते की, त्यांना कमी वेळात खूप गोष्टी साध्य करायच्या आहेत, म्हणून ती धावत आहेत की धावण्याच्या व्यायामाचे फायदे त्यांना मिळवायचे आहेत? पण असे माणसांना धावताना पाहिले की मलाच उगाच धाप लागल्यासारखी वाटते. या वॉकिंग ट्रॅकवरच नाही तर मुंबईत फिरताना आसपासची माणसे जणू धावताहेत, असेच मला वाटते. ऑफिसची वेळ गाठणे असो वा आणखी काही अगदी धावण्याची शर्यत असल्यासारखीच माणसे धावत असतात. खूप लहानपणीची गोष्ट यानिमित्ताने मला आठवली की आई आम्हा बहिणींना घेऊन मामाच्या गावाला गेली होती. मुंबईवरून गावाला जाताना खूप वस्तू ती घेऊन जात असे जशा की जुन्या साड्या, बासमती तांदूळ, खजूर, नारळ (त्या काळात ओला नारळ विदर्भात मिळत नसे.), केक, कुकर इत्यादी ज्याची मागणी केली जायची ते सर्वकाही. या वस्तू नेताना तिला खूप जड व्हायच्या, शिवाय आम्ही मुलीसोबत असायचो, त्यात पाण्याच्या मातीचे मडकेसुद्धा सांभाळत न्यावे लागे. अशा वेळेस एकदा तिने हमाल (कुली) केला. तो धावतच निघाला. त्याच्या वेगात आम्हाला धावता येईना. आई त्याला आवाज देत होती; पण परंतु रेल्वे स्टेशनच्या गर्दीत त्याला आईचा आवाज काही पोहोचत नव्हता. आई मुलींचा घट्ट हात धरून मडकं सांभाळत धावण्याचा प्रयत्न करत होती; परंतु हमाल निसटलाच. आई खूप अस्वस्थ झाली. धापा टाकत आम्ही स्टेशनबाहेर पोहोचलो तर तो हमाल आमची वाट बघत शांतपणे उभा होता. त्याच्या वजनाच्या कमीत कमी दुप्पट सामान घेऊनही तो धावत होता. अंगाखांद्यावरील हे वजन त्याला लवकरात लवकर उतरून खाली ठेवायचे होते. आता जेव्हा हे आठवतेय तेव्हा असे वाटते की, ‘धावत्यापाठी यश’ ही म्हण सगळ्यांसाठीच लागू होते का?
इतक्यात त्या वॉकिंग ट्रॅकवरून चालताना काही ज्येष्ठ नागरिक अत्यंत हळू चालत होते, हे लक्षात आले. आता हे हळू चालतात याचा अर्थ ते वृद्ध आहेत की त्यांना आयुष्यात वेळ घालवायचा आहे म्हणून हळू चालताहेत? कमीत कमी या वयात त्यांना या बागेपर्यंत येता येत आहे, चालता येत आहे हे काय कमी आहे? मात्र चालताना त्यांचा आवाज सगळ्यांना ऐकू जातोय इतका मोठा आहे. ज्या वेगाने ते चालत आहेत त्या वेगामुळे त्यांना चालताना धाप लागत नाहीये त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा आवाज मात्र आपोआप मोठा झालेला आहे, हे लक्षात आले. आपण त्यांच्या बाजूने पुढे जाताना त्यांचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू येतो. त्यांच्या बोलण्यातले विषय आपल्याला कळतात. प्रत्येक जाणाऱ्या- येणाऱ्यांकडे ते व्यवस्थित पाहू शकतात. थोडेसे पुढे चालत गेल्यावर लक्षात येते की, काही स्त्रिया रमतगमत चालल्या आहेत. त्यांना कोणत्याही धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा नाहीये. त्यांचे चालणेसुद्धा हळुवार असून त्यांचा आवाजही दबल्यासारखाच आहे. त्यांच्या बोलण्यातील विषयसुद्धा मर्यादित आहेत, जसे की स्वयंपाकघर व मुलेबाळे. आपण बाजूने जाताना त्या हमखास आपल्याकडे पाहून हसतात. एके दिवशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला तर चार पावलानंतर ती बाई सहज म्हणते, “तुझ्या वेगात मी नाही चालू शकत नाही, तू हो पुढे.” यातून दोन गोष्टी आपल्या लक्षात येतात. एक तिला काही काळ एकटेपणा हवाय स्वतःविषयी काही विचार करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे आपल्यामुळे कोणाची चाल मंदावू नये.
अशाच या वॉकिंग ट्रॅकवर मला अनेक मैत्रिणी भेटल्या. आपल्या चालण्याच्या वेगापेक्षा मनातील भावनांची चाल चांगली असेल तर गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित इत्यादी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी गळून पडतात. हा वॉकिंग ट्रॅक मला नेहमी माणसे जोडणारा वाटतो. याच वॉकिंग ट्रॅकवर जेव्हा आजी-आजोबांबरोबर लहान मुले खेळायला येतात, तेव्हा तर त्यांच्या मागे धावणाऱ्या त्यांच्या आजी-आजोबांना एवढी शक्ती कुठून येते कळत नाही. अगदी त्यांच्या बरोबरीने त्यांना धावावे लागते तेव्हा ते सहज धावतात. शेवटी काय तर या लहानग्यांमुळे वृद्धसुद्धा काही काळ आपोआप तरुण होतात. तर चला घराबाहेर पडू या. धावणे जरी जमले नाही तरी चालू या. चालणे जरी जमले नाही तरी काही काळ बसून बोलू या. सर्व भेदभाव विसरून एका पातळीवर येऊ या!
pratibha.saraph@ gmail.com