Share

रमेश तांबे

एक होती मांजर. सगळ्यांची आवडती. सगळे तिला मनी म्हणायचे. एकदा हीच मनी रस्त्याच्या कडेकडेने फिरत होती. फिरता फिरता तिला दिसलं एक दप्तर! रस्त्याच्या कडेला पडलेलं. दप्तर उचलून तिने अडकवले पाठीवर आणि निघाली ठुमकत ठुमकत. चालता चालता तिला भेटली तिची मैत्रीण. मैत्रीण म्हणाली, मने मने सांग ना मला पाठीवर तुझ्या आहे तरी काय? छोट्या मुलाचं दिसतंय दप्तर त्याचा तुला उपयोग नाय! तशी मनी तोऱ्यातच म्हणाली,
पाठीवर माझ्या आहे दप्तर
पुस्तकं त्यात आहे सत्तर
शाळेत जाणार, अभ्यास करणार,
सगळ्यांना मी टक्कर देणार!

मग नाक मुुरडत मुुरडत मनी पुढे निघाली. चालता चालता तिला भेेटला एक कुत्रा. मनीच्या पाठीवरचं ओझं बघून कुत्र्याला हसायलाच आलं. तो हसत हसतच मनीला म्हणाला,
मने मने खरंच सांग
कोणी केली शिक्षा तुला
पाठीवर ओझं घेऊन फिरतेस
पाठदुखी होईल तुला!

कुत्र्याचं बोलणं ऐकून मनी खो-खो हसू लागली आणि त्याला म्हणाली,
अरे पाठीवर माझ्या आहे दप्तर
पुस्तकं त्यात आहे सत्तर
आता मी शाळेत जाणार
मुलांसारखा अभ्यास करणार!

पण कुत्र्याला मनीचं बोलणं काही कळलंच नाही. तो डोकं खाजवत खाजवत निघून गेला. मनी मात्र आपल्याच धुंदीत, कधी चालत, तर कधी उड्या मारत, पाठीवरचं दप्तर रुबाबात मिरवत चालली होती. तेवढ्यात दोन पिटुकले उंदीर तिच्यासमोर उभे ठाकले. मनीला बघून दोघे एकदम म्हणाले,
एका मुलाचं दप्तर हरवलंय
रस्त्याच्या कडेला ते रडत बसलंय
दे ते दप्तर आमच्याकडे
देऊन येतो आम्ही पटकन!
मनी त्यांना घुश्यातच म्हणाली,
मला तुम्ही फसवू नका
माझ्या दप्तरावर तुमचा डोळा
राग माझा वाढत चाललाय
तुम्ही दोघे इथून पळा!

मनीचे लाल लाल डोळे बघून दोन्ही उंदरांनी जोराची धूम ठोकली अन् दिसेनासे झाले. इकडे मनी निघाली ठुमकत ठुमकत. चालता चालता तिला दिसली एक शाळा. शाळा सुरू होती. शाळेत अजिबात गडबड नव्हती. मनी शाळेत शिरली. तिने बघितले एक मुलगा वर्गाबाहेर पायाचे अंगठे पकडून उभा होता. मनीला आश्चर्यच वाटले. ती हळूच म्हणाली,
काय रे मुला, वर बघ जरा
वर्गाच्या बाहेर तू का उभा?
अभ्यासाला दांडी मारलीस
की वर्गात भांडणं केलीस!

मग मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, “काय सांगू मनीताई, आज शाळेत येताना माझं दप्तर हरवलं. शाळेत आलो तर सर म्हणतात, “दप्तर नाही तर बाहेर उभा राहा. आता घरी जाऊन आई-बाबादेखील ओरडतील. म्हणतील गधड्या दप्तर कुठे टाकून आलास.” अन् तो मुलगा रडू लागला. आता मात्र मनीला त्याची दया आली. पाठीवरचे दप्तर दाखवत मनी म्हणाली, अरे मुला हेच का तुझे दप्तर? दप्तर बघताच मुलाला आनंद झाला. “हो मनीताई हेच आहे माझे दप्तर!” मुलाचे हसू बघून मनीलाही आनंद झाला. मग दप्तर घेऊन मुलगा आनंदाने वर्गात गेला. शाळा सुटेपर्यंत मनीदेखील शाळेबाहेरच थांबली. पुढे दोघांची चांगलीच मैत्री झाली. आता मनी रोज शाळेत येते. शाळा सुटेपर्यंत बाहेर थांबते. मुलांचा आवाज,
त्यांचे खेळ आनंदाने बघते आणि शाळेत आल्याचा आनंद घेते!

Tags: cat

Recent Posts

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

18 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

55 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

3 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

5 hours ago