शनिवारी पहाटे पावणेतीन पासून दर्शनास प्रारंभ…
आंगणेवाडी (प्रतिनिधी): श्री देवी भराडी मातेचा जयजयकार ऽऽऽऽ, श्री देवी भराडी माते नमो नमः ऽऽऽऽ असा चाललेला जयघोष, आंगणे कुटुंबीयांच्या वार्षिकोत्सवाच्या म्हणजेच यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवालयाच्या गाभाऱ्यासह आज मोड यात्रेने सांगता सभामंडपात केलेली फुलांची सजावट आणि मंदिराच्या कळसावरून केलेला फिरत्या लेझर लाईटचा शो यामुळे आंगणेवाडीचा नजारा अवर्णणीय असाच वाटत होता.
प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी मातेच्या यात्रेला शनिवारी जनसागर लोटला होता. मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमान्यांनी देवीच्या दर्शनासाठी पहाटे १ वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ, आंगणे कुटुंबीय आणि जिल्हा प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे एकूण नऊ रांगा तसेच मुखदर्शन व्यवस्थेमुळे भाविकाना कमीत कमी वेळेत देवीचे दर्शन झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने देवालयाच्या स्वागत कक्षाकडे येणारे दोन्ही मार्ग काही काल बंद केल्याने भाविकांना गैरसोयीचे झाले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
पहाटेच्या थंडीची तमा न बाळगता भाविकानी रांगेद्वारे दर्शन घेतले. भाविकांच्या दर्शन रांगा दुरवर पसरलेल्या दिसत होत्या, महनीय व्यक्तींच्या दर्शन रांगेत दिवसभर गर्दी दिसून आली. भाविकाना आवश्यक सूचना देण्यासाठी बाबू आंगणे, बाळा आंगणे आदी मेहनत घेत होते. एसटी महामंडळाने आपल्या हंगामी अशा मसुरे, मालवण, कणकवली या तिन्ही स्टँडवरून प्रवाशाना सुरळीत सेवा पुरवली. तसेच गावागावांतून खास यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन केले होते. जिल्हा बँकेच्या वतीने फिरती एटीम सेवा, बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. नियंत्रण कक्षाकडून ग्रामस्थांना वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या, कृषी प्रदर्शन स्थळी सुद्धा शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. मालवण तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कक्ष उभारून कायदेविषयक माहिती देण्यात आली.
सायंकाळनंतर भाविकांचा ओघ वाढला
यात्रे दरम्यान अनेक राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची भराडी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत मांदियाळी फुलली होती. दुपारपर्यंत भाविकानी फुलून गेलेला आंगणेवाडीचा परिसर सूर्यास्तानंतर तर गर्दीने ओव्हर फ्लो झाला.