दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या साखळी सामन्यात आज (रविवार २३ फेब्रुवारी) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या आधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझम सराव सत्रात सहभागी झालेला नाही. तो सराव सत्रात दिसलाच नाही. यामुळे बाबर आझम भारताविरुद्ध खेळणार की नाही, यावरुन तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
बाबर आझम सराव सत्रात दिसलाच नाही !
कराची येथे बुधवारी झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात घरच्या मैदानावर पाकिस्तानचा निराशाजनक पराभव झाला. यामुळे पाकिस्तानसाठी भारताविरुद्धचा सामना जिंकू किंवा मरू अशा स्वरुपाचा आहे. पण या महत्त्वाच्या सामन्याआधीच बाबर आझमविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. यामुळे पाकिस्तानला भारताविरुद्धच्या सामन्याआधीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बाबर आझम खेळला नाही तर पाकिस्तानची फलंदाजी कमकुवत होण्याचा धोका आहे. हीच पाकिस्तानसाठी मोठी चिंतेची बाब आहे.
भारताविरुद्धच्या सामन्याची तयारी म्हणून शनिवारी पाकिस्तानने सामन्याआधी सकाळी सराव केला. या महत्त्वाच्या सराव सत्राला बाबर आझम गैरहजर होता. यामुळेच बाबर आझम अनफिट असल्याच्या आणि भारताविरुद्ध खेळणार नसल्याच्या चर्चेने जोर धरला.
बाबर आझम आणि चिंता वाढवणारा फॉर्म
बाबर आझम सराव सत्राला का आला नव्हता याबाबत विचारले असता कोच अकिब जावेद बोलणे टाळले. चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंड विरुद्ध बाबर आझमने ६४ धावा केल्या. पण या धावा त्याने ज्या गतीने केल्या ती बाब अनेकांची चिंता वाढवण्यास कारण ठरली. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये चमकलेला फखर जमान दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. आता आझम पण खेळणार नसेल तर पाकिस्तानची फलंदाजी आणखी कमकुवत होण्याचा धोका व्यक्त होत आहे.
बाबर आझमची कामगिरी
बाबर आझमने भारताविरूद्धच्या सात डावांमधून ३१.१ च्या सरासरीने आणि ७५.२ च्या स्ट्राईक रेटने २१८ धावा आहेत.