Thursday, March 27, 2025

सदासुखी

डॉ. विजया वाड

शंभूनाथ, ए शंभ्या… कुठे उलथला आहेस तू?” मालकाने हाळी दिली. चौथ्या हाळीला शंभूनाथ हजर झाला. “त्याला कशाला कामाला ठेवता तुम्ही?” “चूप बस.” “जेव्हा तेव्हा हाच शब्द येतो थोबाडातून.” “चूप” “अरे शंभू, ते गिऱ्हाईक उलथलं.” बायको रागावून घरी गेली. “येईल परत मालक.” “येवढी खात्री आहे तुला?” “गरोदर बाईला कशी माती खावीशी वाटते ना मालक, तशी या गिऱ्हाईकाला आपल्या दुकानाची चटक आहे.” “आता दहा मिनिटांच्या आत गिऱ्हाईक दुकानात आलंच पाहिजे. त्याने किमान सातशे रुपये खिशातून काढलेच पाहिजेत. मला दुकानाचे भाडे भरायला तेवढे पैशे लागतील. “येणार येणार येणार आले !” शंभूनाथ मांत्रिकासारखाच वाटला मालकाच्या बायकोला. “शित्ये, आलं बघ तेच गिऱ्हाईक.” नवरा-बायकोला खूश होत म्हणाला. “काय मालक? या मालक. स्वागत आहे आपलं.” “मी परत आलोय कारण हजार रुपयांचा माल घेतला, तर टेन पर्सेंट सूट मिळेल असा सांगावा आला. दोन किलो बासमती, दोन लिटर खायचं तेल आणि तेलाचा दोन किलोचा डबाच द्या मला. उरल्या पैशात अमूल बटर द्या.” “बस ना. शंभूनाथ, सामान पॅक कर साहेबांचं, सूट द्यायला विसरू नकोस. भाऊ, चहा घेणार हाफ हाफ?” दुकानाचे मालक मऊभार आवाजात बोलू लागले. “हजार रुपयांच्या सामानाला आम्ही टेन पर्सेंट सूट देतो.” मालक संवाद वाढवायच्या इराद्याने बोलले. “ हो. हो… म्हणून तर आलो.”

“हॅ हॅ हॅ ss” मालक खुशीने हसले.” “तुम्ही दुकानावर पाटीच लटकवा तशी.” “नको. आहे ते, बरंय ! ठीक आहे.” “का हो? बायको हिशेब विचारते का?” “मनकवडे आहात.” “बायकोला खूश ठेवावं लागतं. निजेला लागते ना? उपैगी वस्तू !”
“असं प्रकटू नये.” “बरं बुवा ! गपशीर बसतो.” “अरे शंभूनाथ, साहेबांचं सामान दे व्यवस्थित.” “देतो मालक.” “शंभूनाथने सबकुछ ऑर्डरबरहुकूम केलं. पैसे घेतले छन छन रुपये. सळसळ नोटा. खिसा गरम केला. “तिजोरीत ठेव ना ! खिसा भरतो खुशाल?” “आज काल नोकरमाणसं फार निर्दावली आहेत.” अनावश्यक बोल पण गिऱ्हाईकास मालकाने दुखावले नाही. “शंभूनाथ आमचा फार निहायती वफादार सेवक आहे बरं, मी त्यास सहसा दुखवीत नाही साहेब.” “हा तुमचा मनाचा मोठेपणा झाला.” बायकोवर डाफरणारा आपला मालक आपल्यावर फिदा कसा असतो? त्याने अनेकदा मनास विचारले.
गिऱ्हाईक माल घेऊन परतले. शंभूनाथ म्हणाला, “मालक, एक विचारू?” “दोन विचार.” “वैनीसायबांशी तुम्ही कठोर वागता.” “बायकोशी ‘आचार संहिता’ मांडून वागावं लागतं शंभू.” “म्हणजे.?” “म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे ! कुत्र्याचे कान! तिखटाचा मान ! तुमचा आमाचा पुरुष जातीचा सन्मान!” “आ?” “अरे, शंभू, जाताना एक गजरा नेतो मी. सुवासिक ! जुईचा ! नि गेल्याबरोबर तिच्या केसात माळतो. स्वारी खूश होते. तोंडात सॉरी एक सॉरी ते सॉरी दाहे सॉरीचा पाढा चालूच असतो.” “मग? तेवढ्यावर भागतं?” “नाही भागलं तर सपशेल लोटांगण घालतो.” “अरे बापरे !” “अजून तुझं लग्न झालं नाही म्हणून तुला अनुभव नाही” “खरंय मालक ! पण लोटांगण घालायचं म्हणजे जरा अधिकच झालं नाही का?” “तुला वस्तू खरेदी करताना पैसे मोजावे लागतात ना?” “हो मालक.” “मग स्त्री खूश असावी, रात्री शेजेवर आपणहून जवळ यावी, अशी तरतूद या व्यवस्थेत आहे हे निश्चित. सदैव सुखात वैवाहिक जीवन जावं या विचारानं मी हे सारं करतो. प्रत्येक नवरा वेगळा-वेगळा प्रयोग करून आपल्या बायकोस खूश ठेवत असतो. कारण निजी जिंदगी सदासुखी असावी, असं प्रत्येक नरास वाटत.” “होय मालक. समजलो.” शंभूनाथ नव्याने शहाणा झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -