रवींद्र तांबे
तज्ज्ञ व पात्रताधारक शिक्षक असून सुद्धा विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीची गरज आहे का? याचा विचार होणे आवश्यक आहे. त्यात कायम विना अनुदान शाळांचे वाढते प्रमाण ते सुद्धा पात्रता असून तुटपुंजा पगारावर शिक्षकसेवक म्हणून सेवा करावी लागत असली तरी त्यांना भविष्याची चिंता कायम आहे. पात्रता समान असली तरी कायमस्वरूपी शिक्षकाला रुपये पन्नास हजारांपेक्षा जास्त पगार आणि त्याच ठिकाणी कंत्राटी शिक्षक म्हणून ग्रामीण भागात रुपये चार हजार पगार दिला जातो. तो सुद्धा वेळेवर मिळत नाही. आजच्या परिस्थितीचा अभ्यास केल्यास प्राथमिक विभाग ते पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रुपये चार हजार ते रुपये तीन लाखांपेक्षा जास्त पगार घेणारे अध्यापक आहेत. तरीपण असे प्रकार कसे होतात याचा सखोलपणे अभ्यास होणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने कॉपीमुक्त परीक्षा होतील.
महाराष्ट्र राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा एक चांगला निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी न करण्याची शपथ घेतली आहे. कॉपीमुक्त अभियानाचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कॉपी न करण्याची सवय निर्माण करणे होय. एक चांगले पाऊल आपल्या राज्यातील शिक्षण मंडळाने घेतले आहे असेच म्हणावे लागेल. मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ विद्यार्थी नव्हे तर अध्यापक व पालकांनी या कॉपीमुक्त अभियानात सहभागी व्हावे. तरच राज्यात कॉपीमुक्त अभियान यशस्वी होईल.
अलीकडच्या काळातील परीक्षांचा विचार केल्यास परीक्षेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी कॉपीमुक्त अभियान का राबविण्यात आले याचा विचार होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने आपल्या राज्यात नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. फेब्रुवारी-मार्च २०२५ ची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झाली असून दहावीची (२१ फेब्रुवारी) परीक्षा कालपासून सुरू झाली आहे. बारावीच्या पहिल्या पेपरला राज्यात कोकण, मुंबई व कोल्हापूर विभाग सोडून इतर सहा विभागांत ४२ केंद्रांवर विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याचे प्रकार घडले आहेत. आतापर्यंत सर्वात जास्त कॉपी केस छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) विभागामध्ये झाले आहेत. मग सांगा कॉपीमुक्त अभियानाचे झाले काय? अशावेळी ताबडतोब कारवाई होणे आवश्यक आहे. जी कारवाई केली असेल त्याला वर्तमानपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्धी दिली पाहिजे. म्हणजे असे प्रकार पुढे होणार नाहीत.
महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यासाठी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ घेण्यात आली असून कॉपी प्रकरणे उघडकीस आली आहेत. म्हणजे कॉपीमुक्त अभियानाचा नेमका अर्थ काय? याचा विचार राज्यातील सुजाण नागरिकांनी करणे गरजेचे आहे. परीक्षेच्या अगोदर परीक्षा मंडळाच्या आदेशानुसार दहावी आणि बारावीच्या बोर्डच्या परीक्षेत परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन असे वचन परीक्षार्थीने घेतले आहे. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही. जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन असे वचनबद्ध विद्यार्थी झाले आहेत. तसेच परीक्षेला सामोरे जाताना परीक्षा मंडळाच्या सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे वचन घेतले आहे. त्याचप्रमाणे मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन.
परीक्षेमध्ये आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणावविरहित सामोरे जाईन व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे, आई-वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेन, अशी शपथ प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे. कॉपीमुक्त अभियानाचा विचार करता विद्यार्थ्यांनी शपथ घेतल्यास त्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल, असे परीक्षा मंडळाला वाटते. तसेच परीक्षा तणावरहित वातावरणात पार पाडता येतात. कॉपीमुक्त अभियानामुळे विद्यार्थ्यांना कॉपी प्रतिबंध अधिनियमाबद्दल माहिती मिळाल्याने ते जागरूक होऊन अभ्यास करून अधिक उत्साहाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतात. तेव्हा परीक्षेच्या कालावधीत शाळा परिसरात कॉपीमुक्त घोषवाक्याने जनजागृती फेरी काढण्यात यावी. गावची ग्रामसभा घेऊन कॉपीमुक्त अभियानाबाबत माहिती द्यावी. तसेच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आव्हान करून राज्यातील कॉपीमुक्त अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले पाहिजे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. अगदी शालांत परीक्षा ते स्पर्धा परीक्षा यांचा विचार करता या परीक्षा सुरू झाल्यावर कॉपी झाल्याचे वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळते. आज दहावी आणि बारावीच्या परीक्षा मंडळाने कॉपीमुक्त अभियान राबवून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली आहे. मात्र विद्यार्थी कॉपी का करतात याचा सुद्धा विचार होणे आवश्यक आहे. याचा विचार झाला असता तर आज शपथ घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली नसती. परीक्षेचे सोडा आज विद्यार्थ्यांसाठी साद घालत आहेत शाळा असे चित्र दिसत आहे.
तेव्हा अभ्यास वेळच्या वेळी करायचा नाही, नंतर पास होण्याचा झटपट उपाय म्हणजे परीक्षेत कॉपी करायची. यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एकप्रकारे अन्याय होत असतो. तेव्हा ही जी प्रवृत्ती आहे तिचा नायनाट केला पाहिजे. त्यासाठी असे विद्यार्थी का करतात याचा शोध लावणे गरजेचे आहे. कॉपीमुक्त अभियान दरम्यान दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियान पार पाडण्यासाठी आता जरी शपथ घेण्यात आली, जनजागृती करण्यात आली, घोषवाक्ये लिहिण्यात आली, तरी कॉपीमुक्त परीक्षा होणार का? या प्रश्नाचे उत्तर १७ मार्चनंतर मिळेल.