ठाणे : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यात सुमारे मार्च महिन्याच्या मध्यानंतर टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या (water shortage) अधिक तीव्र झाल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. सुमारे १० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई (Water Crisis) जाणवत असून या गावांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
Electricity Bill Hike : सर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक!
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड या दोन्ही तालुक्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून पाणी टंचाई जाणवण्यास सुरुवात होते. तर शहापूर तालुक्यातील नागरिकांना याची भीषणता अधिक तीव्रतेने जाणवते. यासाठी जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. यंदाही फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच शहापूर मधील सुमारे १० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यापर्यंत जिल्ह्यातील पाणी टंचाई जाणवणाऱ्या गावांना टँकरने, विंधन विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यासाठी आरखडा आखण्यात आला आहे. यातील सुमारे २२३ गावांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी १२ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
मागील दोन वर्षाच्या कालावधीत शहापूर तसेच मुरबाड तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या निधीतून जलजीवन मिशन राबविण्यात आले. तसेच प्रत्येक घरात नळजोडणीही देण्यात आली. मात्र, अद्याप नळांद्वारे पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे या जोडण्याचे काय करायचे, असा संतप्त सवाल शहापूरवासीय करीत आहेत.