ट्युशनविना देदीप्यमान यश! मराठवाड्यात असलेल्या अशा परिस्थितीतही ट्युशन न लावता देशातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी व ‘आयआयटी’ला प्रवेश देणारी पहिली पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेत नांदेड व परभणी जिल्ह्यँतील विद्यार्थ्यांनी कुठलीही शिकवणी न लावता भर भक्कम गुण मिळविले आहेत. कुठलीही ट्युशन न लावता तुम्हाला देशातील सर्वात मोठे मोठे स्पर्धात्मक परीक्षेतही यश मिळविता येते, असा संदेश त्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाजाला दिला आहे. नांदेड येथील अमेय भावसार या विद्यार्थ्यांने जेईई मेन्स अॅडव्हान्स परीक्षेत ९८.०६% टाईल तर परभणी येथील हर्षद मुळे या विद्यार्थ्याने ९९.६३ % टाईल एवढे गुण मिळविले आहेत.
अभयकुमार दांडगे
राजस्थान, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांत असलेल्या ‘ट्युशन इंडस्ट्री’ने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड या जिल्ह्यांत पाय रोवले आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या शाखा काढून पालक व विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे काम या ‘ट्युशन इंडस्ट्री’ने चालविले आहे. यामुळे मात्र महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. महाविद्यालयात ‘ट्युशन इंडस्ट्री’ला मदत म्हणून नावापुरतीच उपस्थिती दाखवली जात आहे. डॉक्टर किंवा इंजिनीयर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात दोन वर्षांसाठी स्थायिक होत आहेत. हे सर्व ठीक असले तरी या प्रकारांमुळे मराठवाड्यात मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, मुख्य सचिवांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
आपल्या मुलांनी शिकावं व खूप मोठं व्हावं ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्याखातर पालक मुलांच्या शाळा, कॉलेज व ट्युशनच्या शिक्षणासाठी धडपडत असतात. पूर्वीच्या काळात मुलांना ट्युशन लावणे म्हणजे मुलगा ‘ढ’ आहे, असा समज होता; परंतु आता तो समज पूर्णपणे पुसला गेला आहे. मुलांना ट्युशन असेल तरच तो काहीतरी शिकू शकेल व पुढे जाईल असे चित्र संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे देशातील सर्वच प्रकारच्या ट्युशन इंडस्ट्रीने मराठवाड्यात पाय रोवले आहेत; परंतु या ट्युशन इंडस्ट्रीच्या माध्यमातून मराठवाड्यात पालकांची कशाप्रकारे दिशाभूल व आर्थिक फसवणूक होत आहे हे कोणाच्याही लक्षात येत नाही. विशेष म्हणजे या ट्युशन इंडस्ट्रीमुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातून मराठवाड्यात ट्युशनसाठी मुले प्रवेश घेत आहेत. यामधून गुन्हेगारी देखील वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नांदेडमध्ये अलीकडेच एका पर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी चाकूने भोसकून खून झाल्याने हे प्रकरण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे खून करणारे तीनही आरोपी हे अल्पवयीन म्हणजेच १७ वर्षांचे होते. ते देखील बाहेर गावातील; परंतु ट्युशनच्या निमित्ताने नांदेडमध्ये स्थलांतरित झालेले आहेत.हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या संस्थेतील एका मुख्याध्यापकावर दहावीच्या मुलीला पोलीस अॅकॅडमीत भरती करण्याचे अामिष दाखवून अतिप्रसंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार नांदेड जिल्ह्यातील तामसा पोलीस स्थानक हद्दीत घडला. सदरील मुख्याध्यापक फरार असून पोलीस त्या मुख्याध्यापकाचा शोध घेत आहेत. एकीकडे शिक्षण शिकविण्याच्या नावावर शाळा व महाविद्यालयात शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला दिसून येत आहे.
सध्या बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला असल्याने पर जिल्ह्यातील विद्यार्थी नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या जिल्ह्यातून परीक्षा देत असल्याचे समोर आले आहे. ट्युशन इंडस्ट्रीने विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना त्यांच्या महाविद्यालयाची सोय देखील करून दिलेली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया अशा वेगवेगळ्या शहरातील विद्यार्थी मराठवाड्यात कोचिंग इंडस्ट्रीमध्ये प्रवेश घेऊन शिकत आहेत. शिक्षणाच्या या पवित्र क्षेत्रात मराठवाड्यात मात्र अलबेल आहे. एकीकडे महाविद्यालयातील प्राध्यापकांना शासनाकडून लाखो रुपयांचा पगार मिळत असताना त्यांचे काम मात्र शून्यावर आले आहे. त्यांचे काम ट्युशन इंडस्ट्री पार पाडत आहे. ही जमेची बाजू म्हणावी की, पालकांसाठी धोक्याची घंटा म्हणावी, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. नांदेडमध्ये ट्युशनच्या नावाखाली अनेकांनी वेगवेगळे व्यापार थाटले आहेत. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या देखील वाढलेली असल्यामुळे नको ते गैरप्रकार देखील मूळ धरत आहेत.
काही दिवसांपूर्वी नांदेडच्या आनंद नगर चौर रस्त्यावर झालेल्या खून प्रकरणानंतर भाईगिरी तसेच दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर व इंजिनीयरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारोंच्या संख्येमध्ये विद्यार्थी व पालक नांदेडमध्ये बस्तान मांडत आहेत; परंतु त्यापैकी केवळ पाच ते सात टक्के विद्यार्थी व पालकांनाच त्यामध्ये यश मिळत आहे. ही टक्केवारी पाहिली तर पालक व विद्यार्थ्यांची या ट्युशन इंडस्ट्रीकडून मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत असल्याचेही स्पष्ट होत आहे. शेवटी प्रत्येक विद्यार्थी व पालकांना आशा असते. त्यामुळे या आशेवरच ही मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपरांतून नांदेडमध्ये स्थलांतरित होत आहेत.