युवराज अवसरमल
तनिषा वर्दे ही अशी भाग्यशाली अभिनेत्री आहे, जिला एकाच वेळी दोन वेगळ्या धाटणीच्या भूमिका रंगमंचावर साकारण्याची संधी मिळालेली आहे. ‘नकळत सारे घडले’ हे तिचे नाटक सुरू आहेच, परंतु आता रणरागिणी ताराराणी हे नवीन नाटक रंगमंचावर आले आहे. स्वराज्याची वीरांगना, महाराष्ट्राची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे त्यांचे वर्णन केले गेले आहे. आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे. युवराज पाटील लिखित व विजय राणे दिग्दर्शित या नाटकाचा शुभारंभ नुकताच झाला. तनीषा वयाच्या सहाव्या वर्षांपासून प्रायोगिक नाटकात काम करतेय. आविष्कार ग्रुपच्या ‘आणि बुद्ध हसला’ या नाटकात तिने काम केले होते. ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर लिखित ‘विठ्ठल विठ्ठल’ या एकांकिकेमध्ये तिने काम केले. तिने पहिले दोन अंकी प्रायोगिक नाटक केले त्याच नाव होत कथेकरी. याचे लेखक व दिग्दर्शक होते डॉ. अनिल बांदिवडेकर. या नाटकासाठी तिला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पॉज नावाच्या एकांकिकेमध्ये तिने काम केले होते. त्याबद्दल तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी राज्य सरकारच्या स्पर्धेतून पारितोषिक मिळाले होते. तिने आईना, तीन बंदर ह्या हिंदी एकांकिका देखील केल्या. तनिषाचे शालेय शिक्षण गोरेगावच्या यशोधाम हायस्कूलमध्ये झाले. शाळेतील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला होता. एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये तिला सलगपणे चार वर्षे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर तिने रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला. आता ती बॅचलर इन सायकॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षाला आहे.
जून २०२४ मध्ये तिला पहिले व्यावसायिक नाटक ‘नकळत सारे घडले’ मिळाले. विजय केंकरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी तिचे काला घोडा हे नाटक पाहिले होते. तिचा अभिनय आवडल्याने तिला ‘नकळत सारे घडले’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. हे नाटक तिच्या जीवनातले टर्निंग पॉइंट ठरले. हे जुने नाटक आहे. दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनित केलेले हे नाटक आहे. यामध्ये मोनिकाची व्यक्तिरेखा ती साकारित आहे. तिच्या जवळच्या मित्राच्या वागण्यात झालेला बदल ती ओळखते व तिच्या बहिणीला बोलावून घेते. पहिल्यांदा तिला अभिनेते आनंद इंगळे सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून भरपूर गोष्टी तिला शिकायला मिळाल्या. तो खूप सपोर्टीव आहे, असे देखील तिने सांगितले. आनंद मामा आणि भाचा यांच्यातील ती दुवा आहे. तिची व्यक्तिरेखा संयमी आहे. जेव्हा एखादी गोष्ट टोकाला जाते तेव्हा न बोलता, तिच्या मनाची होणारी घालमेल, प्रेक्षकांची दाद देऊन जाते. रणरागिणी ताराराणी या नवीन नाटकात तिची ताराराणीची भूमिका आहे. आशीर्वाद मराठे सर व मानसी ताई यांनी मला सांगितले की, दिग्दर्शक विजय राणे ताराराणीवर एक नाटक करीत आहे. त्यासाठी पात्रांची निवड सुरू आहे, तू प्रयत्न कर. मी गेले, नाटकाचे संवाद म्हटले व नकळतपणे माझी ताराराणीच्या भूमिकेसाठी निवड झाली, असे तनिशाने सांगितले. ताराराणीच्या जीवनातील वेगवेगळ्या अवस्था या नाटकात पाहायला मिळणार आहे. लग्नानंतरच्या ताराराणी, राजाराम जिंजीला गेल्यानंतर त्यांची अवस्था, विधवा झाल्यानंतर त्यांनी घेतलेला स्वातंत्र लढ्याचा वसा, पुढे त्यांनी मुघलाविरुद्ध म्हणजे औरंगजेब विरुद्ध दिलेला लढा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ताराराणीच्या वेगवेगळ्या अवस्था साकारण्याची संधी मला मिळाली. ही भूमिका साकारताना नऊवारी साडी नेसून लढाई करण्याचे मोठे आव्हान आहे. तलवार बाजी, लाठीकाठी, भाले वापरणे ही कला मला शिकायला मिळाली. ताराराणीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे.
दिग्दर्शक विजय राणेनी ताराराणीची भूमिका साकारताना कशी मदत केली असे विचारल्यावर तनीषा म्हणाली की, त्यांनी मला संपूर्ण इतिहास सांगितला. ताराराणीची माहिती, काही व्हीडिओ दिले. ताराराणीची भूमिका साकारताना शरीराची देहबोली कशी असावी याची माहिती दिली. ते स्वतः संयमी आहेत. कलाकारांकडून चांगले काम काढून घेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. तनीषाला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये कविता लिहायला आवडतात. शायरी करायला आवडते. चारोळ्या लिहायला आवडते. लहानपणी ती थोडी कथ्थक देखील शिकली आहे. तिने जाहिरातीसाठी हिंदी, मराठी, बंगाली भाषेत डबिंग देखील केले आहे.