सध्या नाटकांचे गौरव, सन्मान, नामांकनं, मानांकनं, लक्षवेधी, विशेष लक्षवेधी, क्रिटिक्स अॅवॉर्ड्स, ज्युरी अॅवॉर्ड्सचे भरगच्च सोहळे सुरू आहेत. हे इव्हेंट्स घडवणाऱ्या संस्था आपापल्या दृष्टीने त्या इव्हेंट्सचा यथेच्छ वापर करून घेत आहेत. हा वापर कसा आणि का होतो याचा ऊहापोह एकदा झाला पाहिजे, असे मला सतत वाटतं असे. कारण सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत यातील ‘हिडन अजेंडा’ पोहोचला पाहिजे. टीव्ही चॅनल्सना सातत्याने लागणारे सॉफ्टवेअर (कार्यक्रम) निर्माण करणारी एक टीम त्या चॅनलचा वा वर्तमानपत्राचा चेहरामोहरा घडावा, समाजाने आकर्षित व्हावे यासाठी सतत नवनवीन क्लृप्त्या शोधत असते. मालिकांव्यतिरिक्त काही चेंज प्रेक्षकांना द्यावा यासाठी रिअॅलिटी शोजची संकल्पना प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यात हे चॅनल्स यशस्वी झाले. यशस्वी हा शब्दप्रयोग अशासाठी केलाय की हे गळी उतरवणे सशुल्क होते; परंतु फोन वोटिंग हा प्रकार प्रेक्षकांना खर्चात टाकणारा होता. लाखो-करोडो प्रेक्षकांनी केलेले फोन कॉल्स, चॅनल्स आणि मोबाईल फोन सर्व्हिस प्रोव्हायडरची तुंबडी भरून गेले. प्रेक्षकांना नागवून सर्वानीच मिळणाऱ्या गंगाजळीत हात धुवून घेतले. यात सरकारचाही वाटा होताच. पुढे कालांतराने प्रेक्षक सुज्ञ होत गेला आणि फोन व्होटिंगला अवकळा आल्यावर पुन्हा नव्या क्लृप्त्या शोधून प्रेक्षकांना पकडून ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले व अद्यापही होताहेत. यात खऱ्या अर्थाने भरडल्या जाणाऱ्या घटकांबद्दल कधीही बोलले जात नाही, तो घटक वर्ग म्हणजे अप्रस्थापित नवव्यावसायिक रंगकर्मींचा…! (या रंगकर्मींमध्ये सिनेमा, मालिका आणि नाटकांत काम करणाऱ्या सर्व नवीन वेठबिगार अंतर्भूत आहेत.) तर मग असे चॅनल्स आपण कसे या रंगकर्मींना प्रोत्साहन देत असतो अथवा त्यांच्या रंगकार्याच्या गौरवाची जाण आम्हालाच कशी आहे, याची चढाओढ करायला मोकळे होतात.
यात गंमत वाटते ती नाटकवाल्यांची. या कौतुक सोहळावाल्यानी नाटकांना सेलिब्रिटी परीक्षक पाठवून ऑस्कर नामांकनांच्या घोषणे प्रमाणे हातातल्या प्रसार माध्यमाद्वारे नामांकनाची वर्गवारी जाहीर केली जाते. आपले नाव नॉमिनेशनमध्ये घेतले गेलेय याचे अप्रूप आणि आनंद त्या स्पर्धकाला अभिमानाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन सोडतो. आपल्यासारखे अन्य चारजण या चॅनलने लावलेल्या रॅटरेसमध्ये आहेत हे तो विसरतो, आपल्यापेक्षा त्या चारांना फेसव्हॅल्यू आहे हे तो विसरतो, अंतिमतः ज्यावेळी या कार्यक्रमाचे प्रक्षेपण चॅनल वरून होईल तेव्हा टीव्हीवरील प्रेक्षकांना अननोन फेसमध्ये कधीच रुची नसते. हे त्या बापड्या नव्याने होऊ घातलेल्या नटाला, नटीला, दिग्दर्शकाला समजायला फार वेळ लागतो. तोवर दरवर्षी हा नववर्ग इमानेइतबारे नामांकनात झळकत राहातो. एखाद्या कलाकृतीला आपण हिट समजणं आणि चॅनलच्या गणिताप्रमाणे हिट असणं हे दोन ध्रुव आहेत. तेव्हा आपल्याला पुरस्कार का मिळाला नाही याचे उत्तर एकच असते, ते म्हणजे तुमच्या थोबाडाला फेसव्हॅल्यू नाही. प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार, संगीत संयोजन या विभागातील रंगकर्मीना तरी कुठे फेसव्हॅल्यू असते? म्हणून तर चॅनल्सवर दिसणाऱ्या सोहळ्यात यांना अग्रक्रम देऊन गाळले जाते. अशा या सोहळ्यात कुठलाही पुरस्कार विभागून अथवा एखाद्या कॅटेगरीसाठी दोन नावे असणाऱ्यांसाठी दिला जात नाही. कारण दोन ट्रॉफ्या दिल्या की खर्च वाढतो. पुरस्कार लांबतो, अशी एक ना हजार कारणे या सोहळ्यांचे मार्केटिंग घडवून आणत असतात.
नव्याने मिसरुड फुटलेल्या कॉलेज कुमाराने आपल्या नवनिर्मितीसह या पुरस्कारासाठी झोकून देणे जेवढे अमॅच्युअर लक्षण समजले जाते, तेवढेच तो पुरस्कार घोषित होईपर्यंत डोळ्याला डोळा न लागण्याचा काळ घालमेलीचा असतो. या घालमेलीचाही चॅनलवाले वापर करून घेतात. हल्ली तर रिल्स आणि मिनीव्ह्लॉगद्वारे व्हायरल करण्याचं नव मार्केटिंग तंत्र विकसित झालंय. पण हे सर्व सर्वायवलसाठी गरजेचे आहे, असं जर म्हणतं असलो तरी भरडलं जाणं म्हणजे नेमकं काय, तर… आपणही कदाचित उद्याचे स्टार असू…! या आशेने राज्यनाट्य स्पर्धेसाठी जी नाट्यनिर्मिती होते, ती नाटके या पुरस्कारांसाठी उतरवली जातात. छोटे- मोठे खटाटोप करून, नियमावलीत बसवून, येणाऱ्या परीक्षकांची बडदास्त राखत, गेला बाजार एक दोन तरी नॉमिनेशनने आपले नाटक चर्चिले जाऊ शकते, हा आशावाद तुम्हाला खर्चाच्या खोलीत नेऊन सोडतो आणि पुढील एक प्रयोग देखील ते नाटक पाहू शकत नाही. मी यंदा अशाच एका पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून काम पाहतो आहे. अशा अनेक हौशी नाटकांनी आम्हा परीक्षक वर्गाचा “घात” केलाय. या स्पर्धेमध्ये मात्र अनेक व्यावसायिक रंगकर्मींबरोबर हौशी मंडळींनी केलेल्या धाडसाला तोड नाही. आपण कोण आहोत, आपली कुवत किती, लायकी काय, याचा जराही विचार न करता ही हौशी नाटकं पुरस्कारांच्या आशेने स्पर्धेत भाग घेत, व्यावसायिकतेपुढे नांगी टाकून आपलं हसं करून घेत असतात. त्याना नाऊमेद करण्याचा या लेखाचा हेतू नाही मात्र दिवस अभ्यासाचे आहेत, स्ट्रॅटेजीचे आहेत, प्रॉडक्ट प्लेसमेंटचे आहेत, ज्यामुळे तुम्ही सिद्ध होऊन हौशी रंगकर्मी हा शिक्का पुसून खरे व्यावसायिक म्हणून सिद्ध होऊ शकता..!
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…