डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत असलेली पाटकर रस्त्यावरील उदवाहनाची कळ (बटण) बिघडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे स्थानकात झटपट जाण्यासाठी या उदवाहनाचा बहुतांशी प्रवासी वापर करतात. मागील काही दिवसांपासून या उदवहनाची स्कायवॉक दिशेकडील कळ बिघडली. एकदा उदवाहन प्रवासी घेऊन रेल्वे जिन्याच्या दिशेने गेले की पुन्हा उदवाहन तळाची कळ दाबल्यावर खाली येत नाही. या उदवाहनची कळ दुरुस्ती केली जात नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातून रेल्वे स्थानकातील फलाटावर जाण्यासाठी पाटकर रस्त्यावर कैलास लस्सी दुकानालगत रेल्वेचे उदवहन आहे. व्याधी असलेल्या अनेक प्रवाशांना उदवहनच्या माध्यमातून रेल्वे जिन्यावर जाऊन तेथे रेल्वे स्थानकातील फलाटावर किंवा डोंबिवली पश्चिम दिशेकडे जातात.
मागील काही दिवसांपासून उदवाहनच्या वरच्या बाजूकडील कळ (बटण) बिघडली आहे. प्रवासी एकदा तळाच्या भागाकडून उदवाहनमधून रेल्वे जिन्याच्या दिशेने वर गेले की, पुन्हा तळाला असलेल्या प्रवाशांनी वर गेलेली उदवाहन खाली येण्यासाठी तळाची कळ दाबली तरी उदवहन स्वयंचलित पद्धतीने खाली येत नाही. अनेक प्रवासी तळाची कळ दाबत बसतात. त्याचा काही उपयोग होत नाही. रेल्वे जिन्याकडील वरच्या भागातून प्रवासी तळाला येत असेल त्या प्रवाशांनी वरून कळ दाबली की मग उदवाहन खाली येते. जोपर्यंत रेल्वे जिन्याकडून प्रवासी तळ भागात येत नाही, तोपर्यंत उदवाहन वरच्या भागात अडकून पडते. कळ बिघडल्यामुळे हे उदवाहन बंद राहत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, प्रवाशांच्या तक्रारीवरुन रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून या उदवाहनमधील बिघाड दुरुस्त करण्याची मागणी केल्याचे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ अध्यक्षा लता अरगडे यांनी स्पष्ट केले आहे.