स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
तब्बल २७ वर्षांनी दिल्लीत भाजपाची सत्ता स्थापन झाली. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिल्ली विधानसभेच्या ७० पैकी ४८ जागांवर भाजपाचे आमदार निवडून दिले. भाजपाला सरकार स्थापनेचा स्पष्ट जनादेश मिळाला आणि अरविंद केजरीवाल यांना व त्यांच्या आम आदमी पक्षाला मतदारांनी नाकारले. काँग्रेसला सलग तिसऱ्या निवडणुकीत विधानसभेत खातेही उघडता आले नाही. केजरीवाल यांच्या पराभवाने आपच नव्हे तर विरोधी पक्षालाही मोठा झटका बसला. रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याचे जाहीर होताच एक महिला दिल्लीची मुख्यमंत्री झाली याचा जसा सर्वांना आनंद झाला तसाच प्रथमच आमदार झालेल्या रेखा यांची पक्ष श्रेष्ठींनी दिल्ली राज्याच्या सर्वोच्च पदासाठी निवड केली म्हणून अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला. नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांचा ४ हजार मतांनी पराभव करणारे प्रवेश वर्मा यांना देशभर जायंट किलर म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यांचे वडील साहबसिंग वर्मा हेही भाजपाचे दिल्लीचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी संधी मिळेल असे अनेकांनी गृहीत धरले होते. भाजपाचे अर्धा डझन नेते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते पण मोदी-शहांनी रेखा गुप्ता यांना झुकते माप दिले.
सन २०१४ पासून मोदी-शहांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा अश्वमेध देशभर दौडत आहे. देशात २१ राज्यांत भाजपा सत्तेवर आहे. केंद्रातही भाजपाने सरकार स्थापनेची व मोदींनी पंतप्रधानपदाची हॅटट्रीक संपादन केली आहे. राज्यात सत्ता मिळाल्यावर भाजपाने अनेक नवे चेहरे मुख्यंमत्रीपदावर बसवले. अनेक नेत्यांची मक्तेदारीही संपुष्टात आणली. मध्य प्रदेशात मोहन यादव, राजस्थानात भजनलाल शर्मा, हरयाणात सुरुवातीला मनहरलाल खट्टर व नंतर नायबसिंग सैनी, ओडिसामधे मोहन माझी, छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय आणि आता दिल्लीत रेखा गुप्ता यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवून नवे चेहरे सत्तेच्या सर्वोच्च पदांवर आणले. सन २०१७ मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदावर योगी आदित्यनाथ व सन २०२१ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर भूपेंद्र पटेल यांची निवड झाल्यावरही अनेकांना आश्चर्य वाटले होते. मोदी-शहा यांचे भक्कम पाठबळ त्यांच्या पाठीशी असल्याने पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्रीपदावर विश्वासाने काम करीत राहिले.रेखा गुप्ता या भाजपाच्या व एनडीएच्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. देशात सध्या दोनच राज्यांत महिला मुख्यमंत्री आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि आता दिल्लीत रेखा गुप्ता.
चौधरी चरणसिंग विद्यापीठाच्या दौलतराम कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना १९९२ मध्ये रेखा गुप्ता यांनी अखिल विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. १९९५ मध्ये त्या संघटनेच्या सरचिटणीस झाल्या. १९९६ मध्ये संघटनेत अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि नंतर राजधानी दिल्लीत भाजपाच्या कार्यकर्त्या, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी म्हणून त्या राजकारणात सक्रिय झाल्या. दिल्लीच्या सार्वजनिक जीवनात तब्बल तीन वेळा नगरसेवक म्हणून त्या महानगर परिषेदवर निवडून आल्या. अडीच दशकांच्या काळात दिल्ली प्रदेश भाजपामध्ये विविध पदांवर काम करताना त्यांनी आपला ठसाही उमटवला. निवडणुकीच्या राजकारणात त्यांनी पराभवही पचवले. दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. विद्यार्थी नेता ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहेच पण त्यांच्यातील निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्ता सदैव सज्ज आहे.रेखा गुप्ता यांचा जन्म हरियाणातील जिंदमध्ये १९७४ मध्ये झाला. त्यांचे वडील जय भगवान जिंदाल यांची दिल्लीला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पितमपुरा शाखेचे ब्रँच मॅनेजर म्हणून बदली झाली तेव्हापासून त्यांचा परिवार दिल्लीला राहायला आला. याच पितमपुरा मतदारसंघातून रेखा गुप्ता पुढे भाजपाच्या नगरसेवक झाल्या व त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूकही लढवली. आपच्या उमेदवारासमोर त्या दोन वेळा पराभूतही झाल्या. पण यंदा चांगल्या मतांनी निवडून आल्या.
रेखा गु्प्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर निवड करून भाजपाने आपण कार्यकर्त्यांना महत्त्व देतो व त्यांच्या पाठीशी उभे राहतो असा संदेश दिला आहे. भाजपाने सदैव संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची व प्रत्येक निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवायची हे भाजपाचे सूत्र असते. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस दिल्लीत सलग १५ वर्षे सत्तेवर होती. केजरीवाल यांचा पक्ष ११ वर्षे दिल्लीत सत्तेवर होता. पण त्यांनी सत्तेवर येऊनही संघटना बांधणीकडे पुरेसे लक्ष दिले नाही. रेखा गुप्ता यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर दिमाखात पार पडला. एनडीएचे देशभरांतील सारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच मोदी-शहा व केंद्रीय मंत्री या सोहळ्याला हजर होते. याच रामलीला मैदानावर काही वर्षांपूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात यूपीएचे सरकार असताना अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्तीसाठी आंदोलन केले होते. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातूनच अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व आले. याच आंदोलनाचा राजकीय लाभ उठवून केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. अण्णा हजारे यांचा विरोध झुगारून त्यांनी राजकारणात प्रवेश केला व विधानसभा निवडणूक लढवून दिल्लीची सत्ता काबीज केली. एक तपापूर्वी ज्या जनतेने केजरीवाल व त्यांच्या पक्षाला पाठिंबा दिला होता, तीच जनता विशेषत: मध्यमवर्गीय मतदार आज भाजपाच्या पाठीशी मोठ्या विश्वासाने उभा आहे. याच जनतेने दिल्लीतील सर्व सात जागांवर गेल्या तीनही निवडणुकीत भाजपाचे सर्व खासदार लोकसभेवर निवडून दिले, याच जनतेने आता भाजपाला दिल्ली राज्याची सत्ता दिली आहे. म्हणूनच भाजपाने नव्या सरकारचा शपथविधी रामलीला मैदानावर मोठ्या थाटात साजरा केला.
गेले दशकभर दिल्लीने आपचा मुख्यमंत्री व उपराज्यपाल यांच्यातील संघर्ष पाहिला. मुख्यमंत्री म्हणून आपल्याला काम करू देत नाहीत म्हणून केजरीवाल सदैव केंद्र सरकारवर कसे खापर फोडत होते हे अनुभवले. आता केंद्रात भाजपा व राज्यात भाजपा असे डबल इंजिन सरकार दिल्लीला मिळाले आहे. त्यामुळे दिल्लीत केंद्र-राज्य असा संघर्ष होणार नाही, मुख्यमंत्री विरुद्ध उपराज्यपाल असा वाद दिसणार नाही. केंद्राचा निषेध करण्यासाठी आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर रस्त्यावर उपोषण करण्याची वेळ येणार नाही.दिल्लीत रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे पण या सरकारपुढे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे हे फार मोठे आव्हान आहे. दिल्लीत सरकार आल्यावर भाजपा येथील महिलांना (लाडकी बहीण धर्तीवर) दरमहा २५०० रुपये देईल असे आश्वासन पक्षाने दिले होते. हे आश्वासन निश्चित पाळले जाईल ही मोदींची गॅरेंटी आहे, असे स्वत: पंतप्रधानांनी म्हटले होते. एवढेच नव्हे, तर दि. ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून त्याची अंमलजावणी होईल, असेही त्यांनी सांगितले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपाला पुरुषांपेक्षा जास्त म्हणजेच ६०.९२ टक्के महिलांनी मतदान केले हे लक्षात ठेऊन महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन भाजपाला पाळावे लागेल. शिवाय गर्भवती महिलांना पोषण संच व २१ हजार रुपये देण्याचे आश्वासन भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. महिलांना मोफत बस प्रवास चालूच राहणार आहे.
दि. ८ फेब्रुवारीला निवडणूक निकालानंतर भाजपाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा करण्यात आला तेव्हा, जय यमुना अशा घोषणा दिल्या गेल्या. रेखा गुप्तांनी शपथविधिनंतर मंत्रिमंडळासह यमुना नदीच्या घाटावर जाऊन आरती केली. स्वच्छ व प्रदूषणमुक्त यमुना करण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. सन २०१५ मध्ये आपने स्वच्छ यमुना बनविण्याचे आश्वासन दिले होते, पण यमुना कधी स्वच्छ झालीच नाही. कचरा, घाणपाणी, नदी किनाऱ्यावरील अनधिकृत उद्योग व अनधिकृत वसाहतींचे पाणी या नदीत अखंड पडत असते. काँग्रेस किंवा आप यांना सत्तेवर असताना जमले नाही, ते यमुना नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करणे हे भाजपापुढे मोठे आव्हान आहे.
आप सत्तेवर असताना मोफत वीज व पाणी सवलतीमुळे दहा हजार कोटींचा बोजा दिल्लीच्या सरकारी खजिन्यावर पडत असतो. या सवलती चालूच ठेवण्यात येतील, असे भाजपाने आश्वासन दिले आहे. दिल्लीची हवा वारंवार प्रदूषित होते, वर्षानुवर्षे हेच चालू आहे. राजधानीतील रस्ते खराब आहेत. ८० लाखांपेक्षा जास्त वाहनांनी या महानगरात वाहतुकीची कोंडी केली आहे. महिलांची सुरक्षा हा मोठा चिंतेचा विषय आहे. रोजगारासाठी रोज परप्रांतीयांचे लोंढे दिल्लीवर वर्षानुवर्षे आदळत आहेत. रोज येणाऱ्या हजारो लोकांची पार्श्वभूमी काय याची कोणतीही माहिती पोलीस-प्रशासनाला नसते. बेरोजगारी ही दिल्लीची मोठी समस्या आहे. सरकारी शाळा व सरकारी इस्पितळांतील सेवेची गुणवत्ता वाढवणे हे मोठे आव्हान आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर खासगी क्षेत्राने मोठा कब्जा केला आहे. या समस्या सोडवताना भाजपा सरकारच्या कप्तान म्हणून रेखा गुप्ता यांना काही कठोर निर्णय घेणेही आवश्यक आहे.
[email protected]
[email protected]