प्रवासी सुरक्षेसह वाहतूक प्रश्न ऐरणीवर
कल्याण : कल्याण तालुक्यातील रायते गावाजवळील उल्हास नदीच्या पुलावरून एक अवजड क्रेन नदीत कोसळली. मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन जण जखमी झाले. प्रवीण चित्ता आणि नजरहुसेन शेख यांना तातडीने उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. जीवितहानी टळली असली तरी या अपघातामुळे वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण-मुरबाड मार्गाचे नूतनीकरण सुरू असताना अनेक ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. शहाड उड्डाणपुलापासून म्हारळपाड्यापर्यंतच्या भागातील काम पूर्ण झाले असले तरी त्यावेळीही नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अपघातांची मालिका सुरूच असून, काहींनी आपले प्राण गमावले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
https://prahaar.in/2025/02/22/ndian-national-anthem-played-in-lahore-ahead-of-australia-vs-england-champions-trophy-2025-games-icc-pcb-gets-ridiculedndian-national-anthem-played-in-lahore-ahead-of-australia-vs-england-champions-tr/
या मार्गावरील कामाच्या दर्जाबाबत मोठ्या तक्रारी असून, ठेकेदाराने अत्यंत हलगर्जीपणा केला आहे. कुठेही योग्य दिशा दर्शक फलक नाहीत, संरक्षक कठडे नाहीत, रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले असून, प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पत्र्याच्या तात्पुरत्या कुंपणाला केवळ कागदी पट्ट्या बांधून जबाबदारी झटकली जात आहे. या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. खड्डेमय रस्ते, वाहतुकीची वर्दळ आणि अपुऱ्या सुविधा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रायते पुलावर झालेल्या अपघाताने या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित होत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकारानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांकडे दुर्लक्ष करून प्रशासन आणि ठेकेदार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलावीत, अन्यथा जबाबदारी कोणाची? हा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.