डॉ. राणी खेडीकर
मागील काही दिवसांपूर्वी एक बालविवाह आमच्या प्रयत्नांनी थांबवण्यात आला आणि त्यातील बालविवाहसारख्या कुप्रथांना बळी पडण्यापासून वाचविण्यात आलेली बालिका आमच्याकडे काळजी व संरक्षण हेतू प्रस्तुत झाली. ही बालिका वस्ती भागातील अतिशय हलाखीची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विखुरलेल्या कुटुंबातील होती. तिची आई ती अगदी तान्ही असताना वारलेली, वडील दुसऱ्या स्त्रीसोबत राहणारे, अनेक आजारांनी ग्रस्त आणि व्यसनाधीन आहेत. एक म्हातारी आजी आहे. अशा परिस्थितीत बालिकेची पाचव्या वर्गात शाळा सुटली होती. बालिकेला देखील गुटका, तंबाखू आणि अनेक व्यसन असल्याचं कळून आलं. तसेच तिला फिट्स देखील येत असल्या कारणाने तिला या सगळ्यांतून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण बालिकेस हे सगळं तिच्या मदतीसाठी सुरू आहे हे कळत नव्हतं. ती घरी जाण्यासाठी खूप अंकाततांडव करत होती. घरची माणसं पण अज्ञानामुळे काहीही समजून घेण्यास तयार नव्हते. एकाएकी तिचे अनेक नातेवाईक आणि आमच्या संरक्षण प्रयत्नांना विरोध करू लागले. जी लोकं तिची काळजी घेऊ शकले नाहीत, तिचा बालविवाह करणार होते तेच आता तिच्यावर आपला अधिकार दाखवू लागले. अशा परिस्थितीत हतबल झाल्यासारखं वाटू लागलं. बालिकेचे समुपदेशन सुरूच होते. ती घरी जाण्यासाठी हट्ट करू लागली होती. रोज नवीन करतब करत होती.
कधी चक्कर आल्याचा बहाणा, तर कधी पोटदुखी. ती अस्वस्थ झाली होती. तिचं व्यसन तिला स्वस्थ बसू देईना. तिला काही उपक्रमात रमवण्याचा प्रयत्न संस्थेकडून सुरू होता. हळूहळू ती थोडी स्थिर झाली. काही उपक्रम तिला आवडू लागले. त्या वस्तीतील अस्वच्छता, सतत होणारी भांडणे आणि करावे लागणारे कष्ट यापासून तिची सुटका झाली होती हे तिच्या लक्षात येऊ लागलं.
काही दिवसांनी ती समिती पुढे आली तेव्हा शांत बसली. आवाजातील कर्कशपणा कमी झाला होता. खरं तर तिला आता घरी जायचं नव्हत, असं तिच्या बोलण्यातून जाणवलं. नेमक्या कोणत्या उपक्रमात ती रमते आहे हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. तिला गोष्टी ऐकायला आणि सांगायला देखील आवडत होत्या. तिचा समुपदेशन अहवाल वाचल्यानंतर समजलं की, ती तिच्या आई-वडिलांबाबत खूप गोष्टी इतर बालिकांना सांगत असते. ही लहान असतानाच तिचे आई तिला सोडून गेली. वडिलांनी दुसरं लग्न केल्यामुळे ते कधीच तिला भेटले नाही आणि ती आजीसोबत राहत असे. अर्थात तिला गोष्टी स्वरूपात ते आयुष्य जगायचं होतं आणि त्याला जिवंत करण्यासाठी ती इतर बालिकांची मदत घेत होती. तिची ती पोकळी त्या गोष्टींनी भरत होती. तिला आता संस्थेत राहू वाटत होतं. तिचं लग्न ज्या व्यक्तीशी ठरलं होतं तो अठ्ठावीस वर्षांचा होता. पण ती संस्थेच्या सोशल वर्करला म्हणाली होती तो चांगला आहे. त्याची कोणती गोष्ट तिला आवडली असे विचारल्यास ती म्हणाली की, तो तिच्याशी बोलतो तेव्हा तिच्या डोक्यावर हात ठेवतो. पण त्या व्यक्तीबाबत अशी माहिती होती की, तो दारूच्या दुकानात काम करत असून त्याला दारूचे व्यसन आहे. पण समजून घेण्याची गोष्ट म्हणजे बालिका त्या व्यक्तीमध्ये वडील प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न करत असावी. लग्न आणि त्यासोबत येणारी जबाबदारी याची कसलीही तिला माहिती किंवा जाणीव नव्हती तरी ती केवळ तिच्या मनातील वडील प्रतिमा मिळवण्यासाठी त्या लग्नाला तयार झाली होती. बाल मन आणि त्याच्या विविध निरागस गरजा याचा करावा तेवढा अभ्यास थोडा आहे. पालकांची, शिक्षकांची कार्यशाळा घेताना तसेच पोलिसांचे सेशन घेताना मी कायम सांगते की गुड आणि बॅड टच सांगण्यापेक्षा सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श बालकांना समजावून सांगायला हवा. कारण बालकांना चांगला वाटणारा स्पर्श पण असुरक्षित असू शकतो. त्याची सुरुवात बालकांना चांगली वाटू शकते. बालकांना हे कळणं खूप आवश्यक आहे.