Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा डामडौल!

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा डामडौल!

विशेष : लता गुठे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे साहित्य संमेलन दिल्लीत भरत आहे आणि या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत, लोक साहित्याच्या अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर. आमच्यासारख्या कवयित्री, लेखिकांसाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण आजवर ९८ साहित्य संमेलनं झाली आणि यापैकी फक्त ७ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान लेखिकांना मिळाले आहे, किती तफावत आहे ही! हे प्रकर्षाने जाणवते. असो…

दिल्लीत होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत. तीन दिवस साहित्य संमेलनाचा उदो उदो होणार आणि पुढे काय? आपण काय साध्य करतो साहित्य संमेलनातून? याचा आपण कधी विचार करणार आहोत? काव्य संमेलनाला तेच तेच कवी त्याच त्याच कविता किती ऐकायच्या? तेच तेच विषय चर्चासत्र, परिसंवादात असतात. त्यातून खरंच विचार मंथन होतं का? निमंत्रित कवींचे काव्य संमेलन होतात. उदगीर येथे झालेल्या ९५व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र शोभणे होते. त्या वेळी निमंत्रित काव्य संमेलनात माझाही सहभाग होता. हे काव्यसंमेलन रात्री ९ नंतर सुरू झाले. तोवर ७० टक्के लेखक, कवी जेवण करून निघून गेले. उरलेले साधारण एक दीड तास थांबले आणि त्यानंतर तेही निघून गेले. काव्य संमेलनात साठ-सत्तर कवींचा समावेश होता. त्यापैकी अनेकजण कविता सादर करून निघून गेले. शेवटच्या कवीचा नंबर रात्री १ वाजता आला. त्यावेळेला फक्त ऐकायला व्यासपीठावरील आठ-दहा कवी, त्यापैकी एक सूत्रसंचालन करणारा एवढेच उरले. हे चित्र अनेक साहित्य संमेलनामध्ये पाहायला मिळते.

गेली पंधरा वर्षे लेखिका, प्रकाशिका आणि संपादिका या तीनही साहित्य क्षेत्रांमध्ये कार्यरत असल्यामुळे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आवर्जून भेटी दिल्या. त्यामध्ये बरे-वाईट अनुभव आले. नाशिक आणि अमळनेर येथे झालेल्या साहित्य संमेलनात भरारी प्रकाशनच्या पुस्तकाचे स्टॉल लावले होते. अमळनेर येथे पुस्तकाचे स्टॉल लावण्याआधी ७ हजार रुपये तीन दिवसांचे स्टॉलचे भरले. जाण्या-येण्याचा खर्च, तिथे स्टॉलवर असलेल्या मुलाचे पेमेंट, पुस्तकं आणण्याचा खर्च दहा हजार रुपये झाला आणि पुस्तकं विकली दोन हजार रुपयांची. बहुतेक सर्वच प्रकाशकांचा हाच अनुभव होता. याचे कारण म्हणजे, मुख्य कार्यक्रमाच्या सभागृहाचं गेट आमच्यापासून खूप दूर होतं. तिसऱ्या गेटमधून आत आल्यानंतर मागच्या बाजूला पुस्तकांचे स्टॉल होते. मध्ये खाऊ गल्ली त्यामुळे पुस्तकांकडे कोणी फिरकलेच नाहीत. फार क्वचित लेखक, साहित्यिक तिकडे फेरफटका मारायला आले. हे सर्व आयोजकांनी आधी विचार करून केले असते तर प्रकाशकांवर ही वेळ आली नसती. ना प्रकाशकांची राहायची व्यवस्था नीट करतात. त्यांना कुठल्या तरी मुलांच्या होस्टेलला अतिशय वाईट अवस्था असलेल्या जागेत सोय केली जाते. मला अशा वेळेला एक प्रश्न पडतो की, शासनाने संमेलनासाठी भरपूर अनुदान दिलेले असते, मग तो पैसा जातो कुठे? काही व्हीआयपी लोकांच्या सोयी तारांकित हॉटेलला केलेल्या असतात. तर गझल कट्टा किंवा कवी कट्ट्याला बोलावलेल्या कवींना कुठेतरी मुलांच्या होस्टेलमध्ये राहण्याची सोय केलेली असते. व्हीआयपीसाठी जेवणाची वेगळी सोय आणि प्रकाशकांसाठी किंवा कवी कट्ट्यांसाठी आलेल्या कवींची सोय वेगळ्या ठिकाणी असते. तिथे भली एक दीड किलोमीटरची लाईन नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी असते. नंबर येईपर्यंत पदार्थ संपून गेलेले असतात. हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. कशासाठी एवढा पैसा खर्च करायचा? साध्या पद्धतीनेही खूप चांगले आयोजन करून साहित्य संमेलन होऊ शकत नाही का? यावर खरंतर विचारमंथन होऊन काहीतरी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे, असं मला वाटतं. बदलत्या काळाबरोबर अनेक गोष्टी बदलतात मान्य आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात डोकावलं तर असं लक्षात येतं की छोट्याशा एका हॉलमध्ये सुरू झालेले हे साहित्य संमेलनाचे स्वरूप किती अवाढव्य झाले आहे.

साहित्य संमेलनामागचा थोडक्यात इतिहास बघूया… म्हणजे हे आपल्या लक्षात येईल…

१९७८ साली तत्कालीन साहित्यिकांनी विचारमंथन करून, ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने साहित्य संमेलनाची आखणी केली. न्यायमूर्ती रानड्यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणून ११ मे १८७८ रोजी सायंकाळी  पुण्याच्या  हिराबागेत  मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरविले. या साहित्य संमेलनापासून सुरुवात झाली आणि हे पहिले  मराठी साहित्य संमेलन होय. या संमेलनाचे अध्यक्षपद  न्या. रानडे यांनी भूषविले. दुसरे साहित्य संमेलन १८८५ साली पुण्यातच  भरले. या संमेलनाला शंभर सव्वाशे नामवंत ग्रंथकारांनी उपस्थिती लावली होती.  २१ मे  १८८५ रोजी दुपारी ४ वाजता पुणे येथील बुधवार पेठेतील सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये ते संमेलन पार पडले. यानंतर वीस वर्षांनी तिसरे साहित्य संमेलन १९०५च्या मे महिन्यात  सातारा  येथे घेण्यात आले.  लो. टिळकांचे  एक सहकारी साताऱ्यातले सुप्रसिद्ध वकील र. पां. ऊर्फ दादासाहेब करंदीकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. साताऱ्याच्या पाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे २७-२८ मे १९०६ शनिवार, रविवार या दिवशी सदाशिव पेठेत नागनाथ पाराजवळच्या मयेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या संमेलनांपेक्षा जास्त यशस्वी व विधायक स्वरूपाचे झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर होते. त्या वेळची अनेक मान्यवर ग्रंथकार मंडळी संमेलनासाठी एकत्र आलेली होती. निबंध वाचन, भाषणे, ठराव यामुळे संमेलन दोन दिवस गाजले. अशाप्रकारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पाया घातला गेला.

पुढाकार टिळक-केळकर–खाडिळकर ह्यांसारख्या मंडळींचा होता. याच संमेलनामध्ये २७ मे रोजी ‘महाराष्ट्र साहित्य-परिषदेची’ स्थापना करण्यात आली. ग्रंथकार संमेलनातून साहित्य-परिषदेचा जन्म झाला आणि स्वाभाविकच पुढची संमेलने भरविण्याची जबाबदारी परिषदेवर आली. परिषदेची अधिकृत घटना १९१२च्या अकोल्याच्या संमेलनामध्ये मंजूर होऊन परिषदेचे कार्यालय मुंबई येथे सुरू झाले. संमेलने भरविण्यामध्ये पुणेकरांचा विशेष पुढाकार होता. १९२१ पर्यंत परिषदेने तीन संमेलने भरविली होती, ती म्हणजे १९१५, १९१७, १९२१. पुढे संमेलनाचा अध्यक्ष परिषदेने निवडायचा की स्थानिक संस्थेने असा वाद सुरू झाला. १९३२ मध्ये परिषद पुण्यास आणण्याचा ठराव होऊन १९३३ पासून तिचे कार्यालय पुण्यास सुरू झाले. नंतर अखिल भारतीय साहित्य संमेलने मोठ्या प्रमाणात परिषदेमार्फतच भरविण्यात येऊ लागली.
दिल्ली येथे या आधीही १९५४ मध्ये ३७वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० मध्ये  महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. अशा प्रकारे छोटेखानी साहित्य संमेलनाचे जे स्वरूप होते त्या मागचा उद्देश नाहीसा होऊन, आज प्रचंड डामडौलाने साहित्य संमेलनाचे सेलिब्रेट होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -