शेलार ढाब्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून ना.भोसले यांचे स्वागत
पोलादपूर (शैलेश पालकर)– सार्वजनिक बांधकाममंत्री सार्वजनिक उपक्रम वगळून ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरून कशेडी घाटाला पर्यायी भुयारामार्गे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करताना पोलादपूर शहर वगळून थेट भुयार गाठले. मात्र, भुयाराची पाहणी करण्यापूर्वीच पोलादपूर व खेड येथील पत्रकारांनी जनतेचे प्रश्न मांडून मंत्रीमहोदयांना स्थानिक प्रश्नावर बोलते केले. तत्पूर्वी, लोहारे येथील शेलार ढाब्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून ना.भोसले यांचे स्वागत करण्यात आले.
लोहारे येथील शेलार ढाब्यावर विजय व अरविंद शेलारबंधूंसह भाजप पदाधिकारी प्रसन्ना पालांडे, महेश निकम, प्रतीक सुर्वे नामदेव शिंदे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी ना.भोसले यांचे स्वागत केले. यानंतर मंत्रीमहोदयांचा ताफा पोलादपूर अंडरपासमधून पोलादपूर शहर वगळून थेट कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाजवळ जाऊन पोहोचला. यावेळी उपस्थित सा.बां.विभागाचे अभियंता, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता तसेच खेड येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री सार्वजनिक उपक्रम वगळून ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्वागत केले.
१५ मार्चपर्यंत भुयार सुरू करणार, ना.भोसले यांना अभियंत्यांची ग्वाही
यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री सार्वजनिक उपक्रम वगळून ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, कशेडी घाटाच्या मूळ रस्त्याचे काम व्यवस्थित करण्यासह भुयारातील वायूविजन व विद्युतप्रकाश झोत यासाठी महावितरणसोबत एसडीपीएल या ठेकेदार कंपनीनेच संपर्कात राहण्याची सूचना करून महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. भुयाराचे काम लवकरात लवकर करण्याच्या प्रयत्नासह सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षाही यावेळी ना.भोसले यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना यावेळी ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दुसऱ्या भुयाराचा मार्ग तातडीने सुरू होण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागेल, यावर अभियंत्यांनी १५ मार्च २०२५ पर्यंत मुंबईकडून कोकणात जाण्यासाठी हा दुसरा भुयारी मार्ग सुरू होऊ शकेल, अशी ग्वाही दिली.
पोलादपूरच्या प्रश्नांची सरबराई, ना.भोसले यांनीही दिल्या सूचना
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान भूसंपादनाचा मोबदला घेणाऱ्यांनी आजतागायत त्यांच्या जमिनीवरचा अतिक्रमण व ताबा सोडला नसल्याकडे झंजावात युटयूबच्या पत्रकारांनी ना.भोसले यांचे लक्ष वेधले. यावर मंत्री ना.भोसले यांनी ही बाब गंभीर असून प्रांताधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते यांनी पोलीसबळाची मदत घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. शाळकरी विद्यार्थी आणि श्रीसदस्यांची पाच पूल बांधूनही गैरसोय होत असल्याची बाब झंजावात युटयूबच्या पत्रकारांने मांडली असता या बाबी लवकरच पूर्णत्वास नेऊ याची ग्वाही दिली. यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीने पोलादपूरच्या दोन्ही सर्व्हिसरोडची लांबी निर्धारित लांबी पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावरही ना.भोसले यांनी निर्धारित लांबीपेक्षा कमी लांबी असल्यास तातडीने मुळ अंतराएवढेच सर्व्हिस रोड करण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
यानंतर पूर्वीच्याच दुहेरी वाहतुकीसाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गातून ना.शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा दौऱ्यातील मोटारीचा ताफा रत्नागिरी जिल्ह्याकडे रवाना झाला.