नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नागपूरमध्ये पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. मागील काही दिवसांत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांना अनुपस्थित राहिलेले एकनाथ शिंदे महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमानांही गैरहजर राहिले आहेत. त्यांचा सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावातला मुक्काम वाढला होता. यामुळे महायुतीत तणाव आहे का ? शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज आहेत का ? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना, ‘मला हलक्यात घेऊ नका, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे नक्की कोणाला उद्देशून बोलत होते यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
निवडणूक जिंकल्यावर येईन असे म्हणालो होतो म्हणून आता विदर्भाच्या दौऱ्यावर आल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांचे नियोजीत कार्यक्रमानुसार विदर्भात दोन मोठे मेळावे होणार आहेत. याआधी पत्रकारांशी बोलताना शिंदेंनी सांगितले की, ‘ज्यांनी मला हलक्यात घेतले, त्यांचा मी २०२२ मध्ये टांगा पलटी केला. सरकार बदललं आणि लोकांच्या मनातला डबल इंजिनचा सरकार आणून दिले. विधानसभा निवडणुकीच्या आधी सांगितले होते की, मी आणि देवेंद्र फडणवीस २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणू, यंदाच्या निवडणुकीत २३२ जागा आणल्या आहेत. त्यामुळे, लोकांनी मला हलक्यात घेऊ नये, ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा त्यांनी समजून घ्यावा.’
शिवसेनेची विधानसभेतील ताकद
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विधानसभेत ५७ आमदार निवडून आले. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या ८१ जागा लढवल्या होत्या. एकूण मिळालेल्या आणि पात्र ठरलेल्या मतांपैकी १२.३८ टक्के अर्थात ७९ लाख ९६ हजार ९२० मते शिवसेनेने मिळवली.